घरची हलाखीची परिस्थिती, एकवेळ घरी जेवणाची आभाळ ते एकाच वेळी राज्य विक्रीकर निरीक्षक, राज्यात ३ रा व दुय्यम निबंधक निरीक्षक गट ब ,राज्यात ४ था, अशी आदर्श उत्तुंग भरारी... हे यश आहे मंगेशनगर, कोथळीचे सुपुत्र दिपक सुरेश इंगळे याचे.
कठीण परिस्थिती समोर हार न मानता तेवढ्याच ताकदीने लढत त्या परिस्थितीवर मात करणाऱ्या दिपक चा हा प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहे.
दिपकच्या या यशामागे त्याची हुशारी, जिद्द आणि चिकाटी आहेच पण त्याचबरोबर त्याचा विनम्र शांत स्वभाव व प्रामाणिकपणा देखील आहे. समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला तो विनम्रतने सामोरे जातो. ही विनम्रताच त्याला ढळू न देता अविरतपणे कष्ट करण्याची उमेद देते.
![]() |
दिपक व त्याचे आई - वडील |
थोडीच शेती असलेल्या शेतकरी कुटुंबात बेताच्या परिस्थितीवर तो कधी रडत बसला नाही. चैनवस्तूंचा अट्टाहास - लोभ केला नाही. या परिस्थितीतून आपल्याला फक्त आणि फक्त शिक्षणच बाहेर काढेल असा विश्वास त्याला त्याच्या कुटुंबाने दिला आणि त्या विश्वासाचं चीज आज दिपकने करून दाखवलं आहे. या यशात त्याच्या कुटुंबाचा हातभार खूप मोठा आहे. भलेही इतर सोईसुविधा पुरवण्यात ते कमी पडले असतील पण शैक्षणिक सुविधा आणि संस्कार देण्यात ते कुठेच मागे पडले नाहीत. आई तारामती इंगळे, वडील सुरेश इंगळे व मोठी बहिण प्रियांका खोत असे त्याचे कुठुंब.
शैक्षणिक प्रवास - दिपकचे प्राथमिक शिक्षण मंगेशनगर, कोथळी, माध्यमिक शिक्षण आदर्श विद्यालय, कोथळी तर ११ वी ते पदवी पर्यंतचे शिक्षण जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे झाले. पदवी बी.एस. सी - गणित (B.Sc Mathematics ) या विषयात पूर्ण केली. अर्थातच हे सर्व शिक्षण त्याने चांगल्या गुणांनी पूर्ण केले. शिक्षणातला हा सगळा प्रवास त्याने सायकल वरूनच केला.
पदवीचे शिक्षण घेत असतानाच त्याने स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले होते व त्याची तयारीही करत होता. पदवीच्या शेवट वर्षात शिकत असतानाच जितो ( GITO) या सामाजिक संस्थेमार्फत (जैन समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पुणे ) घेण्यात येणाऱ्या परीक्षेतून त्याची निवड झाली होती. २०१९ साली पदवी चे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तो जितो, पुणे येथे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करण्यासाठी गेला. पण एका वर्षांनंतर पडलेल्या कोरोना लॉकडाऊन मुळे त्याला परत यावे लागले. त्यानंतर दोन वर्षे तो जितो संस्थेच्या धर्मनगर येथील शाखेत अविरतपणे अभ्यास करत राहिला.
![]() |
S.P ग्रुप मित्रपरिवार |
गावापासून थोडे दूर वस्ती असलेल्या दिपकचा मित्रपरिवारही तसल्याच परिस्थितीत शिक्षण घेतलेला आहे. व काही जण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. त्यामुळे तो एक प्लस पॉइंट दिपककडे होता. संतोष कोरे, आकाश चव्हाण, व S.P ग्रुप मित्रपरिवार हे कायम त्याच्या सुखदुःखात त्याचे सोबती आहेत. दिपक सारखेच हे सर्वजणही विविध क्षेत्रात यश मिळवतील यात शंका नाही.
आपला सोबती जेव्हा असं उत्तुंग यश मिळवतो तेव्हा होणारा आनंद हा शब्दात न मांडता येणारा आहे, दिपकने मिळवलेले यश प्रेरणादायी आहे.
- संतोष कोरे, स्पर्धापरीक्षार्थी ( दिपकचा बालमित्र )
प्रामाणिकपणा, सातत्य व आत्मविश्वास असेल तर कोणतेही ध्येय दुर नाही. आई वडील, मित्रपरिवार व नातेवाईकांनी दिलेला पाठिंबा यामुळेच हे यश मिळवता आले. - दिपक इंगळे
या दोन यशासोबतच दिपकने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा देखील पार केली आहे, व त्याच्या मुलाखतीस पात्र झाला आहे. दिपकचे मुख्य ध्येय हे UPSC मधून आयएएस ( IAS ) होण्याचे आहे. त्याच्या पुढील ध्येयासाठी जय हिंद न्यूज नेटवर्क कडून खूप साऱ्या शुभेच्छा...
मालोजीराव माने,
कार्यकारी संपादक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा