Breaking

रविवार, १४ जानेवारी, २०२४

*जीवाभावाचा सहकारी, कुशल संघटक व संवेदनशील मित्र प्रा. असलम सिकंदर फरास


सेवानिवृत्ती कार्यक्रमात प्रा. असलम फरास यांचा सत्कार करताना माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर व इतर मान्यवर

लेखक : संजय पाटील-यड्रावकर (माजी नगराध्यक्ष, जयसिंगपूर


     माझे विश्वासू सहकारी व कौटुंबिक मित्र जयसिंगपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रा. असलम सिकंदर फरास हे त्यांच्या दीर्घकाळ केलेल्या शिक्षण क्षेत्रातील सेवेमधील प्राध्यापक पदावरून निवृत्त होत आहेत. एक जीवाभावाचा सहकारी आणि कुशल संघटक म्हणून त्यांनी माझ्यासह आपल्या सहकाऱ्यांमध्ये फार मोठा विशास निर्माण केला आहे, फरास सरांच्या सोबत राजकारण आणि समाजकारण करताना त्यांच्या सहवासात घालवलेल्या २५ वर्षाच्या कार्यकाळातील काही आठवणींना उजाळा देणे मला वाटते यावेळी गरजेचे आहे.२००१ साली ते प्रथम जयसिंगपूर नगरपरिषदेवर नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर आजतागायत त्यांनी आपल्या प्रभागातून आपली जागा कायम राखताना सातत्याने सामान्य माणसांचे प्रतिनिधित्व केले, मी त्यांना त्यावेळी विचारलं होतं तुम्ही आमच्या गटाशी एकनिष्ठ राहणार का? नेहमी आपल्या सोबत राहीन असा शब्द दिलेल्या या व्यक्तिमत्त्वाने जवळपास २५ वर्ष आमच्या यड्रावकर गट व यड्रावकर कुटुंबाशी निष्ठा कायम राखली, राजकारणात सहसा असे होत नसते, पण एकदा शब्द दिल्यानंतर तो बदलायचा नाही हा स्वभाव असलेल्या फरास सरांनी अनेक अडचणीच्या प्रसंगात आम्हाला साथ दिली.

      नगरपरिषदेच्या विविध समित्या अथवा नगराध्यक्ष निवडीच्या वेळी देखील प्रसंगी एखाद्यासाठी नेतृत्वाने तुम्ही सर यावेळी थोडं थांबायला हवं, तुम्हाला पुढच्या वेळी संधी देतो असे सांगितल्यानंतर कधीही हा माणूस नाराज झाला नाही हे मी अनुभवले आहे, आणि या तपश्चर्येचे आणि निष्ठेचे फळ म्हणून कालांतराने जयसिंगपूर शहरातील मुस्लिम समाजाचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा सन्मान यड्रावकर गटाने फरास सरांना दिला.

     यड्राव को-ऑपरेटिव बँकेचे दीर्घकाळ संचालक पद सरांनी भूषवलं. राजकारणात त्यांनी नगरपालिका असो अथवा विधानसभेच्या निवडणुका असोत नेतृत्व अथवा गटाशी त्यांनी कधीही प्रतारणा केली नाही, नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच काम त्यांनी केलं. प्रभागातील सामान्य माणसांचे प्रश्न नगरपरिषद सभागृहामध्ये मांडून तो प्रश्न सुटू पर्यंत त्याचा पाठपुरावा करणे आणि सामान्य जनतेला न्याय देणे यासाठी ते नेहमी आग्रही असायचे. सभागृहामध्ये अनेक वेळा अनेक विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण भाषणे दिली.

    त्यांचा नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ देखील अतिशय चांगला पार पडला या काळात अनेक विकास कामे जयसिंगपूर शहरांमध्ये करण्यामध्ये नेतृत्वाच्या माध्यमातून त्यांना यश आले. नागरिकांच्या अडचणी आणि नगरपरिषद प्रशासन याचा सखोल अभ्यास असलेल्या फरास सरांनी आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने आपली भूमिका बजावली आणि आपल्या प्रभागात कर्तुत्व आणि स्वतःच्या कार्यशैलीने मोठा चाहता वर्ग निर्माण केला. त्यांच्या या कामाच्या पद्धतीमुळे प्रभागातील लोकांनी एकदा तर त्यांना बिनविरोध निवडून दिले. केवळ राजकारणात नाही ज्या शिक्षण संस्थेमधून ते आज निवृत्त होत आहेत त्या संस्थेसाठी सुद्धा त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. संस्थेच्या विविध अडचणीच्या प्रसंगी ते अधिकार वाणीने माझ्याकडे येत असत. प्रसंगी आम्ही मुंबईला जात असू.

     मला आठवते तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे साहेब यांच्याकडे फरास सर आणि मी गेलो होतो आणि शिक्षण संस्थे समोर निर्माण झालेला प्रश्न सोडवला होताआपली संस्था आणि शाळा याविषयी देखील त्यांना खूप तळमळ होती. जरी ते राजकारणात असले तरी त्यांनी संस्थेकडे अथवा शाळेकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. आपला सहकारी अध्यापक स्टाफ, आणि संस्थेचे पदाधिकारी तसेच विद्यार्थ्यांच्या मध्ये देखील त्यांनी स्वकर्तुत्वाने वेगळी ओळख निर्माण करण्याबरोबरच स्वतःचे अस्तित्व निर्माण केले.

   अडचणीत असलेल्या माणसाच्या मदतीला धावून जाणे ही त्यांची वृत्ती मी जवळून पाहिली आहे, प्रभाग असो अथवा समाजातील अनेक गरीब गरजू कुटुंबांना त्यांचा नेहमी मदतीचा हात असतो. प्रभागातील एखाद्या परिवाराच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर ते तातडीने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या माध्यमातून त्या परिवाराला मोठी मदत करीत असतात. त्यांची ही सेवावृत्ती आजही तितक्याच जोमाने सुरू आहे.

      शाळेतून निवृत्त होत असले तर मला नाही वाटत शाळेविषयी अथवा संस्थेविषयी असलेले त्यांचे प्रेम कमी होईल. या पुढच्या काळात देखील ते संस्थेसाठी मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावतील त्याचबरोबर आपला प्रभाग आणि उपेक्षित वर्गासाठी काम करत राहतील हे मात्र नक्की.

    आमचा एक विशासू सहकारी आणि निष्ठावंत मार्गदर्शक आज सेवानिवृत्त होत आहे निवृत्ती नंतरचा त्यांचा सर्वकाळ निरोगी, आरोग्यदायी जावा आणि त्यांच्या हातून यापुढे देखील खूप मोठे काम उभे रहावे या सदिच्छांसह त्यांचे हार्दिक अभिष्टचिंतन करतो..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा