लेखिका - आसमा सौंदलगे -बेग
देवचंद कॉलेज अर्जुननगर ,निपाणी.
जागतिक महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी महिलांच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक उपलब्धी आणि कष्टांची सापेक्षता साजरी करण्यासाठी, जगातील विविध प्रदेशांमध्ये महिलांबद्दल आदर, कौतुक आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश महिलांच्या हक्कांचा प्रचार करणे हा आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांच्या हक्क चळवळीचा एक केंद्रबिंदू आहे, जो लैंगिक समानता, प्रजनन अधिकार आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या समस्यांकडे लक्ष वेधतो. याशिवाय, आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक यशाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, स्त्रियांबद्दल आदर, कौतुक आणि प्रेम दर्शवितो. महिला दिनाचा संक्षिप्त इतिहास असा आहे की 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये 12-15 हजार महिलांनी रॅली काढली होती. नोकरीचे काही तास कमी करण्यासोबतच त्यांच्या कामानुसार पगार मिळावा आणि त्यांना मतदानाचा अधिकारही मिळावा, अशी या महिलांची मागणी होती. ही कामगार चळवळ लक्षात घेऊन, बरोबर एक वर्षानंतर अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने पहिला राष्ट्रीय महिला दिन घोषित केला. त्यानंतर 1911 मध्ये डेन्मार्क, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, जर्मनी येथे पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. 8 मार्च 1975 रोजी युनायटेड नेशन्सने एका विशेष थीम अंतर्गत दरवर्षी तो साजरा करण्यास सुरुवात केली तेव्हा महिला दिन अधिकृतपणे ओळखला गेला.जेव्हा पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला तेव्हा त्याची थीम होती 'सेलिब्रेटिंग द पास्ट, प्लानिंग फॉर द फ्यूचर' . आता दरवर्षी हा विशेष दिवस नवीन थीम अंतर्गत साजरा केला जातो. गेल्या वर्षी म्हणजेच 2022 ची थीम 'जेंडर इक्वैलिटी फॉर ए सस्टेनेबल टुमॉरो' होती. या वर्षी 2023 आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम 'एम्ब्रेस इक्विटी (Embrace Equity)' ठेवण्यात आली आहे. इक्विटी म्हणजे सर्वसमावेशक जग निर्माण करणे. लैंगिक समानतेवर लक्ष केंद्रित करणे हा प्रत्येक समाजाच्या डीएनएचा भाग असावा. सर्वांनी त्यास सक्रिय पाठिंबा द्यावा तसेच त्याचा स्वीकार करावा, या उद्देशावर यंदाची थीम सेट करण्यात आली आहे.
समानतेबद्दल बोलायचे असेल तर परदेशी महिला स्वतःला पुरुषांच्या तुलनेत कधी कमी मानत नाहीत आणि तेथील व्यवस्था, समाज, सरकार आणि कायदादेखील त्यांचे समर्थन करतात. ते आपली घरे समानतेने चालवतात. परदेशी पुरुष आणि स्त्रिया दोघेही घरातील कामांमध्ये समानतेने सहभागी असतात. आपल्याकडे अजूनही मनातून स्त्रियांविषयीची असमानता गेलेली नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. स्त्रीने आधी स्वतःला समान समजावे. भारतात लिंग-आधारित समानतेबद्दल बोलले जाते, पण अद्याप पुरेशा प्रमाणात त्यावर अंमल झालेला नाही. उक्ती आणि कृतीत खूप फरक आहे. प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरितीने पूर्वापार स्त्री ही पुरुषांपेक्षा कमी दर्जाची असते हे बिंबवले गेले आहे. त्यामुळे खुद्द स्त्रियादेखील स्वतःला पुरुषापेक्षा कमी लेखतात. अशावेळी आधुनिक काळातील कणखर स्त्री ही जबाबदारी आहे की तिने स्वतः ला आधी समान समजले पाहिजे. सर्व परिस्थितीत तिने पुढे जात राहिले पाहिजे आणि बोलण्याचे धैर्य मिळवले पाहिजे. महिलांनी घरगुती हिंसाचाराविरोधात आवाज उठविला पाहिजे. कोणत्याही प्रकारची हिंसा सहन नाही केली पाहिजे. अन्यायाविरोधात बोलायचे व लढण्याचे धाडस दाखवले पाहिजे.
एकविसाव्या शतकातील बदलती स्त्री
एकविसाव्या शतकातील स्त्री बद्दल बोलायचे झाले तर आजच्या स्त्रीने एक सत्य जाणले आहे. आता ती कोणावरही अवलंबून राहू इच्छित नाही. ती जास्तीत जास्त स्वावलंबी होऊ इच्छिते. नोकरी बरोबर उद्योग, व्यापार क्षेत्रातही ती आपले कर्तृत्व दाखवत आहे. अगदी घरात राहणारी स्त्री पण आपल्या फुरसतीच्या च्या काळात काहीना काही काम करून अर्थार्जन करते. एकेकाळी स्वयंपाकाची कामे करणे, मुले सांभाळणे ही कामे कमी प्रतीची मानली जात. पण बदलत्या काळानुसार आहात पोळी भाजीचे दुकान चालवणारी स्त्री स्वयंपाकीण समजली जात नाही, तर उद्योजक मानली जाते.
आजची स्त्री आपल्या स्वच्छता विषयी जागरूक आहे. यासाठी आवश्यक ती व्यायाम ती करते. आजच्या छोट्या कुटुंबात मुलगा व मुलगी यांच्या संगोपनात फरक केला जात नाही. शहरातील ही विचार परंपरा हळूहळू खेड्यापर्यंत झिरपत आहे. विज्ञानामुळे जग जवळ आले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात घडणार्या घटना स्त्रीला समजतात आणि त्याप्रमाणे स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत आहे.
आजच्या युगातील स्त्री ही विचारी आहे. ती काळानुसार बदलू पहात आहे. गेल्या शतकातील स्त्री आणि आजची स्त्री यात महदंतर आहे. आजच्या स्त्री चा मार्ग जातो आहे विकासाकडे, प्रगतीकडे आणि वैभवाकडे
महिला रोज नवनवीन यश प्राप्त करत आहेत
काळाबरोबर स्त्रियांचे स्वभाव आणि चारित्र्यही बदलत गेले आहे आणि स्त्रीला तिच्या हक्कांची चांगलीच जाणीव झाली आहे . राजकारण, प्रशासन, समाज, उद्योग, व्यवसाय, विज्ञान-तंत्रज्ञान, चित्रपट, संगीत, साहित्य, मीडिया, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, वकिली, कला-संस्कृती, शिक्षण, आयटी, क्रीडा, लष्करापासून अवकाशापर्यंत महिलांनी झेप घेतली आहे. महिलांच्या नाजूक शारीरिक रचनेमुळे त्या सुरक्षेसारखी कामे करू शकत नाहीत, असा समाजामध्ये समज होता, मात्र बदलत्या काळानुसार हा समज मोडीत निघाला आहे. आज महिलांना पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये उत्कृष्ट तैनाती मिळत आहे. इतकंच नाही तर स्मशानभूमीत अग्नी प्रज्वलित करून स्त्रिया वैदिक मंत्रोच्चारात पौरोहित्य करतात आणि विवाहासोबतच शांती यज्ञ, गृहप्रवेश, मुंडन, नामकरण आणि यज्ञोपवीतही करतात. किंबहुना, स्त्रियांच्या आयुष्याचा बहुतांश भाग घर आणि कुटुंब यांच्यातच जातो आणि त्यांना बाहेरील जीवनाशी समतोल साधण्यात अडचणी येतात, अशी जी पारंपरिक विचारसरणी समाजात आढळते त्या नियमांना बगल देऊन भूमीपासून अवकाशापर्यंतच्या प्रत्येक क्षेत्रात महिला रोज नवा आदर्श घालून देत आहेत.
महिलांची वेगळी ओळख निर्माण होत आहे
प्रत्येक स्त्रीला लिहिता-वाचता आले पाहिजे.प्रत्येक स्त्री ने स्वावलंबी बनले पाहिजे. आपण कोणावरही अवलंबून राहू नये. महिलांनी सर्व क्षेत्रात पुढे आले पाहिजे. आपण इतके सक्षम बनले पाहिजे की कोणीही आपल्याकडे दयेने पाहू नये. अबला म्हणवून घेतलेल्या भारतीय स्त्रीने आज आपल्या कौशल्याने आणि तळमळीने जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, आज भारतीय स्त्री चुलीतून बाहेर पडून समाज आणि देशाच्या उभारणीत आपले अनमोल योगदान देत आहे.
महिला आता परंपरागत चाकोरीच्या बाहेर
शोषित पीडित असलेल्या स्त्री ला आता परंपरेच्या बेड्या तोडून आपले अस्तित्व जाणवून द्यायचे आहे.वर्तमान काळातील स्त्रीआत्मविश्वासाने आपल्यां पूर्णत्वाचा शोध घेत आहे.आपल्यातील पूर्णत्वाचे ज्ञान समाजाला उजळून टाकेल यासाठी तिचा अखंड प्रवाह सुरू आहे.स्त्रीला देवत्व मानून पूजने आणि मातृदेवते सारखी तिची पूजा करण्याची प्रथा सिंधू संस्कृतीतही दिसून येते. पण तसा स्त्रीचा मान आणि सम्मान होताना फार कमी दिसतो. स्त्रीचे कार्यक्षेत्र केवळ घर नाही तर संपूर्ण जग आहे.
महिलांचे मृदु बरोबर कठोर रूपही आवश्यक
सुरुवातीपासूनच स्त्रीला कोमलता, करुणा, क्षमा, सहिष्णुतेचे मूर्त स्वरूप मानले गेले आहे, परंतु ही स्त्री आवश्यकतेनुसार दुर्गेचे रूप सुद्धा धारण करते, कारण तिला माहित आहे की सौम्य स्वभावाने समाज तिच्याकडे फक्त सहानुभूती आणि आदराने पाहू शकतो. पण समाजात समानतेने उभे राहण्यासाठी तिला स्वतःला एक मजबूत, स्वावलंबी, अटल स्तंभ बनावे लागेल. आज महिलांना स्वावलंबी बनवून त्यांना बळ देण्यासाठी आपल्या समाजाने संघटित होणे, महिलांच्या सन्मानाची आणि संरक्षणाची शपथ घेणे आणि महिलांचा सन्मान करण्याची शपथ घेणे आवश्यक आहे.
शेवटी स्त्री आणि पुरुष दोन्ही ही संसार रथाची दोन चाके आहेत. दोन्ही चाके समान गतीने चालतील तरच हा रथ व्यवस्थितपणे पुढे जाईल. म्हणून महिलांना समान दर्जाचे मानून त्यांना मताचा अधिकार द्यायला हवा. त्यांच्यामध्ये खूपच क्षमता आहेत त्या क्षमतांचा वापर राष्ट्रउद्धारासाठी करून घ्यायला हवा. समाजरूपी पक्षाचे दोन पंख आहेत स्त्री आणि पुरुष. जसे एका पंखाने पक्षी उडू शकत नाही तसेच खुरटलेल्या स्त्री समूहाने राष्ट्र निर्बलच राहिल. त्यामुळे राष्ट्रोद्धार आणि राष्ट्रोत्कर्ष यासाठी महिला सक्षमीकरण हा उत्तम उपाय आहे.
आसमा सौंदलगे -बेग
देवचंद कॉलेज अर्जुननगर ,निपाणी.
asmabaig1002@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा