Breaking

सोमवार, २९ जुलै, २०२४

*महापूर आपत्तीग्रस्त हजारो कुटुंबे पशुधनासह स्थलांतरित ; पूरग्रस्तांची तात्काळ सानुग्रह अनुदानासाठीची जोरकस मागणी*

 

सैनिक टाकळी परिसरातील महापूर आपत्तीग्रस्त नागरिक, पशुपालक व पशुधन

*प्रा. चिदानंद अळोळी : उपसंपादक*


नृसिंहवाडी : शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी,अकिवाट, बस्तवाड, खिद्रापूर, राजापूर व राजापूरवाडीतील पूरबाधित नागरिक, पशुपालकानी सरकारने सरसकट सानुग्रह अनुदान व इतर मदत द्यावी, अशी मागणी राजापूरवाडी येथील महापूर आपत्तीग्रस्त माजी उपसरपंच विजय कदम यांनी जय हिंद न्यूज नेटवर्कशी बोलताना व्यक्त केली.

   ते पुढे म्हणाले, यावर्षी धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठावरील नागरिकांवर अस्मानी संकट कोसळले आहे. राजापूरवाडी, खिद्रापूर, राजापूर, अकिवाट व बस्तवाड या भागातील हजारो शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनासह कुटुंबे स्वखर्चाने सुरक्षित स्थळी स्थलांतरित केली आहेत. त्यामध्ये परिस्थितीचा गैरफायदा घेत वाहनधारकांनी अवास्तव भाडे आकारायला सुरूवात केली आहे. तसेच टाकळीवाडी, घोसरवाड, अकिवाट येथील सुरक्षित ठिकाणी अनेक नागरिकांनी भाड्याने घरे गोठे घेऊन जनावरे व कुटुंबांची सोय केली आहे. तिथेही त्यांची घरमालकांकडून लुबाडणूक झाली आहे. अनेक कुटुंबांना गावापासून दूर असणाऱ्या पै- पाहुण्यांनी आसरा दिला आहे. तेथे जाण्या - येण्यासाठी देखील मोठा खर्च झाला.

   काही पशुपालकांनी आपल्या पशुधनासाठी स्वखर्चातूनच तात्पुरते पत्र्यांचे शेड उभारले आहेत. त्याचा खर्च पशुसेवेसाठी पूरग्रस्तानेच सोसला आहे. दिनांक २३/७/ २०२४ पासून २९/७/२/२०२४ पर्यंत कुटुंब व जनावरे स्थलांतरित झाली आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता स्वखर्चातूनच सुरक्षित स्थळे गाठली आहेत. पण आपत्ती काळात प्रशासनाने नागरिकांची सोय करण्याचा कायदा असूनही प्रशासनाकडून त्यांना काडीची ही मदत झालेली नाही. दानशूर दातृत्वाकडून सुरू असलेल्या छावण्यांमध्ये ठराविक मोजकेच स्थलांतरित नागरिक व स्थलांतरित जनावरे दिसून येत आहेत. प्रत्यक्षात ८०% जनावरे व कुटुंबे स्वबळावरच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झालेली आहेत.

  त्यामुळे सरकारकडून जाचक अटी, शर्ती न लावता सरसकट स्थलांतरित नागरिकांना तातडीची मदत जाहीर करून सानुग्रह अनुदान वाटप करण्याचे काम जलदगतीने सुरू करावे अशी मागणी महापूर बाधित गाव राजापूरवाडी येथील माजी उपसरपंच विजय कदम व  माजी सरपंच विजय एकसंबे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा