Breaking

शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३

१८ महिने झाले तरी फेलोशीप नाही. संशोधक विद्यार्थ्यांचे बार्टी, पुणे येथे आमरण उपोषण.

उपोषणास बसलेले संशोधक विद्यार्थी 


मालोजीराव माने - कार्यकारी संपादक 


    पुणे :- सन २०२२ या सालामध्ये मध्ये अनुसुचित जाती प्रवर्गातील पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेली संशोधन अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) १८ महिने झाले तरी अद्याप मिळाली नाहीये. त्यासाठी नोंदणी केलेल्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी म्हणून बुधवार दिनांक 20 सप्टेंबर पासून बार्टी कार्यालयासमोर संशोधक विद्यार्थी आमरण उपोषणास बसले आहेत.

      अनेक वेळा आंदोलन करूनही फेलोशिप दिली जात नाहीये, प्रत्येक वेळी बार्टी प्रशासनाकडून फक्त आश्वासने दिली जातात. परंतु यावेळेस फेलोशिप मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा सर्व विद्यार्थ्यांनी केला आहे. उपोषणास बसलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती आता खालावली आहे, पण प्रशासनाकडून अद्याप त्याची दखल घेतली गेली नाहीये.

     मागच्या वर्षी बार्टीने नोंदणी केलेल्या सर्व संशोधक विद्यार्थांना सरसकट फेलोशिप मंजूर केली होती त्याच धर्तीवर २०२२ मध्येही पीएच.डी साठी नोंदणी केलेल्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांना तात्काळ फेलोशिप मंजूर करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.



     या आंदोलनात राज्यातील अनेक जिल्ह्यातून आंदोलक विद्यार्थी एकत्र आले आहेत. यामध्ये  रेखा इंगळे, दिलीप वाघमारे, सचिन गणकवार, दयानंद जयंन्नावर, अश्र्वजित गंगावणे, प्रतीक झाडे, विजया नगराळे, आदित्य राऊत, अमोल देशमुख, प्रशांत साबणे, प्रसेनजीत कांबळे, सरला पानतावणे, कुमार चौधरी, सिद्धार्थ काटकोळे, कैलास गायकवाड, अविनाश आगळे आदींनी उपोषणात सहभाग घेतला आहे.

    घरची परिस्थिती हालाखीची असूनही पूर्णवेळ संशोधनासाठी प्रवेश घेतला होता, संशोधनासाठी पूर्ण पश्चिम महाराष्ट्र फिरावे लागते, त्यासाठी बराच खर्च लागतो, पण दोन वर्ष होत आले तरी अजुन एकही रुपया फेलोशिप मिळाली नाहीये, आता खर्च परवडत नसल्यामुळे शिक्षण सोडून देण्याचा विचार येत आहे.

दयानंद जयंन्नावर, संशोधक विद्यार्थी - कोल्हापूर'


    जाणून बुजून आमच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, तरी आमच्या हक्काची फेलोशिपची रक्कम खात्यात पडल्याशिवाय माघार घेणार नाही. करू अथवा मरू.

अश्र्वजित गंगावणे, संशोधक विद्यार्थी - धाराशिव


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा