Breaking

शनिवार, ९ मार्च, २०२४

बेडग : शिक्षिका सरिता माने - पाटील यांच्या पुढाकाराने अंनिसने चौदा वर्षांपासूनची सहा फुट जट असलेल्या महिलेला केले जटामुक्त.

जटानिर्मूलन करताना उजवीकडून आशा धणाले, मध्यभागी त्रिशला शहा, सरिता माने, डॉ.सविता अक्कोळे, राहुल थोरात.


टीम अंनिस


बेडग, सांगली : बेडगमधील एका चाळीस वर्षीय महिलेची चौदा वर्षांपासून असलेली सहा फूट लांबीची आणि जवळपास 2 किलो वजनाची जट अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सांगलीने, सोडवून एका अघोरी प्रथेतून त्या गरीब महिलेला मुक्त केले. हे जटानिर्मुलन करण्यात गावच्या श्रीमती सरिता माने - पाटील यांचा महत्त्वाचा पुढाकार होता. 

      याबाबत अधिक माहिती अशी की, बेडग, ता. मिरज येथील सुवर्णा पोपट नांगरे ही महिला मोलमजुरी करून आपल्या आईसोबत राहते. चौदा वर्षांपूर्वी तिच्या डोक्यामध्ये जट तयार आली, पण देवीचा आदेश आणि दैवी दहशतीच्या समजुतीमुळे तिच्या घरच्यांनी ती तशीच वाढू दिल्यामुळे आज ती जट सहा फूट लांबीची, आणि जवळपास 2 किलो वजनाची झाली होती.

       सुवर्णाची जट काढण्यासाठी तिची व तिच्या आई लिलाताई नांगरे यांचे समुपदेशन गावातील अंनिस कार्यकर्त्या, शिक्षिका ( रयत शिक्षण संस्था, सातारा ) सरिता उदय माने आणि अंनिस, सांगलीचे कार्यकर्ते राहुल थोरात, डॉ. संजय निटवे, त्रिशला शहा, आशा धनाले यांनी केले आणि त्यांना जट काढण्यासाठी राजी केले.

      ९ डिसेंबर रोजी दुपारी अंनिसच्या कार्यकर्त्या आशा धनाले, त्रिशला शहा, डॉ. सविता अक्कोळे यांनी सुवर्णाच्या जटा कापून या अघोरी अंधश्रद्धेतून तिला मुक्त केले. चौदा वर्षांपूर्वीची जुनाट आणि त्रासदायक जट काढल्यानंतर सुवर्णाच्या चेहऱ्यावर आल्हाददायक हास्य फुलले होते. आधी थोडा विरोध करणारी तिची आई मुलीचं स्मितहास्य पाहून जवळ येऊन मुलीच्या डोक्यावरून हात फिरवून तिला जवळ घेतले. हा प्रसंग पाहून पाहून अंनिसचे कार्यकर्तेही आनंदीत झाले. आणि खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा झाल्याची भावना सर्व टीमने व्यक्त केली.

     यावेळी  सरिता माने यांनी सुवर्णास साडी चोळी देऊन तिचा सन्मान केला. यावेळी अंनिसचे कार्यकर्ते जगदीश काबरे, डॉ संजय निटवे, राहुल थोरात, मालोजीराव माने, कल्याणी माने हे उपस्थित होते.

राहुल थोरात, अंनिस - जटा काढल्यामुळे देवीचा कोप होईल किंवा कोणत्यातरी प्रकारचा त्रास होईल अशी काल्पनिक भीती महिलांनी मनातून काढून टाकली तर आपण या अंधश्रद्धेपासून निश्चितच दूर राहू. कोणाची जट निर्मूलन करायचे असेल तर त्यांनी अंनिसशी संपर्क साधावा असे आवाहन आम्ही करत आहोत. 

टीम अंनिस, सांगली


      डॉ. संजय निटवे, जगदीश काबरे म्हणाले की, अनेक अनिष्ट प्रथा, रूढी व परंपरा या केवळ अज्ञानातून आणि अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या दिसून येतात. स्वच्छतेच्या अभावामुळे, केसांची निगा न राखल्यामुळे केसांचा गुंता वाढतो, त्याकडे दुर्लक्ष झालं की, धूळ, माती साचून हा गुंता वाढून शेवटी सर्व केसांची एकच वजनदार जट तयार होते. मानेला ओझं पेलवयाला त्रास होतो. मान वळवायला त्रास, झोपेला त्रास, नीट झोपता येत नाही, कूस बदलताना त्रास होतो. परंतु हा त्रास सहन करायचा असतो, असा समज रुढी-परंपरेने करून दिलेला आहे. अशी अघोरी परंपरा नाकारली तर काहीतरी नुकसान होणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा