Breaking

बुधवार, २४ एप्रिल, २०२४

हातकणंगले मतदारसंघ - चौरंगी लढत - कोणाच्या पथ्यी पडणार ? महाविकास आघाडी आपल्या हक्काची जागा घालवणार ?

 



✍🏼मालोजीराव माने, कार्यकारी संपादक

       

       महाविकास आघाडी, महायुती, वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या चार प्रमुख राजकीय पक्षांकडून हातकणंगले मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाली आहे. यातील मविआ, वंबआ आणि स्वाभिमानी हे तीन थोडे अधिक ताकदवर आणि प्रमुख गट हे मोदी सरकार अर्थात भाजप सरकार यांना पदावरून दूर करण्याच्या जाहीर उद्दिष्टाने त्यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत, पण स्वतंत्र लढल्याने त्यांचे हे उद्दिष्ट सफल होईल का असा प्रश्न उपस्थित होतोय.

       मुळात केंद्रातील सपशेल अपयशी अश्या भाजपा सरकारचा पाडाव करणे हे यांचे मुख्य उद्दिष्ट आहे की आपला पक्ष वाढवणे हा यांचा मुख्य उद्दिष्ट आहे? याचीच शंका येतेय. 


२०१९ ची आकडेवारी काय सांगतेय. 

      शिवसेनेचे धैर्यशील माने आणि स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी आणि वंचितचे अस्लम सय्यद यांच्या मध्ये ही निवडणूक रंगली होती. त्यामध्ये

१) धैर्यशील माने - ५ लाख ८५ हजार, 

२) राजु शेट्टी - ४ लाख ८९ हजार आणि 

३) अस्लम सय्यद - १ लाख २३ हजार अशी मते मिळाली. 

    धैर्यशील माने यांना मोदींची प्रचंड मोठी लाट आणि जातीय समीकरणे याची साथ असूनही काँग्रेस, राष्ट्रवादी पाठिंब्याचे राजू शेट्टी यांना खुप चांगली मते मिळाली होती. जर वंचित सोबत असती तर नक्कीच राजू शेट्टी निवडून आले असते, पण तसं झालं नाही. 

    यावेळी तर चौरंगी लढत होणार आहे, म्हणजे धैर्यशील माने यांना जिंकनं आणखीन सोप्प होईल असं वाटतंय.

    दोष कोणाचा ?

    केंद्र सरकारच्या विरोधात जनता जरी एकवटली असली तरी या पक्षीय तिढ्यामुळे महायुतीलाच फायदा होणार हे नक्की.

    मान्य आहे की प्रत्येकाला आपला पक्ष टिकवायचाय आणि वाढवायचाय, पण आता एक पाऊल मागे घेतलं नाही तर पुढे हातपाय हलवायला जागाच राहणार नाही हे पण ध्यानात घ्यायला हवं. 

    मग दोष उद्धव ठाकरे शिवसेनेला द्यायचा, राजू शेट्टींना द्यायचा की वंचीतच्या प्रकाश आंबेडकर यांना द्यायचा ? 

    ठाकरे शिवसेना - यांच्याकडून निवडून आलेले धैर्यशील माने यांनी ठाकरेंची साथ सोडल्यामुळे भावनिक दृष्ट्या जनता आता ठाकरेंच्या पाठीशी ठाम उभी राहणार यात शंका नाही.  ठाकरेंकडे जरी सहानुभूती असली तरी ती पूर्ण  मतदारसंघात नाही. आणि त्यांनी दिलेले उमेदवार सत्यजित पाटील, सरुडकर हे या मतदार संघासाठी नवखे आणि बाहेरचे आहेत. बहुतांश तरुण वर्गाला तर ते माहीतच नाहीत पण जुने जाणकार कार्यकर्ते देखील सत्यजित पाटील यांना पाठिंबा देताना आम्हाला माने, शेट्टी नको तर एक नवा चेहरा पाहिजे एवढाच आधार घेताना दिसत आहेत. आणि जर उद्धव ठाकरेंना शेट्टी यांना मशाल चिन्ह घेतल्याशिवाय पाठिंबा द्यायचाच नव्हता तर, जुने कट्टर कार्यकर्ते मुरलीधर जाधव यांना कोणतंही विशेष कारण न देता पदावरून का दूर केलं असा सवालही शिवसैनिक विचारत आहेत, याचाही मतदानावर नक्कीच प्रभाव पडणार.

      माने विरुद्ध पाटील यांच्यात तुलना केली आणि त्यातील शेट्टींना आणि वंचितला मिळणारी हक्कांची मते बाजुला केली तर धैर्यशील माने यांचंच पारडं जड होणार.

      राजू शेट्टी यांचा शेतकरी संघटना हा चळवळ आधारित प्रादेशिक पक्ष आहे. राजू शेट्टीं यांचं या मतदार संघात प्राबल्य आहे - कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी सातत्याने न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच इतर घटकांचीही त्यांना साथ आहे. त्यांची हक्काची अशी व्होट बँक आहे. मागच्या वेळेस ते द्वितीय क्रमांकावर होते. आणि मुळात प्रादेशिक आणि अपक्ष उमेदवारांच अस्तित्व हा लोकशाहीचा दागिना आहे आणि तो टिकलाच पाहिजे. कोणत्याही पक्षाची साथ नसतानाही त्यांना मिळणाऱ्या मतांचा विचार केला तर या मतदार संघाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यांच्या काही नकारात्मक गोष्टी असल्या तरी या निवडणुकीपुरता तरी  इतरांपेक्षा तेच योग्य उमेदवार आहेत, परंतु यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी चा पाठिंबा नसल्यामुळे काही लाख मते नक्कीच कमी होतील., हे माहीत असूनही त्यांनी कंबर कसली आहे.

        याचा विचार करता माने विरुद्ध शेट्टी यांची तुलना केली आणि महाविकास आघाडी आणि वंचित यांना मिळू शकणारी मते बाजूला केली तर धैर्यशील माने यांचच पारडं जड होण्याची शंका आहे.

     आंबेडकरांचा पक्ष वंचित बहुजन आघाडी हा देखील येथे नवीन आहे, फक्त प्रकाश आंबेडकर, आंबेडकर आडनाव आणि मुस्लिम मतांमुळे अस्लम सय्यद यांना तब्बल १ लाखाहून अधिक मते मिळाली आहेत. त्यामुळे तोही एक जबाबदार पक्ष असला तरी सय्यद यांना मिळालेली मते शेट्टी आणि मानेंच्या जवळपासही नाहीत. सय्यद यांनी घेतलेल्या मतांमुळेच मतदार संघातील प्रबळ नेते राजू शेट्टींचा पराभव झाला आणि धैर्यशील मानेंना फायदा झाला असाही आरोप यांच्यावर होतोय. मग आंबेडकरांना दोष द्यायचा झाल्यास तो फक्त या आधारावर देता येईल की महविकास आघाडी आणि वंचितचे ध्येय आणि उद्दिष्ट एक आहे. पण वंचितचे राजकीय प्राबल्य आणि मागील निवडणुकीतील निकाल कमी असूनही महाविकास आघाडी सोबत युती करताना केलेली अवास्तव मागणी आणि ताठर भूमिका.

      धैर्यशील माने यांनी उद्धव ठाकरेंची सोडलेली साथ तशीच काही प्रमाणात निराशाजनक कामगिरी आणि केंद्रातील मोदी सरकारची निराशाजनक कामगिरी पाहता महायुतीकडे अर्थात धैर्यशील मानेंकडे मतदार पाठ फिरवनार असले तरी, वरच्या तिघांच्या भांडणात फायदा यांचा होईल इतकी मते तरी मानेंकडे आहेत.

       केंद्र सरकारच्या विरोधात जनता जरी एकवटली असली तरी या पक्षीय तिढ्यामुळे भाजपाच्या महायुतीलाच फायदा होणार हे नक्की. त्यामुळे जनताही कोणाला मतदान करायचं या बुचकळ्यात पडली आहे.


मालोजीराव माने - ९०२१५१५२५६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा