Breaking

सोमवार, १३ मार्च, २०२३

आम्ही लेखिका संस्थेचा जागतिक महिला दिन विविधतेने नटला.....

 


       जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून "आम्ही लेखिका" या अखिल भारतीय महिला साहित्य संस्थेतर्फे दिनांक १२ मार्च २०२३ रोजी एक अभिनव आणि विविधतेने नटलेला भरगच्च  कार्यक्रम आयोजित केला होता. अमर हिंद मंडळ आणि सखी साऱ्या जणी या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम दादर येथे अमर हिंद मंडळाच्या ओपन थिएटर मध्ये आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने आखीव रेखीव असूनही सुंदर झाला. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमात ज्येष्ठ कवयित्री आणि साहित्यिक माननीय उषा मेहता आणि ज्येष्ठ चरित्र अभिनेत्री मृणालिनी ........ यांची उपस्थिती. त्यांनी सर्वांचे कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.



       कार्यक्रमाच्या सुरुवातीला "जय शारदे वागेश्वरी" च्या सुरांनी सभागृहातील वातावरण मंगलमय झाले. "आम्ही लेखिका" संस्थेच्या समन्वयक श्रीमती शिल्पा देवळेकर यांनी संस्थेची व संस्थेच्या कार्याची सर्वांना माहिती दिली. तसेच, अमर हिंद मंडळ आणि सखी साऱ्या जणी या संस्थांच्या मान्यवरांनी आपापल्या संस्थांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे मानसोपचारतज्ज्ञ माननीय डॉ.अंजली जोशी यांचे तिन्ही संस्थांनी स्वागत केले. डॉ.अंजली जोशी यांनी "ताणतणावाचे व्यवस्थापन" या विषयावर अतिशय उत्तम व्याख्यान दिले. दैनंदिन जीवनात अनेक बारीकसारीक गोष्टींमुळे आपल्या  मनात विविध प्रकारचे तरंग उठतात. ज्याचे परिणाम आपल्या विचारात आणि आचरणात दिसतात. त्यानुसार आपल्या जीवनशैलीमध्ये बदल होत राहतो. डॉ अंजली जोशी यांनी साध्या पद्धतीने कसे नियंत्रण ठेवता येईल, याबाबत सोप्या भाषेत उपाय सांगितले. प्रत्येकाने संग्रही ठेवावे असे व्याख्यान झाले.



       त्यानंतर महिला दिनानिमित्त मोठे मोठे कार्यक्रम न घेता एक अनोखा प्रयोग केला. एक नवीन पायंडा घालत मुंबईतील एक सर्वसामान्य महिला टॅक्सी ड्रायव्हर श्रीमती रंजना शिवगडे यांची मुलाखत श्रीमती नेहा खरे यांनी घेतली. पतीच्या निधनानंतर आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी टॅक्सी ड्रायव्हर हा पेशा पत्करून तो तितक्याच प्रामाणिकपणे आणि कष्टाने सांभाळत कुटुंबाचे भविष्य घडवणारी ती .... तिच्या मुलाखतीत आपल्या जीवनाचे कटुगोड अनुभव तिने सांगितले, ते ऐकून सभागृहातील प्रत्येकाचे डोळे पाणावले. पण प्रत्येकाने मनोमन तिच्या कर्तृत्वाला आदराने सलाम केला. "आपल्या जीवनात आपण असे कधी मुलाखतीसाठी समोर बसू, कधी आपला असा सन्मान होईल, अशी स्वप्नातही कल्पना केली नव्हती." असे भावोद्गार बोलून रंजना शिवगडे यांनी मनोगत व्यक्त केले.  प्रेक्षकांच्या उत्कृष्ट प्रतिसादाने रंजना शिवगडे यांनाही भरून आले होते. जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात एका सर्वसामान्य महिलेचा गौरव झाला, महिला सक्षमीकरणासाठी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. 



       पुढील कार्यक्रम म्हणजे नुकताच मुंबईत वक्तृत्व स्पर्धेचा कार्यक्रम झाला होता. त्यातील पारितोषिक विजेते दोन भाषणे खास लोकाग्रहास्तव या कार्यक्रमात सहभागी केली होती. श्रीमती रंजना शर्मा यांनी "श्रध्दा" या विषयावर आणि श्रीमती फडके यांनी "अस्वस्थ मनाची डायरी" या विषयावर  भाषणे सादर केली. श्रद्धेचे सुंदर विवेचन आणि अस्वस्थ मनाच्या विविध अवस्था आणि जगण्याचे संदर्भ यावर अतिशय सुंदर भाषणे झाली. त्यानंतर .... "आम्ही लेखिका" संस्थेतर्फे *काव्यकुंज* हा रसाळ कवितांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. प्रा.प्रतिभा सराफ, अंजना कर्णिक, डॉ.अलका नाईक, स्वाती लोंढे, पूजा काळे, जयश्री भिसे, पुष्पा कोल्हे, जयश्री चुरी, जयश्री चौधरी यांनी कविता सादर केल्या. पोवाडा, भारुड, गझल, बडबडगीत, सामाजिक कविता, भावगीत अशा विविध प्रकारच्या कवितांचा आनंद प्रेक्षकांनी घेतला. त्यामुळे वातावरण छानच रंगले. प्रत्येक कविता प्रेक्षकांची दाद घेत होती. सर्वच कविता अप्रतिम आणि मधुर होत्या पण पोवाडा आणि भारुड यांनी प्रेक्षकांची विशेष दाद घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा कोल्हटकर व सलोनी बोरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांनी एकत्रितपणे पसायदान करून कार्यक्रमाची सांगता केली. 



       अशा प्रकारे महिला दिनानिमित्त "आम्ही लेखिका" या अखिल भारतीय महिला साहित्य संस्थेचा हा विविधतेने नटलेला अनोखा स्तुत्य कार्यक्रम तितक्याच जोशात साजरा झाला. एकीकडे महिला दिनानिमित्त सेलिब्रेशन करणारी मंडळी आपण पाहिली तर दुसरीकडे सामाजिक बांधिलकी जपत साहित्याचा वारसा पुढे नेत अनोखा कार्यक्रम आयोजित करून संस्थेने एक उत्कृष्ट आणि सुंदर पायंडा घालून दिला आहे.


शिल्पा देवळेकर ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा