![]() |
ऑनलाइन व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना मा. संपादक,विवेक भावसार |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : वैश्विक बदलत्या परिस्थितीमध्ये पत्रकारिता करत असताना केवळ माहिती मिळवून भागत नाही; तर त्या माहितीवर प्रक्रिया करावी लागते. त्यातूनच चांगल्या बातम्या वाचकपर्यंत पोहोचवणे शक्य आहे. मात्र हे करत असताना पत्रकारांनी लोकहिताला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत मुंबई येथील 'द एशियन एज'चे माजी विशेष बातमीदार तसेच 'द न्यूज 21' चे मुख्य संपादक विवेक भावसार यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग.गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात भावसार यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. भावसार म्हणाले, पत्रकारांनी माहितीसोबत डेटा संकलनावर भर दिला पाहिजे. डेटावर प्रक्रिया करून त्यातून वेगळी बातमी वाचकापर्यंत पोहोचवली पाहिजे. एकसारख्या पारंपरिक बातम्या देणे स्पर्धेच्या युगामध्ये संयुक्तिक ठरणार नाही. वाचकांची आवड बदललेली आहे. त्यानुसार वार्तांकन करणे आवश्यक आहे.पत्रकारांनी तटस्थ वार्तांकन केले पाहिजे असे सांगून ते म्हणाले, पत्रकार नेहमी लोकांच्या बाजूने असतो. समाजाचे विविध प्रश्न तो शासन दरबारी मांडत राहतो. लोकांच्या वतीने तो एका अर्थाने संघर्ष करत असतो. ग्रामीण भागामध्ये आज अनेक प्रश्न आणि आव्हाने आहेत. त्याची दखल पत्रकारांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. व्हिज्युअल स्टोरी टेलर आणि फोटो जर्नालिस्ट अभिजीत गुर्जर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा