![]() |
कालवश प्रा. राजकुमार मिश्रीकोटकर |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने मुख्य संपादक*
जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीचे जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर चे ज्युनिअर विभागातील सेवानिवृत्त प्राध्यापक राजकुमार मिश्रीकोटकर यांचे आज रविवार दिनांक ११ जून,२०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले.
प्रा.राजकुमार मिश्रीकोटकर हे जयसिंगपूर कॉलेजचे माजी सेवा निवृत्त प्राध्यापक होते. मुळात कालवश प्रा. मिश्रीकोटकर हे नागपूर जिल्ह्यातील असून ते आर्थिक दृष्ट्या संपन्न कुटुंबातील होते.मिश्रीकोटकर कुटुंब हे व्यावसायिक होते. परंतु शिक्षणाचा ध्यास, अध्यापनाची आवड व शैक्षणिक व सामाजिक परिवर्तन करण्याच्या हेतूने शिक्षकी पेशा निवडला. यासाठी ते थेट नागपूर हून जयसिंगपूर शहरात आले. सन १९८४-८५ मध्ये थेट मुलाखतीच्या माध्यमातून जयसिंगपूर कॉलेज मध्ये रुजू झाले. ज्युनियर विभागातील वाणिज्य शाखेकडे शिक्षक म्हणून आपल्या कार्याला सुरुवात केली आणि अल्पावधीतच आपल्या परिपूर्ण ज्ञान,उत्तम वाणी व सक्षम अध्यापन कौशल्याच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक बनले. त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत आनंदी, प्रसन्न व रुबाबदार व्यक्तिमत्व, शांत-संयमी व मधुर वाणीच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षण क्षेत्रातील व इतर समाज घटकांना त्यांनी आपलंसं केलं होते. अध्यापनात असलेल्या हातोटीच्या माध्यमातून सहकार विषय विद्यार्थ्यांच्या आवडीचा बनवण्यामध्ये ते विद्वत्त होते.
बारावी बोर्ड परीक्षेचे केंद्र संचालक म्हणून त्यांनी उत्तम व यशस्वी कामगिरी केली. त्यांची एकूणच शैक्षणिक व उपप्राचार्य म्हणून प्रशासकीय कामगिरी वाखाण्याजोगी होती. कालवशा प्रा.निर्मळे व प्रा. मिश्री कोटकर या जोड गोळीने कॉलेजच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. कॉलेजमधील हक्काचा व जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.
कॉलेजच्या शैक्षणिक प्रगती मध्ये त्यांचा सहभाग महत्त्वाचा व सक्रिय होता. संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ज्युनियर कॉलेजची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. कॉलेजमधील अनेकांत ग्राहक सहकारी भांडाराच्या माध्यमातून विद्यार्थी हित जपत उत्तम सेवा बजावली आहे. आजतागायत कालवश प्रा. मिश्रीकोटकर यांनी अनेकांत नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्यशील संचालक म्हणून ग्राहक व पतसंस्थेच्या आर्थिक प्रगतीच्या वाटचालीसाठी शेवटपर्यत प्रयत्नशील होते. प्रा. मिश्रीकोटकर हे सेवानिवृत्त झाल्यानंतर ही त्यांनी आपली शैक्षणिक व वैचारिक नाळ कॉलेजशी जोडून ठेवली होती.
प्रा. मिश्रीकोटकर यांच्या निधनाची दुःखद वार्ता समजताच समस्त आजी माजी प्राध्यापकवृंद,विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी व सेवक दुःख सागरात बुडाले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा व मुलगी आहे.
या दुःखद प्रसंगी जयसिंगपूर कॉलेज स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ.महावीर अक्कोळे, खजिनदार श्री.पद्माकर पाटील, संस्थेचे सर्व सदस्य व कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांनी शोक व्यक्त केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा