![]() |
श्री सिद्धेश्वर स्वामी |
लेखक : प्रा. चिदानंद अळोळी
21 व्या शतकातील संत आणि आध्यात्मिक दैवआत्म्याचे सर्वात आदरणीय श्री सिद्धेश्वर महास्वामी संपूर्ण भारतासह विदेशामध्ये सुद्धा मानव जातीच्या कल्याणासाठी आपली हयात खर्ची घातली. परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजींनी कधीही आपल्या ज्ञानाचा,व्यक्तिमत्त्वाचा अहंकार मनी बाळगला नाही. यामुळेच त्यांची ख्याती सर्वदूर पसरलेली होती. त्यांच्या सुमधुरवाणीने अत्यंत शांत अशा वातावरणात सकाळी सहा वाजता प्रवचनाची सुरुवात व्हायची. वेळेबाबतीत फारच नियम पाळायचे. प्रवचनाची सुरुवात होत असताना एक टेबल, एकच खुर्ची, बोलण्यासाठी चा एक माइक, टेबलावरती एक पांढरे वस्त्र इतकेच असायचे. याच्या व्यतिरिक्त कोणताही बडेजाव कधीच असायचा नाही. मोठ मोठाले स्टेज, मोठ मोठी जाहिरात त्यांना कधीही आवडले नाही.एखाद्या राजकीय नेत्यासोबत फोटो काढण्याचा योग आला कि ते नेहमी टाळायचे. मी सर्वांचाच आहे असे ते हसत हसत म्हणायचे.
पूज्य सिद्धेश्वर स्वामीजी ५० वर्षांहून अधिक काळ कन्नड, इंग्रजी आणि मराठी भाषेत प्रवचन देत आहेत. या प्रवचनांची पुस्तके सुद्धा बनवली आहे. भारत आणि जगभरात मोठ्या प्रमाणावर प्रवास केल्यामुळे, स्वामीजींना देशाच्या आणि जगाच्या अनेक भागांतील आध्यात्मिक परंपरांचे खूप विस्तृत ज्ञान होते . सगळ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत अत्यंत क्लिष्ट तात्विक बाबी मांडण्याच्या त्यांच्या विलक्षण क्षमतेसाठी ते ओळखले जात. आपल्या गुरूंची परंपरा पुढे चालू ठेवत, स्वामीजी सर्वाना ईश्वरी ज्ञान प्रसारित करण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध गावे आणि शहरे आणि इतर देशांतही प्रवास करतात.
गेल्या काही दशकांमध्ये स्वामीजींनी उपनिषद, गीता, शरण तत्वज्ञान आणि सामान्य अध्यात्म यावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांची काही प्रमुख सिद्धांत शिखरमणी, अल्लामप्रभूंचे वचन , भगवद्चिंतन (दैवी प्रतिबिंब). त्यांनी इंग्रजीमध्ये पुढील पुस्तके देखील लिहिली आहेत: God, World and Soul, पतंजली योग सूत्र, नारद भक्ती सूत्र इत्यादी.पूज्य सिद्धेश्वर स्वामीजी, त्यांच्या शिष्यांसह, 60 वर्षांहून अधिक काळ ज्ञानाची कढई तेवत ठेवली.
जगभरात 10,000 हून अधिक प्रवचने देऊन आणि उपनिषद, वचन आणि शरण तत्त्वज्ञान, योग आणि सामान्य अध्यात्म यावर अनेक पुस्तके लिहून, त्यांनी आपले संपूर्ण जीवन लिंग, वर्ग, धर्म, जात इत्यादींचा विचार न करता सर्वांपर्यंत ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आपले जीवान समर्पित केले.श्वासागणिक जीवनाचे शाश्वत सिद्धांत कथन करणारे जागतिक ज्ञान विद्यापीठ, चालते बोलते परमेश्वर,पुज्यपाद सिद्धेश्वर महास्वामीजी दि. 2 जानेवारी 'प्रथम स्मृतिदिन' आहे.
पूज्यपाद स्वामींजींच्या निर्वाणाने निश्चितच एक मोठी पोकळी आपल्या सर्वांनाच क्षणोक्षणी अनुभवास येईल. त्यांच्या पावन स्मृती आम्हाला नित्य मार्गदर्शित करत राहोत आणि त्यांनी सांगितलेल्या तत्वाच्या मार्गांवर चालण्याचे बळ अन धैर्य आम्हाला लाभो ही त्यांच्या चरण स्मृतीला प्रार्थना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा