Breaking

शुक्रवार, २८ जून, २०२४

*शांत, संयमी व शिस्तबद्ध व्यक्तीमत्व : प्रा.डॉ. धनंजय कर्णिक*


प्र. प्राचार्य डॉ. धनंजय बी. कर्णिक, जयसिंगपूर


लेखक व प्रा. डॉ. आर. डी. माने 

जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर


   प्र. प्राचार्य डॉ. डी. बी. कर्णिक आपल्या प्रदीर्घ प्राध्यापक सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत म्हणून लेख प्रपंच होय.साधी राहणी उच्च विचार सरणी, कडक शिस्त अशा पद्धतीचे कर्णिक सर सेवा निवृत्त होताना संमिश्र अशा भावना मनामध्ये निर्माण झाल्या आहेत. दिलेल्या प्रत्येक कार्याविषयी सरांच्या मनामध्ये आत्मिक आणि प्रामाणिक तळमळ पहायला मिळते. कोणतेही काम तन, मन, तसेच धन सुद्धा देण्याची त्यांची तयारी असते. अभिव्यक्ती आपल्याला दिसून येते. त्याचा दृष्टीकोण व्यापक असतो. नेहमी इतरांना मदत करण्याची त्यांची भावना असते. प्रत्येक कार्याचे नियोजन केलेले असते. ते नियोजनबद्ध जीवन जगताना दिसतात.

   कॉलेजमध्ये प्राध्यापक, विभाग प्रमुख ते प्र.प्राचार्य अशा भूमिका त्यांना पार पाडाव्या लागल्या. 'मनी वसे ते स्वप्नी दिसे' या उक्तीप्रमाणे त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना मिळत गेले. जे आहे त्यात समाधान त्यांनी मानले. त्यांनी लठ्ठे शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था, सांगली येथील पतसंस्थेमध्ये संचालक म्हणूनही काम पाहिले. अनेक पदे भूषवत असताना अनेक प्रसंगाना त्यांना सामोरे जावे लागले असेल पण डॉ.कर्णिक अजातशत्रू राहिले.

   सरांचा अनेक सामाजिक संस्थांशी नाते जोडलेले आहे. त्यातून त्यांची सामाजिक बांधीलकी दिसते. सर नियमितपणे समाजशील उपक्रमामध्ये भाग घेताना दिसतात. त्यातूनच ते येथील बौद्ध संस्कार मंडळ, जयसिंगपूर येथे ते विद्यमान अध्यक्ष म्हणून काम पहात आहेत. तत्पूर्वी ते स्वयंसेवकाप्रमाणे पडेल ते काम करण्याची त्यांची तयारी वाखाणण्यासारखी आहे. वृक्ष लागवडीसाठी लागणारे खड्डे काढणे, तारेचे कंपाऊंड करणेसाठी खांब लावणे, स्वच्छता करणे, प्रोसिडींग लिहिणे यासारखी अनेक कामे करताना सर दिसतात. बुद्ध संस्कार सरांच्या रोमा रोमामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा याप्रमाणे सर वागताना दिसतात. प्रसंगी संघर्ष करण्याची तयारी सरांची असते.

        डॉ. कर्णिक व प्रा. सुरेश भाटिया यांची जोडगोळी आपल्याला पहायला मिळते. एखाद्या विषयावरती विचारविनिमय करुन निर्णय घेणे व त्यानुसार कार्यवाही करणे. नियम व कायद्याचे पालन करणे. सचोटीने कामे करणे, काटेकोरपणा राखणे, सर्वांच्या सुखात दुःखात सहभागी होणे, प्रसंगी मदत करणे असे अनेक गुण सरांच्यामध्ये पहायला मिळतात.

    सर कुटुंब वत्सल आहेत. घरातील थोरा मोठ्यांचेकडे लक्ष देणे, पै पाहुणे सांभाळणे याच्याकडे सरांचा कल असतो. तिन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले आहे. सर्व भावांच्याकडे त्यांच्या मुलांच्याकडे सरांचे लक्ष असते. दुर्दैवाने सरांना दुःखाच्या अनेक प्रसंगातून सातत्याने जावे लागले. त्यातूनही ते सावरले व संस्थेने आणि कॉलेजनी दिलेली कामे वेळेवर करण्याकडे सरांचा कल असतो.

     ए.पी.आय. करण्याच्या उद्देशाने त्यांच्या डीपार्टमेंटला जाण्याचा योग आला तेथील टापटीपपणा, फाईलींगची मांडणी, कागदपत्रांची जुळणी, सुरेख मांडणी पाहून मी आचंबीत झालो. भूगोल हा विषय सोशल सायन्समध्ये येतो पण माझ्या मनामध्ये कला शाखेचा माणूस इतका शिस्तबद्ध असू शकतो याचा विश्वास मला नव्हता.कोणतेही प्रमाणपत्र किंवा संशोधन पेपर मागितला सर योग्य फाईल दाखवत होते. या वरुन सरांची कार्य करण्याची पद्धत कळते.

     डॉ. कर्णिक सर प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होताहेत त्यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व भावी आयुष्य सामाजिक काम करण्याचे, भरभराटीचे, दीर्घायुष्याचे लाभो हीच बुद्ध चरणी प्रार्थना

     जीवनात ही घडी अशीच राहू दे!

      नवीन कार्यामध्ये वसंत फुलू दे।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा