![]() |
विशेष संस्कार सांगता समारंभात मार्गदर्शन करताना संचालक डॉ.तानाजी चौगले |
*समृद्धी येलाज : विशेष प्रतिनिधी*
सांगली : राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालयीन तरुण- तरुणींसाठी व्यक्तिमत्व विकासाचे मोठे व्यासपीठ असून या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी श्रमाचे मूल्य व संस्कार शिकवले जातात, संस्कारक्षम पिढी घडविण्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान अनमोल आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. तानाजी चौगले यांनी व्यक्त केले. ते बळवंत कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित मौजे देवेखिंडी, ता. खानापूर येथील विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून नानासाहेब शामरावजी विद्यालय देवीखिंडीच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा निकम तर स्वागताध्यक्ष म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच सांगली जिल्हा समन्वयक प्रा.डॉ. पोपटराव माळी उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापिका सौ. निकम म्हणाल्या, अशा शिबिराचा उद्देश म्हणजे, खेड्यातील माणसे, त्यांची दिनचर्या, त्यांचे कष्ट समस्या व प्रश्न, त्यावर केलेली मात हाच असतो. एकंदरीत ग्रामीण जीवन कसे असते, यासंदर्भात माहिती व अभ्यास करण्याच्या दृष्टीने असे विशेष श्रमसंस्कार शिबिर खेड्यामध्ये घेतले जाते. देवेखिंडीत कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान, वृक्षारोपण, जनजागृती, गटचर्चा, व्याख्याने व स्वच्छता अशा विविध गोष्टी करून गावांमध्ये समाजप्रबोधन केले आहे. निश्चित ग्रामस्थांनी या सर्वांचा लाभ घेतला असेल.
या विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी श्रमदान, समतल पाणी पातळी चर, माती बंधारे, वृक्षारोपण, स्मशानभूमी स्वच्छता, वनराई बंधारे, यासारखी अनेक श्रमसंस्काराची कामे करण्यात आली. त्याचबरोबर शिबिरात अनेक बौद्धिक कार्यक्रम शिदोरी स्वयंसेवकांना देण्यात आली यामध्ये स्वच्छ भारत स्वस्थ भारत, महिला सबलीकरण व सक्षमीकरण, महिलांचे आरोग्य, जगावे कशासाठी, आपला आहार आणि आरोग्य, मनोरंजनातून समाज प्रबोधनाकडे, कायदा साक्षरता अभियान, साप अंधश्रद्धेच्या पलीकडे अशा अनेक विषयांच्या वरती विशेष व्याख्याने आयोजित करण्यात आली. त्याचबरोबर शिबिरामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवकांना उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यामध्ये तसेच आदर्श गट पुरस्कारही देऊन स्वयंसेवकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शिबिराबद्दल अनेक विद्यार्थ्यांनी आपला अभिप्राय नोंदवला व कार्यक्रमाधिकाऱ्यांचे आभार ही मानले.
शनिवारी संपन्न झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात स्वयंसेवकानी विविध कला गुणांचा आविष्कार केला. त्याचबरोबर सामाजिक जागृती पथनाट्य लघु नाटिका सादर केल्या.
समारोप कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण बाबर, सूत्रसंचालन डॉ. सुवर्णा पोळ, तर आभार प्रा. प्रशांत गांजवे यांनी व्यक्त केले. यावेळी प्रा. संकेत राठोड, प्रा. राणी चव्हाण, प्रा. संतोष कदम, उपप्राचार्य प्रा. विष्णू मस्के, प्रा. अंकुश निकम, सरपंच सौ. रुक्मिणी निकम, प्रशांत निकम, श्री. अजित मंडले, गावातील माजी सैनिक, विद्यार्थी व शिक्षक, ग्रामस्थ व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून दिलेलं योगदान वाखाण्याजोगे आहे अशा प्रकारची चर्चा सदरच्या गावामध्ये होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा