Breaking

सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये 'मेरी माटी मेरा देश' उपक्रम उत्साहात साजरा*


मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत अमृत कलशामध्ये माती घालताना संस्थेचे संचालक शशांक इंगळे व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व अन्य मान्यवर


*प्रथमेश कोळी :  विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर :  जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत विविध गावातून संकलित केलेली मूठभर माती अमृत कलशामध्ये अर्थात माठात संस्थेचे सदस्य,प्राचार्य, प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी, सर्व कॉलेजचे विद्यार्थी यांच्याद्वारे संकलित करण्यात आली. या उपक्रमास विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला.


     सुरुवातीस रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला.

       यानंतर कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, मेरी माटी मेरा देश हा केंद्र शासनाचा उत्कृष्ट उपक्रम असून या उपक्रमाच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील विविध गावातील माती या माठाच्या अमृत कलशामध्ये संकलित केली जाणार आहे.  त्याचबरोबर सदरची संकलित केलेली मातीचा अमृत कलश हा दिल्लीला पाठवण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण देशातून अमृत कलश एकत्र करून त्याद्वारे संकलित केलेली मातीच्या माध्यमातून अमृत वन निर्माण केले जाणार आहे. खरोखरच केंद्र शासनाचा हा राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचा हेतू प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे. या उपक्रमामध्ये 'माटी को नमन- वीरों को वंदन' हा उपक्रम राबविला गेल्याने खऱ्याखुऱ्या भारतीत्वाचं दर्शन दर्शन घडले आहे.

     स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य मा. बाळासाहेब शशांक इंगळे मार्गदर्शन करताना म्हणाले, भारतीय संस्कृतीचा वारसा जोपासणारा व गौरवशाली इतिहासाचे सादरीकरण करणारा हा उपक्रम रुपी सोहळा विद्यार्थी व समाजामध्ये राष्ट्र चेतना व राष्ट्रप्रेम निर्माण करीत आहे.

   आझादी का अमृत महोत्सव हा भारत सरकारचा स्वातंत्र्याची 75 वर्षे आणि भारतीय लोकांचा, संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करण्यासाठी आणि त्याचे स्मरण करण्यासाठीचा उपक्रम आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून केंद्र शासन व राज्य शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार मेरी माटी मेरा देश हा उपक्रम संपूर्ण देशभर साजरा केला आहे.

    या कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी डॉ. के. डी. खळदकर यांनी मानले. या उपक्रमाचं उत्तम नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने करण्यात आले. 

   यासाठी शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. तानाजीराव चौगले यांचे मोलाचे विशेष मार्गदर्शन लाभले.

       या कार्यक्रमास प्र.कार्यालयीन अधीक्षक श्री. ए.बी कांबळे, उपप्राचार्य भारत आलदर ,डॉ. विजयमाला चौगुले,प्रा. सुरज चौगुले, प्रा.एम.एस.बागवान,प्रा. माधुरी कोळी, प्रा.आर.के.कांबळे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा