Breaking

बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३

*जयसिंगपूर कॉलेजचा धृवतारा : प्रसिद्ध धन्वंतरी डॉ.सुभाष अडदंडे*


जयसिंगपुरातील प्रसिद्ध धन्वंतरी व संवेदनशील व्यक्तिमत्व डॉ.सुभाष अडदंडे अमृतमहोत्सवी वाढदिवस


         जयसिंगपूर कॉलेज या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ.सुभाष अडदंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माझ्या नजरेतून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उलगडा करण्याचा व त्यांच्या कर्तुत्वाला सलाम करण्यासाठीचा  हा प्रयत्न आहे. सन २००४ मध्ये अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीचे जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर या शैक्षणिक संस्थेची सचिव पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी अल्पावधीतच कॉलेजच्या पूर्ण इमारत व कॅम्पसचा चेहरामोहरा बदलून कॉलेजचे रूप पालटले. जयसिंगपूर सारख्या निमशहरी भागात असलेल्या या कॉलेजला सन २०१५ व २०२२ मध्ये NAAC सारख्या राष्ट्रीय मुल्यांकन करणाऱ्या संस्थेकडून ‘A ‘ ग्रेडचे प्राप्त झालेले मानांकन हे त्यांच्या दुरदृष्टी व सातत्याने लक्ष घालून  केलेल्या कामाची  पोचपावती आहे हे विसरून चालणार नाही त्यामुळे त्यांचे योगदान  मोलाचे आहे. मी विद्यार्थीदशेत  असताना पाहिलेले   कॉलेज आणि सन २०२३  मधील कॉलेज यामध्ये शैक्षणिक व भौतिक प्रगतीची प्रचंड तफावत दिसते आहे हे सर्व डॉ.सुभाष जी यांचेमुळे शक्य झाले आहे. 

डॉ. अडदंडे जरी पेशाने डॉक्टर असले तरी त्यापेक्षा वेगळ्या भूमिकेतून त्यांची कॉलेज प्रशासनावर असलेली सकारात्मक वचक  आहे.  महत्त्वाची आहे. साहेबानी  कॉलेज विकास कामासाठी केलेल्या  कार्यकर्तुत्वाचा आलेख म्हणजे अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कूलअँड ज्युनिअर कॉलेज. नव्याने तयार केलेले स्विमिंग टंक ,छ.शिवाजी महाराज इनडोअर स्टेडियम ,उत्कृष्ट बांधकामाचा नुमना म्हणजे बटरफ्लाय गार्डन, नक्षत्र गार्डन ,बॉटनीकल गार्डन व नव्याने बांधलेले सुंदर कॅन्टीन होय.कॉलेज इमारतीचे विस्तारीकरण असो किंवा इतर कोणतेही बांधकाम असो प्रत्येक ठिकाणी त्यांचा उत्तम प्रशासन,कुशल नेतृत्व व प्रंचड सहनशीलता यासारखे  गुण दिसून येतात. तसेच त्याचे कार्य फक्त कॉलेज पुरते मर्यादित न ठेवता त्यांनी जयसिंगपूर शहरात बंद पडण्याच्या मार्गावर असणाऱ्या एका पतसंस्थेला योग्य नियोजन व उत्तम प्रशासनाच्या जोरावर आर्थिक फायदात आणून त्यास   अनेकांत नागरी पतसंस्था या नावाने त्याला उर्जितावस्था प्राप्त  करून दिली. सध्या त्या पतसंस्थेची उलाढाल कोटीमध्ये आहे व याचा सर्वात मोठा फायदा कॉलेज मधील घटकांना होतो याचे सर्व श्रेय डॉ.सुभाषजी यांना जाते. 

       एक गोष्ट मात्र मला जाणीवपूर्वक सांगावे लागेल की कॉलेज व कॅम्पसबाबत सखोल व संपूर्ण माहिती असलेला एकमेव व्यक्ती डॉ.सुभाषजी होय.ज्या व्यक्तीला ही संस्था आपलीशी वाटते त्यालाच हे सर्व माहित असते.  कॉलेज हे आपले कुटुंब मानून त्या कुटुंबाच्या विकासासाठी सातत्याने धडपडणारे  डॉक्टर साहेब कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून कार्य करताना दिसतात व  त्यांची कॉलेजच्या कामाबाबतची तत्परता सदैव दिसते. कॉलेजमध्ये नव्याने काही करावयाचे असेल तर कॉलेजमध्ये जुने काही शिल्लक साहित्य आहे का याची खातरजमा करून त्याचा पर्याप्त वापर कसा करता येईल असा विचार करणारा व्यक्ती म्हणजे डॉ.सुभाष जी होय.यातून त्यांचा काटकसरी स्वभाव व कार्य तत्परता दिसून येतो. कॉलेजमध्ये एखाद्या व्यक्तीने कोणतीही संकल्पना मांडली जर ती विद्यार्थी व कॉलेज हिताय असेल तर डॉक्टर साहेब  त्याचा सांगोपांग विचार करून त्याची प्रत्यक्षात कार्यवाही करतात असे करणे म्हणजे उक्तीला कृतीची जोड देणारे  दृढनिश्चयी व्यक्तिमत्तव दिसून येते.

         सन २०१८ मध्ये दुर्दैवाने आमच्या कॉलेजच्या रसायनशास्त्र प्रयोगशाळेला आग लागून ती भस्मसात झाली.मात्र डॉक्टर साहेब काही काळासाठी भावनाविवश झाले. अर्थात ते खूप दुखावले.पण स्वत:ला सावरत  न डगमगता त्यांनी संकल्प केला होता की जर विद्येच्या केंद्राला आग लागून विद्यार्थी व कॉलेजचे नुकसान होत असेल तर यासाठी सर्व् सोयीनियुक्त नव्या वास्तूची उभारणी करणार आहे. त्यासाठी त्यांनी अधिकारवाणीने प्राध्यापक,प्रशासकीय सेवक,विद्यार्थी व समाजातील दानशूर व्यक्तीना त्यांनी आव्हान केले.अर्थात त्यांच्या या आव्हानाला या कॉलेजप्रेमी लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.त्याद्वारे त्यांनी अल्पावधीत एका दिमाखदार वास्तुरूपी प्रयोगशाळेची उभारणी करून त्यांनी आपला संकल्प पूर्ण केला. असे हे दृढनिश्चयी  व आलेल्या संकटाला सामोरे जाणारे खंबीर व्यक्तिमत्व म्हणजे  डॉक्टर साहेब होय.

    आमची संस्था जैन अल्पसंख्याक असूनही इथे फक्त जैन समाजाच्या लोकांनाच नोकरीस घेतले जाते असा प्रकारचा गैरसमज दूर करून सन २००४ पासून ते २०२३ पर्यंत त्यांनी नोकरीसाठी बहुसंख्येने बहुजन समाजातील व्यक्तीना कायम स्वरूपाची नोकरी देवून त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांचे जीवन प्रकाशित करण्याचे सत्कार्य त्यांनी केले. तसेच कॉलेज  कॅम्पसमध्ये जात, धर्म व राजकारण यांना  तिलांजली आपल्या कार्यातून दिली आहे. 

  डॉ.सुभाष अडदंडे यांचा स्वभाव वरवर कडक व कठोर वाटत असला तरी ते फणसा सारखे  आहेत.दिसताना काटेरी व आतील गर मात्र गोड व रसाळ आहे. त्यांच्या कडक व कठोर स्वभावाचा फायदा विद्यार्थी,कॉलेज व प्रशासन हिताय आहे हे सर्वाना माहित आहे. त्यांच्या या गरुडझेपी  नेतृत्वामुळे कॉलेजचा  कायापालट झाला आहे. ते नेहमी हक्काने सांगतात की प्राध्यापक हे कर्तुत्ववान व गुणवंत असले पाहिजेत त्यासाठी त्यांना  आवश्यक असणाऱ्या सर्व  भौतिक सोयी सुविधा पुरविल्या जातील अशा प्रकारचे अलिखित अभिवचन त्यांनी दिले होते.त्यासाठी त्यांची तळमळ दिसून येते. शिक्षण क्षेत्रात अशा प्रकारचे  काम करणारी व्यक्ती ही शिक्षण सुध्रारकच असू शकते हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. 

  योग्य वस्तू योग्य त्या ठिकाणी असण्यासाठीचा त्यांचा सकारात्मक अट्टाहास खूप महत्वाचा आहे. त्यांची वाहन तळाबाबतचा शिस्त ही खूप भावणारी आहे.स्वतः संस्थेचे अध्यक्ष असूनही वाहन तळावर गाडी पार्क करून कॉलेज इमारतीकडे चालत जाणारा हा शिस्तप्रिय माणूस आहे. सद्याच्या काळात त्यांची ही शिस्तबद्धता अनुकरणीय व वाखाण्याजोगी आहे. एका मोठ्या संस्थेचा प्रमुख व पेशाने डॉक्टर असूनही एका शेतकरी चळवळीला विविध स्वरुपात बळ देण्याचे काम अविरतपणे ते  करीत आहेत. सन २००५ व सन २०१९ मधील महापुरासाठी त्यांनी दिलेले योगदान व समाजाप्रति असणारी बांधिलकी आमच्या सारख्या बुद्धीजीवी लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम करते.

  डॉ.सुभाष जी हे संस्थाचालक असूनही त्यांच्या मार्गदर्शनाखाली व  प्राचार्य डॉ.सूरत मांजरे यांना दिलेल्या पूर्ण मोकळीकतेमुळे या पंचक्रोशीत किंबहुना शिरोळ तालुक्यात जयसिंगपूर कॉलेज हे शिक्षण,कृषी ,सांस्कृतिक व साहित्य क्षेत्राबरोबर वैचारिक चळवळीचे एकमेव केंद्र बनले आहे.याचे श्रेय डॉक्टराना जाते.त्यांनी सरावाने मराठी,इंग्रजी व हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळविले आहे. कॉलेज च्या कोणतेही सेमिनार असो की वैचारिक उपक्रम असो त्यांच्या भाषेवरील पकड दिसून येते. त्याचे अलीकडील काळातील एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी  एका वेबिनारमध्ये दुग्ध विषयावर  हिंदी भाषेत केलेली अभ्यासपूर्ण मांडणी होय. या सर्व माहितीवरून हे लक्षात येते की त्यांनी कॉलेजच्या प्रतिमेला उभारी देण्याचे काम  करीत आहेत. तसेच  शैक्षणिक विकासात्मक प्रगतीला साथ देणारे तत्कालीन माजी अध्यक्ष कालवश श्री.ल.क.अकिवाटे गुरुजी व तत्कालीन एल.एम.सी.पदाधिकारी व सदस्य,माजी अध्यक्ष श्री.पद्माकर पाटील ,विद्यमान सचिव श्री.डॉ.महावीर अक्कोळे  व विद्यमान एल.एम.सी.पदाधिकारी व सर्व सदस्य महत्वाची आहे. मा.प्राचार्य,डॉ.सूरत मांजरे, सर्व उपप्राचार्य, सुपरवायझर ,महाविद्यालयीन विकास समितीचे सर्व सदस्य ,सर्व प्राध्यापक ,ग्रंथपाल,फिजिकल  डायरेक्टर,कार्यालयीन अधिक्षक ,प्रशासकीय कर्मचारी, सेवक व हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांची साथ मिळून या  ऐतिहासिक विकासाची साक्षीदार बनले आहेत तसेच  याकामी त्यांची  मदत मोलाची आहे. 

सरतेशेवटी एवढंच सांगेन की डॉ.सुभाष जी नावाप्रमाणे तेजस्वी असून त्यांनी विद्यार्थी ,कॉलेज व समाजासाठी देलेले योगदानही तेजस्वी व  वाखाण्याजोगे आहे. दररोज व्यायाम व न चुकता पोहण्याच्या जोरावर त्यांनी तरुणाला लाजवेल व भावेल असे स्वतःचे एवरग्रीन व्यक्तिमत्व बनविले आहे जे  प्रत्येक व्यक्तिला आनंदी ठेवण्याचे काम करते.कामात वक्तशीर असणारे ,सडेतोडपणे बोलणारे,,सामाजिक बांधिलकी जपणारे,वरवर गंभीर वाटत असले तरी मृदू व संयमी व्यक्तिमत्व, विद्यार्थी हिताय काम करणारे,कडक , शिस्तप्रिय, दृढनिश्चयी व खंबीर व्यक्तिमत्वाला नमन करतो. कित्येक लोकांच्या चुकीवर मोठ्या मनाने पांघरूण घालणारे, संकटात मदतीचा हात व साथ देणारे आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व हे समाजाला व आजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व आमच्या सारख्या लोकांना मार्गदर्शी आहे.अशा या विद्यार्थीप्रिय  व कॉलेजवर मनापासून प्रेम करणाऱ्या या बहुआयामी व्यक्तित्वाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व अभिष्ट चिंततो. त्यांचे भावी आयुष्य आनंदीमय राहो व त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी अपेक्षा व्यक्त करतो. 

---------------

                      

  प्रा.डॉ. प्रभाकर तानाजी माने 

सहयोगी प्राध्यापक व प्रमुख अर्थशास्त्र विभाग

 जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा