Breaking

गुरुवार, ११ एप्रिल, २०२४

*उदगाव येथे पूर्ववैमनस्यातून कुपवाडच्या तरुणाचा धारदार हत्याराने निर्घृण खून*


मृत सचिन चव्हाण, कुपवाड 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर: पूर्ववैमनस्यातून कुपवाडच्या तरुणाचा धारदार हत्याराने उदगाव येथे दुपारी खुन झाल्याची घटना घडली. सचिन अज्ञान चव्हाण (वय २४, मुळ गाव रा.मु.बसाप्पाची वाडी पो.कोकळे, ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली, सध्या रा.शाहूनगर जयसिंगपूर) असे मृताचे नाव आहे. पाठलाग करुन हा खुन करण्यात आला.  निर्भया पथकाच्या सतर्कतेमुळे दोघा संशयीतांना अटक करण्यात आली. साहिल असलम समलीवाले (वय २६, रा.वाघमोडे नगर कुपवाड) व परशुराम हणमंत बजंत्री (वय २५, रा.अलिशान नगर) अशी संशयीतांची नावे आहेत. तर अन्य काहीसंशयीतांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

मृत सचिन चव्हाण याचा खून झालेले ठिकाण 


      याबाबत अधिकृत पोलीस सूत्राकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कुपवाड येथे २०२० मध्ये दत्ता पाटोळे या तरुणाचा खुन झाला होता. या खुनाच्या आरोपाखाली सचिन चव्हाण याला अटक करण्यात आली होती. महिन्याभरापूर्वी तो जामिनावर कारागृहातून सुटून आला होता. त्याचे आई, वडील, भाऊ हे तिघेजण जयसिंगपूर येथील सुदर्शन चौक येथे चार वर्षापासून वास्तव्यास आहेत. गुरुवारी सचिन हा जयसिंगपूरहून सांगली येथे मित्रांना भेटण्यासाठी गेला होता. संशयीत सचिन याच्या मागावर होते. दुचाकीवरुन सचिन हा सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव येथील खोत पेट्रोलपंपासमोर आल्यानंतर संशयीतांनी त्याला गाठल्यानंतर त्याची दुचाकी रस्त्यावर पडली.याचवेळी संशयीतांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्वत:चा बचाव करण्यासाठी तो भितीने पळत सुटला. शेजारी असणाऱ्या रावसाहेब जालिहाळ यांच्या प्रभात रोलिंग शटर्स या फॅब्रिकेशन दुकानात तो गेला. त्यानंतर दुकानाच्या आतमध्ये असणाऱ्या घरात तो शिरला. त्याच्या पाठीमागून संशयीत देखील आतमध्ये शिरले. सचिनवर सपासप वार करण्यात आले. घरातून सचिन पुन्हा दुकानात आला. याठिकाणी त्याच्यावर पुन्हा वार करण्यात आले. यावेळी हाताची दोन्ही मनगटे तुटून पडली होती. तर डोक्यात गंभीर वार झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडून तो जागीच ठार झाला.

    सचिन याचा खुन करुन संशयीत हे घटनास्थळावरुन पळून जात होते. दरम्यान पेट्रोलिंग करणाऱ्या निर्भया पथकाने पाठलाग केला असता उदगाव येथील टेक्निकल हायस्कूलच्या रिकाम्या जागेत दोघे संशयीत हातात हत्यार घेवून एका बंद खोक्याच्या पाठीमागे लपून बसले होते. यावेळी निर्भया पथकातील पोलिस उपनिरीक्षक भरत पाटील, पोलिस कर्मचारी शैलेश पाटील, अमित मोरे, विक्रम मोरे यांनी संशयीतांना हत्यारासह ताब्यात घेतले.

  घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक रोहिणी सोळंके, पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी पाहणी करुन पंचनामा केला. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. शिरोळ येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

    दत्ता पाटील खुन प्रकरणात मृत सचिन हा आरोपी होता. त्याच्या खुनप्रकरणी दोघा संशयीतांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत आणखी आरोपी आहेत का, याचा तपास सुरु आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा