![]() |
मा.मनीषा तपस्वी मार्गदर्शन करताना सोबत डॉ.श्रीकृष्ण महाजन |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : चिरंतन व यशस्वी उद्योग निर्मितीसाठी पारंपारिक ज्ञान व कौशल्याबरोबरच नाविन्यपूर्ण कल्पनांची आवश्यकता आहे. तरुणांनी नोकऱ्यांच्या पाठीमागे न धावता उद्योजिकतेची कास धरली पाहिजे. त्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य संपादित केले पाहिजे असे प्रतिपादन मनीषा तपस्वी यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्र व देअसरा फौंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘प्रथम पिढी उद्योजकता विकास कार्यक्रम’ उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. श्रीकृष्ण महाजन अध्यक्षस्थानी होते.
उद्योजिकतेचा कोणताही कौटुंबिक वारसा अथवा पार्श्वभूमी नसलेले विद्यार्थी, दिव्यांग, तृतीय पंथी व वंचित घटकातील व्यक्ती यांच्यामध्ये उद्योजिकते बाबत जागृती व प्रेरणा निर्माण करणे आणि त्यातून त्यांनी उद्योजक बनावे या उद्देशाने शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्र व देअसरा फौंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रथम पिढी उद्योजकता विकास कार्यक्रम’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुढे बोलताना तपस्वी म्हणाल्या, देशात आज ४० टक्के लोकांकडे नोकऱ्या अथवा रोजगार नाही त्यामुळे तरुणांनी उद्योजकतेकडे वळले पाहिजे. आजच्या यशस्वी उद्योजकांच्या यशामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच सामाजिक माध्यमे महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत. दृढता, जोखीम, नेटवर्किंग, सृजनशीलता व सहानुभूती या तत्त्वांचा अंगिकार केल्यास उद्योग वा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो.
या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात विद्यापीठ अधिविभाग, देशभक्त रत्नाप्पा कुंभार महाविद्यालय, राजर्षी शाहू महाविद्यालय, छत्रपती शहाजी महाविद्यालय, न्यू कॉलेज, कोल्हापूर, शिवराज कला व वाणिज्य आणि घाळी कॉलेज, गडहिंग्लज, राजर्षी शाहू महविद्यालय, रुकडी, हेल्पर्स ऑफ हैन्डीकॅप व मैयत्री संघटना, कोल्हापूर यांचा समावेश आहे.
अध्यक्षीय भाषण करताना प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन म्हणाले, ‘ यशस्वी उद्योजक होऊ इच्छिणाऱ्यांच्या अंगी उद्यमशीलता आवश्यक आहे. काही उद्योगांमध्ये फक्त भांडवल नव्हे तर संकल्पनांची आवश्यकता असते. एखादी शासकीय योजना आहे म्हणून व्यवसाय करू नका. कोणताही उद्योग किंवा व्यवसाय सुरु करताना किमान ५० टक्के स्व-भांडवलाची आवश्यकता असावी.
प्रा. अविनाश भाले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आभार डॉ. किशोर खिलारे यांनी मानले. यावेळी डॉ. नितीन माळी, डॉ, अमोल मिणचेकर, डॉ. परशुराम वडर डॉ. निलम खामकर व चारुशीला तासगावे यांच्याबरोबर विविध अधिविभागातील प्राध्यापकवृंद उपस्थित होते. या रचनात्मक कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा