Breaking

शनिवार, २७ एप्रिल, २०२४

*कवठेमंहाकाळचे सुपुत्र व सातारचे प्रा. विजय पाटील यांनी अर्थशास्त्र विषयातून संपादन केली पीएच.डी. पदवी ; मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.एम.एस.देशमुख*

 

पीएच.डी. संशोधक विद्यार्थी प्रा.विजय पाटील व मार्गदर्शक प्रा.डॉ. महादेव एस. देशमुख


*प्रा.डॉ. प्रभाकर माने  : मुख्य संपादक*


कोल्हापूर : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा घटक महाविद्यालय धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील व्यावसायिक अर्थशास्त्र या विभागातील प्रा.विजय पाटील  यांनी शिवाजी विद्यापीठाची अर्थशास्त्र या विषयातील विद्यावाचस्पती अर्थात पीएच.डी. पदवी संपादन केली.प्रा.पाटील पीएच.डी.पदवी संशोधनाचे शीर्षक "सांगली जिल्ह्यातील वित्तपुरवठ्याचा शेती अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम" हा होता. त्यांनी शिवाजी विद्यापीठाचे मानव्यविद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा.डॉ. महादेव एस.देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

    प्रा.पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाच्या डॉ.आप्पासाहेब पवार भवन 'कमवा व शिका विस्तार योजनेतून' आपले शिक्षण पूर्ण केले. यावेळी त्यांच्या सोबत डॉ.प्रभाकर माने हे दोघे शिवाजी विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेसाठी अर्ज करणारे पहिले विद्यार्थी होते. शिवाजी विद्यापीठाची आप्पासाहेब पवार कमवा व शिका विस्तार योजना नसती तर त्यांना एम.ए.चे शिक्षण पूर्ण करता आले नसते. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी शिवाजी विद्यापीठाची कमवा व शिका विभागाकडे असलेली बंद पडलेली पिठाची चक्की सुरू करून त्यावर काम करून आपले शिक्षण पूर्ण केले. प्रा.पाटील यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण कवठेमहांकाळ या ठिकाणी पूर्ण झाले. वडील शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतीतील सर्व कामे करूनच शिक्षण पूर्ण केले. पदवीचे शिक्षण घेत असताना माजी प्राचार्य डॉ.डी.के.पाटील व डॉ. टी.एम.भोसले यांच्या मार्गदर्शनामुळे अतिशय चिकाटीने अभ्यास करून शिवाजी विद्यापीठांमध्ये अर्थशास्त्र विभागामध्ये  एम. ए. अर्थशास्त्र या विषयासाठी प्रवेश घेतला. परंतु सुरुवातीला कमवा व शिका योजनेत  प्रवेश मिळाला नाही. म्हणून त्यांना एम.ए.अर्थशास्त्र या विषयासाठी पहिल्या नंबरने प्रवेश मिळाला असला तरी घरी परत जावे लागले. त्यांच्या आईने त्यांना धीर दिला व थोडेफार जमलेले पैसे दिले  एक महिनाभर होस्टेल ला प्रवेश घेतला. परंतु तत्कालीन प्रा.डॉ.अरुण भोसले व अर्थतज्ञ प्रा.डॉ. विजय ककडे यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नामुळे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या आयुष्याला बळ देणारी  'कमवा व शिका विस्तार योजना' सुरू करण्यात आली. या योजनेचे २००१ साल हे पहिलेच वर्ष होते आणि या योजनेमध्ये सहभागी होऊन पिठाची गिरणी वरती काम करून त्यांनी आपले एम.ए. अर्थशास्त्र विषयातून शिक्षण पूर्ण केले. अर्थशास्त्र अर्थशास्त्र विभागातील डॉ.कट्टी मॅडम व डॉ ककडे सर यांच्या इंग्रजी भाषेतून शिकवण्याचा प्रभाव त्यांच्यावरती पडला.सुरुवातीपासून इंग्रजी माध्यम घेऊन  कमवा व शिका योजनेतून मिळालेल्या पैशातून भरपूर पुस्तके घेऊन प्रा पाटील पहिल्याच प्रयत्नात सेट परीक्षा उत्तीर्ण झालेआणि खऱ्या अर्थाने त्यांच्या  आयुष्याला एक नवसंजीवनी मिळाली. त्यानंतर लगेच रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले.रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा कॉलेज, बळवंत कॉलेज विटा, शिरवळ कॉलेज, छत्रपती शिवाजी कॉलेज, पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर इ.विविध महाविद्यालयात काम करून सध्या ते कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा घटक महाविद्यालय धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात सातारा येथे कार्यरत आहेत.

       कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कमवा व शिका या तत्त्वज्ञानावर त्यांचा विश्वास असल्यामुळे अत्यंत खडतर परिस्थितीतून देखील शिक्षण पूर्ण करून  अर्थशास्त्रासारख्या क्लिष्ट विषयात विद्यावाचस्पती ही पदवी मिळवणारे ते प्राध्यापक आहेत. मुळात कर्मवीर अण्णांच्या उदात्त विचारावर विश्वास ठेवून ते सक्रिय व कार्यशील प्राध्यापक म्हणून सेवा बजावीत आहेत.

     प्रा. विजय पाटील यांचा शैक्षणिक संघर्षमय प्रवास पाहता अशा परिस्थितीत अर्थशास्त्र विषयातून  पीएच.डी.पदवी संपादन करणे ही गौरवाची व अभिमानाची बाब आहे. रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव व  धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा चे प्राचार्य डॉ ज्ञानदेव मस्के साहेब, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे रजिस्टार डॉ.विजय कुंभार, मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ.अनिल वावरे व  अर्थशास्त्र माजी विभाग प्रमुख  डॉ.एल. एन. घाडगे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.       

     विद्यार्थीदशेपासून ते आज पर्यंत त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना व विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यासाठी ते कार्यरत आहेत. प्रा. विजय पाटील हे सामाजिक बांधिलकी म्हणून युवकांना मोफत करिअर मार्गदर्शन करीत असतात. अत्यंत संवेदनशील व प्रामाणिक व्यक्ती म्हणून ते सुपरीचयाचे आहेत.प्रा. विजय पाटील यांचा शैक्षणिक विकासाची घोडदौड वेगाने सुरू आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्र,सेमिनार व कॉन्फरन्स मध्ये ते सक्रिय सहभागी असतात.विद्यार्थी घटक केंद्रबिंदू मानून त्यांच्या चौफेर विकासासाठी ते कटिबद्ध आहेत. त्यांचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.

   शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र अधिविभाग प्रमुख प्रा.डॉ.सौ. व्ही.पी.कट्टी व प्रा.डॉ.पी.एस.कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा