Breaking

बुधवार, ६ मार्च, २०२४

*समाजवादी व पुरोगामी विचारांचा लढवय्या शिलेदार प्रा. ए.एस.पाटील यांच्या रूपाने हरपला*


जयसिंगपूरच्या समाजवादी प्रबोधिनीत कालवश प्रा. ए.एस.पाटील यांची शोकसभा आयोजन 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : सोमवार दिनांक ४ मार्च ,२०२४ रोजी प्रा. ए.एस.पाटील यांची हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली.समाजवादी प्रबोधिनी जयसिंगपूर शाखेच्या वतीने कालवश प्रा. ए.एस.पाटील यांना अभिवादन करण्यासाठी शोकसभेचे आयोजन डॉ.  आवळेकर हॉस्पिटलच्या हॉलमध्ये करण्यात आले होते.

       समाजवादी प्रबोधिनीच्या शाखेत त्यांच्या आठवणींचा व कार्याचा जागर करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ विचारवंत माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार, प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. चिदानंद आवळेकर,डॉ. अतीक पटेल, डॉ. अजित बिरनाळे, प्रा. शांताराम बापू कांबळे, प्रा.डॉ. वाय.एस.चव्हाण, प्रा.डॉ. प्रकाश मेटकर,प्रा.डॉ. सुनील बनसोडे, राष्ट्रसेवा दलाचे साथी बाबासाहेब नदाफ, खंडेराव हेरवाडे, मिरासो कांबळे, प्रा.डॉ. तुषार घाटगे, प्रा. बाळगोंडा पाटील व प्रा. प्रभाकर माने यांनी मनोगत व्यक्त करून त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले. विशेष करून समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजीचे ज्येष्ठ विचारवंत व संपादक मा. प्रसाद कुलकर्णी यांनी शोक संदेश पाठवून त्यांनी अभिवादन केले.

   दानोळी गावचे सुपुत्र आणि झेले हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माजी प्रा.ए.एस.पाटील यांचे जयसिंगपूर येथे वयाच्या ८१ वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

     प्रा.पाटील यांचा जन्म सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झाला होता. आर्थिक बिकट परिस्थितीवर मात करीत त्यांनी एम.एस्सी. पदार्थ विज्ञान या विषयातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केले. विद्यार्थी दशेत असताना सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या लोकांच्या संपर्कात आले. तेथून ते सामाजिक चळवळीत सहभागी झाले. भौतिक विषयाची आवड असल्याने ते जयसिंगपूर येथील झेले हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये ज्युनियर विभागात अध्यापनाला सुरुवात केली.

      विद्यार्थी दशेपासून ते अगदी मृत्यूच्या शेवटपर्यंत त्यांनी विद्यार्थी, समाजातील वंचित व शोषित घटक यांच्या विषयी सहानभूती ठेवून त्यांच्या हितासाठी व प्रगतीसाठी झटत राहिले. शाहू,फुले,आंबेडकर यांच्या विचारावर आस्था ठेवून सतत पुरोगामी व प्रगतशील समाजाचे उद्दिष्ट नजरे समोर ठेवून झटत राहिले.

      आचार्य शांताराम बापू गरुड यांना गुरुस्थानी मानून ते नेहमी वैज्ञानिक समाजवादी व्यासपीठासाठी समाजवादी प्रबोधिनीच्या माध्यमातून कार्यशील राहिले. एडवोकेट गोविंदराव पानसरे, पद्मश्री नरेंद्र दाभोळकर व समतावादी समाजासाठी झटणाऱ्या नेत्यांसाठी व कार्यकर्त्या बरोबर आपला वेळ व्यतित केला. त्यांचे मित्र एफ.वाय. कुंभोजकर सर ,अशोक शिरगुप्पे सर व डॉ. महावीर अक्कोळे या पुरोगामी विचाराची मदार असणाऱ्या मित्रांबरोबर आपला वेळ सामाजिक कार्यात घालवला. या तीन मित्रांनी खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाला स्मरून सामाजिक व राजकीय काम केले.

  प्रा.पाटील हे एक प्रगतशील शेतकरी म्हणून ही परिचयाचे होते. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ते लढाऊ कार्यकर्ते होते. अनेक शेतकरी चळवळीत ते कार्यकर्ते म्हणून सहभागी होत असे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपला बराच वेळ सामाजिक परिवर्तनशील चळवळीसाठी त्यांनी खर्ची केला. आयुष्यभर ते विद्यार्थी प्रिय, शिक्षक प्रिय व समाजप्रिय व्यक्ती म्हणून जगले.भगवान महावीर यांच्या शिकवणीच्या आधारे सर्व कर्मकांडे टाळून मानवता धर्मासाठी झटत राहिले. अत्यंत शांत,संयमी व संस्कारक्षम, अभ्यासू व  चळवळीसाठी पूर्ण वेळ काम करणारा कार्यक्षम व्यक्ती म्हणून ते परिचयाचे होते. वयाच्या ८० व्या वर्षी भारत जोडो यात्रेत ते सहभागी झाले होते. तरुणाला लाजवेल अशी त्यांची ऊर्जा होती. प्रा.पाटील यांनी तरुण मुलांच्यासाठी शिक्षणासाठी व त्यांना सरकारी नोकरी लागावी व स्पर्धा परीक्षेसाठी चा फॉर्म भरून ते नोकरीत सहभागी व्हावे यासाठी ते निस्वार्थी भावनेने आर्थिक मदत करत होते.

    समाजवादी प्रबोधिनी व जय हिंद न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली व त्यांच्या स्मृतीला कोटी कोटी अभिवादन!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा