![]() |
बेपत्ता मयत बालक मल्लिकार्जुन बिसलसिदया पतंगी |
*जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी*
कोथळी (ता. शिरोळ) येथील वीट भट्टीवर काम करणार्या कुटूंबातील बेपत्ता साडेचार वर्षाच्या बालकाचा मृतदेह कृष्णा नदीपात्रात मिळून आला. मल्लिकार्जुन बिसलसिदया पतंगी असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली. बालकाचा घातपात झाल्याच्या संशयावरून रात्री उशीरापर्यंत चौकशी सुरू होती. या घटनेची नोंद रात्री उशीरापर्यंत जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत माहिती अशी की, कोथळी येथील नेमगोंडा पाटील यांच्या वीट भट्टीवर काम करणार्या लक्ष्मी पतंगी (मुळगाव तडवळगा, ता.इंडी, जि.विजापूर) यांचा मुलगा मल्लिकार्जुन पतंगी हा शुक्रवारी दुपारी 3 वाजल्यापासून बेपत्ता झाला होता. रात्री उशीरा जयसिंगपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
दरम्यान शनिवारी दिवसभर पोलीस घटनास्थळी होते. वीटभट्टीजवळ असणार्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. मल्लिकार्जुन हा नदीकडे जात असल्याचे फुटेजमध्ये दिसून आले. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास कृष्णा नदीमध्ये त्याचा मृतदेह मिळून आला. त्याचा घातपात झाल्याची चर्चा घटनास्थळी होती. वीट भट्टीच्या आवारात असणार्या सीसीटीव्हीच्या फुटेजवरून चौकशी केली जात आहे.
घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक रोहिणी सोळंखे, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्यासह पथकाने पाहणी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा