Breaking

शुक्रवार, १ मार्च, २०२४

*पन्हाळा-पावनखिंड अर्थात शिव पावन प्रेरणा मोहीम शिव विचारांचा जागर करीत अत्यंत उत्साहात व जल्लोषात संपन्न*

 

पन्हाळा पावनखिंड मोहिमेत सहभागी कुलगुरू डॉ. डी. टी.शिर्के, प्र कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, एनएसएस संचालक डॉ.तानाजी चौगले व सहभागी झालेले विद्यार्थी


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना व देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालय, चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २४ फेब्रुवारी,२०२४ ते दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत पन्हाळा-पावनखिंड अर्थात शिव पावन प्रेरणा मोहीम आयोजित केली होती. सदरची मोहीम अत्यंत उत्साहात व जल्लोषात शिव विचारांचा जागर करीत यशस्वीपणे संपन्न झाली.या मोहिमेत ३०० राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी आणि शिवाजी विद्यापीठातील ५० प्रशासकीय सेवक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.


     रविवार दि. २५ फेब्रुवारी, २०२४ रोजी सकाळी ६.०० वाजता बाजीप्रभू देशपांडे व नरवीर शिवा काशिद यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोहिमेस सुरुवात झाली. पहिल्या दिवशी २५ किलोमीटर अंतर पन्हाळा ते मसाई पठार खोतवाडी या मार्गे जाऊन करपेवाडी मुक्कामी स्वयंसेवक पोहोचले. करपेवाडी मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य त्यामध्ये स्कूल बॅग, स्केच पेन, पेन्सिल, पेन, चॉकलेट्स इ. साहित्याचे  वाटप विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत शिवशाहीर रंगराव पाटील यांच्या पोवाड्याच्या कार्यक्रमातून इतिहास जागवण्याचा प्रयत्न करण्यात आला.    


मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी सोमवार दि.
२६ फेब्रुवारी, २०२४ रोजी
सकाळी ६.०० वाजता करपेवाडी येथून मोहिमेला सुरुवात झाली. दुपारी २.३० वाजता पांढरे पाणी या ठिकाणी मोहीम पोहोचली. पांढरे पाणी येथे भोजन करून पावनखिंड या ठिकाणी मोहीम ४.०० वाजता पोहोचली. दुपारी ४.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी सह मिरवणूक काढण्यात आली.
 

    मिरवणूक प्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ. डी. टी.शिर्के, प्र कुलगुरू, डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव, डॉ.व्ही. एन. शिंदे, वित्त व लेखाधिकारी, डॉ. सुवासिनी पाटील, एनएसएस संचालक, डॉ. तानाजी चौगले, प्राचार्य डॉ. एस आर पाटील, सांगली जिल्हा समन्वयक प्रा.डॉ. पोपटराव माळी, श्री भूषण नाईक यांच्यासह चिखली महाविद्यालयाचा स्टाफ, विद्यापीठाचे प्रशासकीय सेवक व सर्व स्वयंसेवक सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंडीतील स्मारकास मान्यवरांनी अभिवादन केले. ५.०० ते ६.०० या कालावधीत कोल्हापुरातील शिवशंभो तालीम आखाडा यांनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी यासह अनेक साहसी खेळ त्यांनी सादर केले.शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक, डॉ. तानाजी चौगले यांनी सहभागी सर्व घटकांचे आभार मानले.

      जय हिंद न्यूज नेटवर्कला प्रतिक्रिया देताना सहभागी स्वयंसेवक म्हणाले,पन्हाळा पावनखिंड अर्थात शिव पावन मोहीम ही आमच्यासारख्या सर्व शिवप्रेमी व निसर्ग प्रेमी घटकांना या मोहिमेच्या माध्यमातून शिवकालीन इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार होता आले. शिव विचारांचा जागर करण्यास संधी मिळाली. उपस्थित सर्वांसाठी आनंदाची व जल्लोषाची मेजवान होती. याप्रसंगी त्यांनी शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा