![]() |
डॉ.सुभाष अक्कोळे व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना ज्येष्ठ विचारवंत व इतिहासकार संजय सोनवणी,डॉ. महावीर अक्कोळे, डॉ. सुभाष अडदंडे,डॉ. राजेंद्र कुंभार, प्राचार्य डॉ.सुरत मांजरे व डॉ.अजित बिरनाळे |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज हीरक महोत्सवी वर्षानिमित्त अनेकांत एज्युकेशन सोसायटी-जयसिंगपूर स्थानिक समिती जयसिंगपूर कॉलेज आणि अक्कोळे कुटुंबीय यांचे संयुक्त विद्यमाने डॉ.सुभाषचंद्र अक्कोळे स्मृती व्याख्यानमालाचे पहिले पुष्प ज्येष्ठ विचारवंत व इतिहासकार संजय सोनवणी, पुणे यांनी सांस्कृतिक विचार मंथनाच्या माध्यमातून गुंफले.
सांस्कृतिक आक्रमणाच्या माध्यमातून सांस्कृतिक दहशतवाद निर्माण करण्याचा हेतू सध्या परिस्थितीत विद्यमान सरकारच्या माध्यमातून निर्माण होत असताना दिसत असल्याचे प्रखर मत ज्येष्ठ इतिहासकार संजय सोनवणी यांनी मांडले. ते पुढे म्हणाले, आज भारतीय संस्कृतीवर वैदिक संस्कृतीचा दबाव वाढत असून विखारी महत्वकांक्षापोटी परस्परांचे शत्रुत्व निर्माण करून देशात दुबळी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारतीय लोकशाही व्यवस्था लोप पावत असून वेळीच या व्यवस्थेला रोखणे गरजेचे आहे. दीनदयाल उपाध्याय यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करून भारतीय संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न होतो आहे. आज जाणीवपूर्वक वैदिक गणित, साहित्य व तत्वज्ञान याचा अभ्यासक्रमात समावेश करून तसेच संस्कृत भाषा ही अनिवार्य असल्याबाबतचे मत स्मृती इराणी यांनी व्यक्त करून तशा प्रकारचा सांस्कृतिक साहित्यवर आक्रमण करण्याचा प्रयत्न सरकारकडून होतो आहे.
संजय सोनवणी पुढे म्हणाले, सरकारकडून वेगवेगळ्या माध्यमातून विषारी विचारांच्या झुंडी तयार करून श्री रामाचे हिंसक प्रकटीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे मूळ सांस्कृतिक विचारावर आक्रमण होऊन विकृत व विध्वंसक संस्कृती निर्माण होत आहे.आज जाणीवपूर्वक व सविस्तरपणे १२ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास लिहिण्याचा काम उत्तर प्रदेशातील १४ उच्च जातीतील लोकांना देण्यात आल्याचेही ते म्हणाले. यामुळे पुढील पिढ्यांची चिंता वाढत असून अगोदरचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न होणार आहे.
ते पुढे म्हणाले, श्रीरामाचे भव्य मंदिर उभा करून त्याची पूजा-अर्चा करणे हे सर्वांना मान्य आहे. परंतु अनेक जणांनी ३०० पेक्षा अधिक रामायणे लिहिली आहेत यातील मूळ रामायण कोणते हे कसं ओळखायचं हा प्रश्न सर्वांसमोर आहे.
भारत एक संघराज्यात्मक व धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. मात्र सद्यपरिस्थितीत राज्यसत्तेपेक्षा धर्मसत्ता महत्त्वाची मानून मनुवादी व विषमता निर्माण करणारा वैदिक धर्माचा बोलबाला सध्या परिस्थितीत सत्ताधारी पक्षाकडून होत आहे. गेल्या काही वर्षात उत्तर भारतीय प्रदेशाचा सांस्कृतिक दहशतवादी प्रभाव (आर्यांचा) दक्षिण भारतीय प्रदेशावर(द्रविड) जाणीवपूर्वक केला जात आहे.
विकासाच्या प्रचंड गप्पा विविध माध्यमातून मांडल्या जात आहेत. मात्र देशातील सद्य परिस्थिती अत्यंत विषमतावादी आहे.१० टक्के लोकांकडे ९० टक्के संपत्ती आणि ९० टक्के लोकांकडे १० टक्के संपत्ती असल्याचे चित्र विविध संशोधनातून स्पष्ट होत आहे.
सरते शेवटी ते म्हणाले, आज वैचारिक क्रांती होईल अशी भाबडी आशा बाळगू नये. यासाठी शिक्षणाचा मतीआर्थ व आकलन योग्य होणे गरजेचे आहे. नैतिकतेची जाण ठेवून स्वतंत्र विचार मांडणारी व्यवस्था तयार झाली पाहिजे. यासाठी प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रथम क्रियाशील बनावे. मुळात छत्रपती शाहू महाराजांच्या विचारानी आपण प्रेरीत असल्याने आपण सर्व विवेकी विचारी व सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवून देश निर्माण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याबाबतचा त्यांनी गौरव उद्गार जयसिंगपूर वासियांच्या बाबत काढले.
या कार्यक्रमातील मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक डॉ. महावीर अक्कोळे ज्यांनी व्याख्यानमाला आयोजनाचा उदात्त हेतू स्पष्ट केला.डॉ. राजेंद्र कुंभार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे आभार डॉ. अजित बिरनाळे यांनी मानले. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन डॉ.सौ. सुनंदा शेळके यांनी केले.
या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे, खजिनदार मा.पद्माकर पाटील, संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक होते.तर कॉलेजचे सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी, जयसिंगपूर परिसरातून आलेले सर्व मान्यवर श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अत्यंत सुंदर विचारधन निर्माण करणारी व्याख्यानमाला असल्याबाबतचे मत उपस्थित घटकांनी व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा