Breaking

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३

*सरकारी धोरण आणि शेतकऱ्यांचे मरण हे चित्र बदलल पाहिजे : मा. खासदार राजू शेट्टी यांचे प्रतिपादन*

 

परिसंवादात मार्गदर्शन करताना माजी खासदार राजू शेट्टी, प्राचार्य डॉ.डी.के.पाटील, प्राचार्य बाबासाहेब पाटील, प्रा.एम.जी.पाटील,डॉ. मनोहर कोरे,प्रा. शांताराम कांबळे व डॉ. शकुंतला पाटील


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


इचलकरंजी  :  येथील जयवंत महाविद्यालयात  शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन कोल्हापूर आणि जयवंत महाविद्यालय, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने  "शेती व शेतकऱ्यांसमोरील आव्हाने "  या विषयावर  परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना  प्रमुख मार्गदर्शक मा. खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी  'शेतकरी  हा जगाचा अन्नदाता  आहे  तो जगला तरच तुम्ही आम्ही जगू ' असे मत मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बाबासाहेब पाटील होते.

      या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रो.डाॅ.शकुंतला पाटील यांनी केले.शेती व शेतकऱ्यासमोरील आव्हानांचा सविस्तर आढावा घेत  कार्यक्रमाची भूमिका  विशद केली.  

     या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक मा. राजू शेट्टी  यांच्या हस्ते जलार्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी  प्रवीण माळी, राहूल कुरणे, श्रूती बाबर, विजय पोपटे, गुड्डू भगत या  विद्यार्थ्यांनी बनविलेल्या 'शेती, शेतकरी यांच्या   समोरील अव्हाने'  या  विषयावर  केलेल्या पोस्टर  प्रदर्शन चे उद्घाटनही मा.शेट्टी.यांचे हस्ते संपन्न झाले.


       मा.राजू शेट्टी मार्गदर्शन करताना म्हणाले, प्राचीन काळापासून आजपर्यतच्या शेती विकासाचा आढावा घेत  आज  या अन्नदात्या समोर  जगण्याविषयी अनेक जी आव्हाने नव्याने निर्माण झाली आहेत त्यावर प्रकाश टाकला. 'सरकारी धोरण आणि शेतकऱ्यांचे मरण'   हे चित्र बदललं पाहिजे   यासाठी शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चानुसार  दीडपट  हमीभाव मिळाला पाहिजे.  कमी दराने कर्जपुरवठा करून त्याचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे साठवणुकीच्या सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतीला देवून शेती किफियतशीर बनविणे गरजेचे आहे तरच युवा पिढी शेती व्यवसायाकडे वळेल  असे मत मांडले. 

  यावेळी महाविद्यालयात शैक्षणिक वर्षात  प्राविण्य मिळवलेल्या    प्राजक्ता सावंत, प्रवीण माळी, आरती पवार  त्याचबरोबर  राजश्री बारदाते, अर्पिता हिंगमिरे  या विद्यार्थ्यांचा सत्कार मा.राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.

     यावेळी शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनोमिक असोसिएशनचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ.डी.के.पाटील  यांनी  भारतीय शेती  व शेतकरी  यांची दयनीय अवस्था  होण्यास  नैसर्गिक घटकापेक्षा सरकारी  धोरणे मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे मत आपल्या मनोगतात मांडले.

       या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना प्राचार्य डॉ.बाबासाहेब पाटील म्हणाले, शेती व शेतकरी यांची हेळसांड चिंताजनक असून त्याबाबत सरकारने शेतकरी व शेती हितांचे निर्णय घेतले पाहिजेत त्यासाठी आपण सर्वजण दक्ष राहणे  ही काळाची गरज असल्याचे परखड मत मांडले.

     या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन  डॉ. वैजंयता पाटील यांनी  मानले. या कार्यक्रमाचे उत्तम संयोजन प्रा. शांताराम कांबळे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक,असंख्य विद्यार्थी,शेतकरी,  सुयेकचे  पदाधिकारी  प्रा.एम.जी.पाटील (सुयेक कार्याध्यक्ष), प्रा.मनोहर कोरे, प्रा. दीपक चव्हाण, डाॅ. वाय.ए.आवळे, डाॅ. वैजयंता पाटील, डाॅ.माधुरी खोत, प्रा.अक्षय माने, प्रा. मल्लिकवाडे  यांच्यासह अनेक मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा