Breaking

शनिवार, २ मार्च, २०२४

*प्रामाणिक सेवेच्या माध्यमातून कर्तव्यपूर्ती साधणारा खरा सेवक : डॉ. सुभाष अडदंडे यांचे प्रतिपादन*

 

संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे यांचे हस्ते सुभाष वसकर आणि डॉ.सौ.एस.एस. महाजन यांचे हस्ते सौ. वसकर यांचा सत्कार करताना सोबत प्राचार्य डॉ.सुरत मांजरे, उपप्राचार्य डॉ. सावंत


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : जगाच्या पटलावर कोणत्याही क्षेत्रात कार्य करताना आर्थिक लाभाचा अथवा पदाचा विचार न करता तसेच निस्वार्थी भावनेने व प्रामाणिकपणे सेवा करून कर्तव्यपूर्तीच्या माध्यमातून समाधान लाभते व अशी सेवा करणारा खरा सेवक सुभाष वसकर होय असे प्रतिपादन स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे यांनी कॉलेजचे लॅब अटेंडंट सुभाष वसकर यांच्या सेवानिवृत्ती  कार्यक्रमात केले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे उपस्थित होते.

  प्रारंभी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी सुभाष भास्कर व त्यांच्या परिवाराचे स्वागत केले.डॉ.मांजरे यांनी लाभलेल्या प्रदीर्घ सेवा कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय कामाचा अनुभव व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, एक सच्चा माणूस, उत्साही, आनंददायी, प्रामाणिक, स्पष्ट बोलणारा व कामाला प्राधान्य देणाऱ्या व्यक्ती हा वयोमानानुसार सेवेतून निवृत्त होत असताना प्रत्येक घटका समोर पाण्याने डोळे ओले चिंब करणार क्षण अनुभवास येत असतो.त्यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

     श्री. व सौ. वसकर यांचा कॉलेज व अनेकांत नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

      सत्काराला उत्तर देताना सुभाष वसकर म्हणाले, या संस्थेने व कॉलेजने माझ्यावर पदाच्या माध्यमातून दिलेली जबाबदारी मी समर्थपणे साधण्याचा प्रयत्न केला. येथील अनुभव हे सुखद असून मला भावी आयुष्यासाठी त्या प्रेरणादायी आहेत. त्यामुळे मी सतत या कॉलेजचा ऋणी असेन.

       कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.पी.सावंत यांनी श्री.वसकर हे एक अजात शत्रू व्यक्ती म्हणून त्यांच्याबाबत गौरव उद्गार काढले. रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. बी.एम.सरगर यांनी सुभाष भास्कर यांनी केमिस्ट्री विभागात लॅब अटेंडंट म्हणून केलेल्या कामगिरी बाबतचा उत्तम अनुभव कथन केले. यावेळी ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. भारत आलदर यांनी त्याच्या प्रामाणिक सेवेच्या कामाबाबतचा सुतवाच केला. वसकर यांच्या सेवाकाळात प्रा.डॉ.प्रभाकर माने यांनी विद्यार्थी व प्राध्यापक म्हणून आलेला सुखद अनुभव व्यक्त केला.

      प्रा.डॉ. संदीप तापकीर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा.सौ. अंजना चावरे-चौगुले यांनी केले. या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन आयोजकांनी केले.

      या कार्यक्रमास अनेक प्रतिष्ठित नागरिक, कॉलेजचे सीनियर व ज्युनियर विभागातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा