*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या एसयुके रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशन या इनक्युबेशन सेंटरच्या 'स्टार्टअप सुत्रा' व्याख्यानमालेच्या नवव्या सत्रामध्ये बोलताना कोल्हापूर उद्योग विकास केंद्राचे सहाय्यक संचालक श्री. बसवराज आवटे यांनी नवउद्योजक विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, आता विद्यार्थ्यांनी नोकरी मागायला न जाता जिल्हा उद्योग विकास केंद्राकडे यावे व आपला उद्योग सुरू करावा. आपण जर श्रीमंत होण्याची स्वप्ने बघून चिकाटी ठेवल्यास कोणत्याही उद्योगात यशस्वी होवू शकतो. त्याकरीता शासन आपल्या पाठीशी नक्कीच उभे राहते. त्यांनी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत नवउद्योग सुरू करणा-या युवक-युवतींना एक करोडपर्यंत आर्थिक सहाय्य मिळू शकते व त्यामध्ये पस्तीस टक्के अनुदान शासन देते, त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी ठरवावे व आमच्याकडे यावे असे आवाहन केले. शासनाच्या स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया व एकत्रित प्रोत्साहन योजना अशा विविध योजना असून त्यामध्ये अधिकृत नवउद्योजकांना स्टॅप ड्युटी, जीएसटी, इलेक्टिक ड्युटी व इनकमटॅक्स यामधून भरघोस सुट देण्यात आली आहे असे सांगितले.
जिल्हा उद्योजकता विकास केंद्रामार्फत उद्योग सुरू करण्याचे मार्गदर्शन करण्याकरीता प्रशिक्षण वर्ग घेतले जातात त्यास विद्यार्थ्यांनी आवश्य हजेरी लावावी असे सांगून विद्यार्थ्यांच्या मनातील उद्योग सुरू करण्याबाबतची भीती घालवून त्यांचा आत्मविश्वास वाढवला.
अध्यक्षस्थानावरून शिवाजी विद्यापीठाचे मानव्य अधिष्ठाता व संचालक नवोपक्रम प्रा. डॉ. एम्. एस्. देशमुख बोलताना म्हणाले की, आता शिवाजी विद्यापीठ विद्यार्थ्यांना उद्योग सुरू करून देण्यास तयार असून विद्यार्थ्यांनी निसंकोचपणे विद्यापीठाच्या एसयुके आरडीएफ या केंद्रास भेट द्यावी व आपला उद्योग विद्यापीठातच सुरू करावा. त्यास विद्यापीठ पूर्णपणे सहकार्य करेल. सध्या विद्यापीठात २७ नवउद्योग सुरू असून त्यांना विद्यापीठाने सर्वतोपरी सहकार्य केले आहे. विद्यापीठ आणि शासन एकत्र आल्यास विद्यार्थ्यांचे उद्योग सुरू व्हायला अडचणी येणार नाहीत, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना एसयुके आरडीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. डी.राऊत तर आभार प्रदर्शन डॉ. अभिजीत गाताडे यांनी केले.
या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा