![]() |
कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठ, सातारा |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
सातारा: येथील कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठात डॉ. चिंतामण द्वारकानाथ देशमुख यांच्या नावाचे अध्यासन स्थापन करण्यास विद्यापीठाच्या नियामक मंडळाची व सर्वसाधारण परिषदेची मान्यता मिळाली असून, या अध्यासना अंतर्गत विविध प्रकारचे शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण विषयक उपक्रम राबवले जाणार आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, व धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या तीन महाविद्यालयाचे मिळून समूह विद्यापीठ स्थापन करण्यात आलेले असून या विद्यापीठांतर्गत विविध प्रकारचे शैक्षणिक व संशोधन प्रकल्प हाती घेतले जात आहेत.
डॉ. देशमुख हे भारतातील ख्यातनाम अर्थतज्ञ तसेच प्रशासनात भरीव कामगिरी केलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तत्वज्ञ होते. त्यांनी भारतातील बँकिंग व विमा क्षेत्रातील सुधारण्याच्या अनुषंगाने भरीव कामगिरी केली होती. तसेच देशातील विविध व्यवस्था सुधारण्याच्या अनुषंगाने नवनवीन प्रकारचे कायदे, नवनवीन वित्तीय संस्था, विमा संस्थांची राष्ट्रीयकरण, भारतीय बँकिंग नियमन कायदा अशा विविध प्रकारच्या सुधारणात्मक उपाययोजना देशातील वित्तीय व्यवस्थेसाठी काम करणारे ख्यातनाम अर्थतज्ञ होते. डॉ. देशमुख यांनी इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष, नॅशनल बुक ट्रस्टचे मानद अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलेले आहे. अंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या वतीने ब्रेटवूड कॉन्फरन्स, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेतही भारताच्या वतीने भूमिका मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केलेले होते.
डॉ. चिंतामणराव देशमुख व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विशेष ऋणानुबंध होता. रयत शिक्षण संस्थेच्या विकासाकरिता व विस्ताराकरिता त्यांचे मार्गदर्शन व योगदान महत्त्वपूर्ण होते. सन १९५७ मध्ये डॉ. देशमुख यांच्या हस्ते कर्मवीरांचे डॉ.मॅथ्यू लिखित इंग्रजी चरित्र प्रसिद्ध करण्यात आलेले होते. डॉ. देशमुख व कर्मवीर यांचा ऋणानुबंध कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत असल्याची दिसून येते ७ मे १९५९ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील ससून हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना, डॉ. चिंतामणराव देशमुख व सौ. दुर्गाबाई देशमुख यांनी इस्पितळात जाऊन कर्मवीरांची भेट घेतलेली होती.
या ऋणानुबंधांचा विचार करून तसेच डॉ. चिंतामणराव देशमुख यांचे देशाच्या वित्तीय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन, देशातील वित्तीय समावेशन या महत्वपूर्ण प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी तसेच त्या अनुषंगाने आवश्यक असणारे संशोधन प्रकल्प त्यावर आवश्यक त्या उपाययोजना सुचवण्याकरिता विद्यापीठाने डॉ. चिंतामण द्वारकानाथ देशमुख वित्तीय समावेशन अध्यासन सुरू केलेले असून, त्यास विद्यापीठाच्या अधिकार मंडळांनी मान्यता दिलेली आहे.
या अध्यासनाच्या माध्यमातून वित्तीय समावेशन क्षेत्रात उत्तम संशोधन व विस्तार कार्य केले जाईल असे मत विद्यापीठाचे कुलाधिकारी श्री. चंद्रकांत दळवी, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी टी शिर्के, विद्यापीठाचे प्र.कुलसचिव, डॉ. विजय कुंभार, विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. व्ही. के सावंत, प्रा. डॉ. राजन मोरे, प्रा. डॉ. अनिलकुमार वावरे आणि प्रा. डॉ. राजाराम साळुंखे तसेच अध्यासनाचे चेअर प्रोफेसर डॉ. राजशेखर निल्लोलू यांनी व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा