![]() |
मौजे धरणगुत्ती ग्रामपंचायत माझी वसुंधरा अभियाना राज्यात दुसरी |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : 'माझी वसुंधरा' अभियानातंर्गत ३० (२०२२-२०२३) मध्ये ५ ते १० हजार लोकसंख्या असलेल्या गटामध्ये राज्यस्तरावर मौजे धरणगुत्ती (ता. शिरोळ जि.कोल्हापूर) ग्रामपंचायतीने राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. हा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
माझी वसुंधरा अभियान ३० अंतर्गत भूमी, जल, वायू, आकाश आणि अग्नी या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन पर्यावरणाशी संबंधित प्रभावी अंमलबजावणी विहीत केलेल्या उद्दिष्ट पूर्तता करणाऱ्या संस्थांना दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन म्हणजे ५ जून रोजी राज्य शासनाच्या वतीने गौरविण्यात येते.
माझी वसुंधरा अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भूमी, जल, वायू, आकाश आणि अग्नी या पंचतत्त्वावर आधारित विहीत केलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी प्रत्येक नगरपरिषद व ग्रामपंचायतींना दर पंधरवड्याची उद्दिष्ट ठरवून देण्यात येत असतात. सदरची उद्दिष्टे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर अंमलबजावणीचा आढावा शासनाकडून घेतला जातो. घनकचरा व्यवस्थापक, सांडपाणी व्यवस्थापन, वृक्षारोपण व प्रदूषण निराकरण, सौरऊर्जेचा वापर आणि पर्यावरण सुरक्षा या दृष्टीने ग्रामपंचायत धरणगुत्तीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले होते. या उपक्रमांचे गुणात्मक परीक्षण करून ग्रामपंचायत धरणगुत्तीस सदरचा पुरस्कार देण्यात आला आहे. यापूर्वी तालुक्यात प्रथम स्थानी आणि कोल्हापूर जिल्ह्यात विभागून प्रथम क्रमांक देण्यात आला होता.
सदरच्या पुरस्काराकरिता ग्रामपंचायत धरणगुत्तीस पर्यावरण हिताच्या दृष्टीने शासन रक्कम १ कोटी २५ लाख रुपये देणार आहे.
सदरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ.विजया कांबळे, उपसरपंच जीवन रजपूत, सदस्य शेखर पाटील, भालचंद्र लंगरे व ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत केंबळे व अन्य सदस्य उपस्थित होते.
जय हिंद न्यूज नेटवर्क बोलताना, सरपंच सौ.विजया कांबळे व शेखर पाटील म्हणाले, सदरचा पुरस्कार हा गावातील तमाम नागरिकांनी, विविध तरुण मंडळे, संस्था, शाळा, ग्रामपंचायत सदस्य-कर्मचारी,निसर्ग प्रेमी, शासकीय यंत्रणा व अन्य घटकांनी केलेल्या सहकार्यामुळे हे यश संपादन करता आले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी केलेली मदत ही महत्त्वाची आहे. यापुढे माझी वसुंधरा अभियानाचा हे कार्य असंच चालू राहणार आहे. यापुढेही गावातील नागरिकांचा सर्वांगीण विचार करिता त्यांच्या सेवेसाठी मौजे धरणगुत्ती ग्रामपंचायत कटिबद्ध आहे. या निमित्ताने सर्व घटकांचे आभार ही व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा