Breaking

रविवार, २५ जून, २०२३

*एन.एस.एस.स्वयंसेवकांनी पंढरपूर आषाढी वारीत मनोभावे वृत्तीने सेवा केली प्रदान*


आषाढी वारी निमित्त कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, प्र. कुलसचिव,डॉ. विजय कुंभार व एन एस एस कक्षाचे संचालक डॉ. तानाजी चौगले व कार्यक्रम अधिकारी


*प्रा.डॉ. प्रभाकर माने मुख्य संपादक*


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारीमध्ये सेवा प्रदान केली. स्वच्छ वारी, निर्मल वारी, स्वस्थ वारी, हरित वारी आणि यंदाचे विशेष म्हणजे प्लास्टीकमुक्त वारी अशी विविध अभियाने व उपक्रम वारीमध्ये राबविण्यात आली. हे अभियान १८ ते २२ जून या कालावधीत लोणंद ते फलटण या मार्गावर यशस्वीरित्या राबविण्यात आले.

    शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी लोणंद येथे माऊलींच्या पालखीचे दर्शन घेऊन स्वागत केले आणि लोणंदच्या नीरा घाटावर राष्ट्रीय सेवा योजनेच्या या स्वच्छ व हरित वारी अभियानाचे उद्घाटन केले. यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. डी.के. मोरे, राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. तानाजी चौगले, शरदचंद्र पवार महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. डी. बी. जाधव तसेच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्र. कुलसचिव डॉ.विजय कुंभार, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्र.संचालक डॉ. एन.बी. माने यांच्यासह कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.

     सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजनेचे १५० विद्यार्थी-विद्यार्थिनी या स्वच्छता अभियानात सहभागी झाले. दि. १९ व २० जून रोजी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी भोवतीची गर्दी नियंत्रित करण्यासाठी स्वयंसेवक पोलीस मित्र म्हणून कार्यरत होते. लोणंद येथे परिसर स्वच्छता आणि प्लास्टिक कचरा संकलन करून नगरपरिषदेच्या व्यवस्थेकडे सुपुर्द करण्यात आला. माऊलींच्या पालखी रिंगण सोहळ्यासाठी तरडगावनजीक स्वयंसेवकांनी शिस्तपालन तसेच गर्दी नियंत्रणासाठी पोलिस प्रशासनाला मदत केली. पालखी प्रस्थानानंतर संपूर्ण परिसराची स्वच्छता श्रमदानातून केली. दि. २१ जून रोजी फलटण येथे श्रमदानासह स्वच्छता तसेच दिंडी परिसरात पथनाट्ये सादर करून वारकऱ्यांचे प्रबोधन केले. २२ जून रोजी फलटण विमानतळ परिसर तसेच रस्ते कचरा व प्लास्टिकमुक्त करण्यासाठी स्वयंसेवकांनी खूप परिश्रम घेतले. नगरपरिषदेने पुरविलेल्या गोण्यांमध्ये परिसरातील संपूर्ण प्लास्टिकचा कचरा भरून त्या पुढील विल्हेवाटीसाठी प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या.

  फलटणच्या मुधोजी महाविद्यालयात वारी शिबीराचा समारोप समारंभ झाला. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शिंदे, माजी एन.एस.एस. संचालक डॉ. सुधीर इंगळे, प्रा.पाडवी, प्रा. संदिप पाटील, अमोल कुलकर्णी, विद्यापीठाच्या एन.एस.एस. विभागातील किरण पवार आदी उपस्थित होते. डॉ. सुधीर इंगळे आणि डॉ. तानाजी चौगले यांच्या हस्ते स्वयंसेवकांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा