Breaking

शनिवार, ८ एप्रिल, २०२३

आसामचा राजू शेट्टी


आसामचा राजू शेट्टी : आमदार अखिल गोगोई


    ज्येष्ठ विचारवंत व लेखक डॉ.महावीर अक्कोळे,जयसिंगपूर.


     सध्या मी आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश वैगेरे पूर्वोत्तर राज्यांच्या दौऱ्यावर आहे. आज शनिवारी आठ एप्रिलला आम्ही काझीरंगा अभयारण्यात फेरफटका मारून "काझीरंगा नँशनल ऑर्किड अँड बायोडायवर्सिटी पार्क"ला भेट दिली. अतिशय सुंदर आणि नियोजनबद्ध पद्धतीने या पार्कचा कारभार चालतो.तिथल्या उपहारगृहात जेवायला गेलो तेव्हा तिथे एक अगदी साधासुधा दिसणारा, कॉटनचा बर्म्युडा-शर्ट घातलेला तरुण माणूस भेटला. हा माणूस आसाम विधानसभेचा आमदार आहे असे जेव्हा "गिरिकंद"चा आमचा टूर मँनेजर जय शहाने सांगितले तेव्हा मी उडालोच !

त्याच्याशी गप्पा मारताना त्याची जी माहिती कळाली ती ऐकून मला आमच्या राजू शेट्टींची आठवण आली. मी त्याला "आसामचा राजू शेट्टी" हे नाव देऊन टाकले !

"अखिल गोगोई" हा तो आसामचा राजू शेट्टी !!

अठ्ठेचाळीस वर्षे वयाच्या अखिल गोगोईंनी "कृषक मुक्ती संग्राम समिती"नावाची संघटना स्थापन केली आहे. हीच संघटना सरकारी काझीरंगा पार्क चालविते.


       शिबसागर मतदारसंघातून निवडून आलेला हा शेतकरी नेता इथे भ्रष्टाचार विरोधी चळवळ मोठ्या नेटाने चालवितो.२००८मध्ये जेव्हा गोगोईंना षण्मुगम् मंजुनाथ पारितोषिक मिळाले तेव्हा त्यांनी साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. हे अवार्ड राष्ट्रीय एकतेसाठी होते.२०१०ला आसाम मधील ग्रामीण रोजगार योजनेतील एकशे वीस दशलक्ष रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आणल्या बद्दल त्यांना राष्ट्रीयमाहिती अधिकारा संबंधित पारितोषिक मिळाले. मोठ्या धरणांच्या भूमी अधिग्रहणविरोधी आंदोलन सुद्धा अखिल गोगोईंनी गाजवले आहे.

       सरकारने त्यांना माओवादी ठरवण्याचा प्रयत्न केला. पण ते म्हणतात मी डाव्या विचारांचा मार्क्सवादी आहे. जनतेच्या सामुहिक लढ्यावर माझा विश्वास आहे. काझीरंगा पार्कमध्ये तरुण मुले मुली, कलाकार, विद्यार्थी आणि कार्यकर्ते काम करतात.l

       चळवळीत सतत कार्यरत असलेल्या आसामच्या अखिल गोगोईंना इथल्या जनतेने प्रचंड पाठबळ दिले आहे. मी या आसामच्या राजू शेट्टीच्या प्रेमातच पडलो.आता आपण आपल्या राजू शेट्टींनाही प्रचंड पाठबळ द्यायला हवे.मग आपण आता काय करायला हवे ?आता लागूयाकी कामाला !! २०२४ला शेतकरी-कष्टकरी नेताच गेला पाहिजे लोकसभेत ! स्वाभिमान जपूया... स्वाभिमानीला आणूया !!

                    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा