![]() |
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन.आंबटकर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
इचलकरंजी : इचलकरंजीचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. आंबटकर (वय वर्ष ५५) यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, १५ दिवसांपूर्वी अपघातात गंभीर जखमी झाले होते.मात्र शुक्रवारी सकाळी उपचार सुरु असताना मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.
न्या. आंबटकर हे शिरोळ तालुक्यातील यड्राव येथील पार्वती विद्यामंदिरा जवळ वास्तव्यास होते. मंगळवारी २१ मार्च रोजी रात्री नेहमीप्रमाणे ते यड्राव-जांभळी रस्त्यावर पायी फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी अनिल रामचंद्र जाधव (रा. जांभळी) याने बजाज डिस्कव्हर (क्र. एमएच ०९ डीडी ९६४५) ने भरधाव वेगात चालवून आंबटकर यांना पाठीमागून जोराची धडक दिली होती. त्यामध्ये रस्त्यावर आदळल्याने आंबटकर हे गंभीर जखमी झाले होते.त्यांना तातडीने उपचारासाठी इचलकरंजी व तेथून कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्याठिकाणी त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.
आठ दिवसापूर्वी त्यांचा ब्रेन डेड झाल्याने प्रकृती गंभीर झाली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न ठेवले होते, मात्र शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
राजकुमार आंबटकर हे जूनमध्ये इचलकरंजी येथे जिल्हा न्यायाधीशपदी रुजू झाले होते. त्यांचे जन्मगाव हे मंचर (जि. पुणे) असून शिवनेरी किल्ल्यापासून १० ते १२ किलोमीटर अंतरावर आहे. मुळगाव आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ गावचे सुपुत्र होते.
त्यांचे कायद्याचे शिक्षण हे सिम्बॉयसिस पुणे कॉलेजमधून झाले होते. कायद्याचा फार गाढा अभ्यास असून इंग्रजी भाषेवर खूप चांगले प्रभुत्व होते. त्यांचा स्वभाव अतिशय लाघवी व बोलका होता. फारच कमी कालावधीत इचलकरंजी मधील वकिलांशी यांचे ऋणानुबंध चांगल्या प्रकारे जोडलेले होते.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खास वैशिष्ट्य म्हणजे खास करून ज्युनिअर वकिलांना कायम मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहित करत होते. त्यांना संगीताची विशेष आवड होती. अल्प कालावधीमध्ये त्यांनी इचलकरंजीतील अनेक व्यक्तींची आपलेपणाचे नाते जपलेले होते.
मात्र या दुर्देवी अपघाती घटनेने इचलकरंजी सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा