![]() |
अंडर द लेन्स : फिल्म, जेंडर एंड कल्चर हा पुस्तक प्रकाशन सोहळा प्रसंगी सर्व मान्यवर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : भारतीय सिनेमाच्या जडणघडणीत दिलेले योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि ही बाब विस्मरणात जाऊ देणे योग्य नाही. अशा आपल्या कोल्हापुरात सिनेमा आणि संस्कृती, लिंगभावना या विषयांवर परिषद होते, पुस्तक प्रकाशित होते याचा मला सार्थ अभिमान आणि मनस्वी आनंद आहे असे प्रतिपादन प्रा. माया पंडित यांनी केले. त्या ‘अंडर द लेन्स : फिल्म्स, जेंडर अँड कल्चर’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या दरम्यान बोलत होत्या .
शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातर्फे १९ मे २०२३ रोजी सकाळी ११:३० वाजता ‘अंडर द लेन्स : फिल्म्स, जेंडर अँड कल्चर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. हे पुस्तक प्रा. डॉ. तृप्ती करेकट्टी, इंग्रजी विभागप्रमुख, आणि डॉ. चंद्रकांत लंगरे, सहयोगी प्राध्यापक, इंग्रजी विभाग यांनी संयुक्तरित्या संकलित व संपादित केलेले आहे, तर क्रिसेंट पब्लिशिंग कॉर्पोरेशन, नवी दिल्ली यांनी प्रकाशित केले आहे. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून आदरणीय प्रा. माया पंडित, माजी प्र-कुलगुरू, ईएफएल युनिव्हर्सिटी, तर प्रमुख समीक्षक म्हणून डॉ. अनमोल कोठाडिया, प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते, कोल्हापूर, यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय प्रा. पी. एस. पाटील, प्र-कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी भूषविले.
प्रकाशन सोहळ्याची सुरुवात डॉ. चंद्रकांत लंगरे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि परिचय करून दिला. सदर पुस्तकात २८ फेब्रुवारी ते २ मार्च २०२२ या कालावधीत पार पडलेल्या ‘एक्सप्लोरिंग द इंटरसेक्शन ऑफ लिटररी स्टडीज, फिल्म स्टडीज अँड जेंडर स्टडीज’ या आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय वेबिनार मध्ये सादर करण्यात आलेल्या निवडक शोधनिबंधांचे संकलन करण्यात आले आहे . त्यानंतर प्रा. तृप्ती करेकट्टी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि त्यातून सदर पुस्तकाचा आशय व प्रकाशनामागील उद्देश स्पष्ट केला. सोबतच सिनेमा, लिंगविचार आणि संस्कृती या संकल्पनांतील क्लिष्ट परस्परसंबंधांवरही भाष्य केले. तदनंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले.
चित्रपट समीक्षक डॉ. अनमोल कोठाडीया यांनी चित्रपटांचा समाजव्यवस्थेवर होणारा परिणाम यावर आपल्या खास शैलीत भाष्य करून श्रोत्यांची मने जिंकली. सिनेमा आणि लिंगविचार तसेच संस्कृती या विषयावर विचारविनिमय होण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली तसेच या प्रकारचे पुस्तक इंग्रजी विभागाकडून प्रकाशित होते याचे समाधान व्यक्त केले. सोबतच सदर पुस्तकाबाबतचे त्यांचे समीक्षणही सादर केले. प्रा . समर नखाते यांच्या लेखामधील प्रमुख मुद्द्यांबद्दल बोलून कोठाडियांनी हा लेख सिनेमा, त्याचे बदलते रूप आणि सामाजिक वास्तव हे समजण्यासाठी महत्वाचा आहे हे नमूद केले. पुस्तकातील शोधनिबंधांची विषयाला हाताळण्याची पद्धत मनाला भावली असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रा. माया पंडित यांनी कोल्हापूर शहर आणि भारतीय सिनेसृष्टीची सुरवात आणि प्रवास श्रोत्यांसमोर उलगडून दाखवला. त्यांनी विविध उदाहरणे देऊन सेन्सरशीप , स्त्रीचे एक क्रय वस्तू असे सादरीकरण याविषयी महत्वाचे प्रश्न उपस्थित केले. त्यांनी पुस्तकाच्या यशस्वी प्रकाशनासाठी प्रा. तृप्ती करेकट्टी, डॉ. चंद्रकांत लंगरे आणि इंग्रजी विभागाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. त्यांनी शिक्षणामध्ये सिनेमालाजागा द्यालच हवी आणि सिनेमा साक्षरताका वाढवायला हवी हे सुद्धा सांगितले.
अध्यक्षीय भाषणात मा. प्र-कुलगुरू प्रा . पी . एस . पाटील यांनी संमेलनापासून पुस्तक प्रकाशनापर्यंतच्या प्रवासात लागणाऱ्या निश्चय आणि सातत्याला दाद दिली. हिंदी , मराठी , इंग्रजी, कन्नड तसेच इटालियन सिनेमाच्या विवेचनामुळे हे पुस्तक खरोखरच बहुसांस्कृतिक झाले आहे आणि या सर्वच सांस्कृतिक परिस्थितीत स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन फारसा वेगळा नाही. प्रतिमांच्या भाषेतून काही मिनिटांची फिल्म किती गहन वक्तव्य करू शकते हे त्यांनी उदाहरणासह सांगितले. असे अनेक वेबिनार, कॉन्फरन्सेस आयोजित करण्यासाठी त्यांनी विभागाला प्रोत्साहन दिले. प्रकाशित केली जाणारी पुस्तके अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावीत म्हणून ती ऑडिओबुक स्वरूपातदेखील तयार करण्यात यावीत असेही त्यांनी सुचविले.
प्रकाशन सोहळ्याचा समारोप हा सुप्रिया पाटील यांनी आभार मानून केला तर मेघा कांबळे यांनी संपूर्ण कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाला इंग्रजी विभागातील प्राध्यापकवृंद तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा . रागूंनाथ ढमकले, अधिसभा सदस्य श्री. मिठारी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, डॉ . पारिजात , डॉ . डी. एन . पाटील, डॉ. अरुंधती पवार , डॉ. श्रुती जोशी तसेच इंग्रजी विभागातील एम. ए. आणि पी. एचडी. साठी प्रवेशित विद्यार्थीदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा