![]() |
महिला तहसीलदार गीतांजली गरड यांना लाच लुचपत प्रकरणी केली अटक |
मुंबई : अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार येथील तहसीलदार गीतांजली गरड यांना एसीबीने लाच मागणीच्या प्रकरणांत अटक केल्याने एकच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर या आधीही शासकीय कागदपत्रात हेराफेरी करून शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हे दाखल असून २०१५ साली त्या पुणे जिल्ह्यात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या.
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी राखीव असलेल्या जमिनीच्या बेकायदा हस्तांतरण प्रकरणात पुणे जिल्ह्यातील शिरूरच्या तत्कालीन नायब तहसीलदार गीतांजली नामदेव गरड यांना समर्थ पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात साठ एकरांपेक्षा जास्त, म्हणजे कोट्यवधी रुपये किमतीच्या जमिनींचे बेकायदा हस्तांतरण झाल्याचे समोर आले होते.
गीतांजली गरड यांना अटक झाली तेव्हा त्या अन्नधान्य पुरवठा विभागात शहरात कार्यरत होत्या. या गुन्ह्यात सुभाष कारभारी नळकांडे (रा. बुरुंजवाडी,ता.शिरूर), तलाठी सचिन देवप्पा काळेल यांना देखील अटक करण्यात आली होती.तर जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयातील लिपिक चंद्रशेखर मुरलीधर ढवळे,मंडळ अधिकारी बळिराम खंडूजी कड (रा. शिक्रापूर) यांचा शोध घेवून त्यांनाही अटक करून आरोपी करण्यात आले होते.१४ डिसेंबर २०१७ ला समर्थ पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अलीकडच्या काळात लाच लुचपत प्रकरणी महिला अधिकारी व प्रशासकीय कर्मचारी लाच लुचपत प्रकरणी प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकण्याचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा नागरिकांच्या मध्ये आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा