![]() |
लेखिका सौ. आरती लाटणे, इचलकरंजी, भ्रमणध्वनी : 99 70 26 44 53 |
एक तरी वारी अनुभवावी......
माझे माहेर पंढरी
सुखे नांदू भीमातीरी ||
असं म्हणत वारकरी आषाढी एकादशीच्या वारीला निघतात. विठ्ठल रुक्माई, विठोबा रुक्माईचा गजर आसमंतात दुमदुमतो. लाखोंच्या संख्येने येणारा वारकरीमेळा देशाच्या अनेकविध प्रांतातून एकत्र येत असतो.
ना कुठले आमंत्रण, ना रुसवा फुगवा, ना मोठेपणाचा डौल, ना जातीपातीचा भेदभाव, ना गरिबीची लाज, ना लहान थोरांचा मानपान, ना जेवणाचा शाही थाट, एवढेच नव्हे तर श्रीमंतातील श्रीमंत देखील दिंडीत असताना स्वतःचे वैभव विसरून जातो. आणि, तरीही पांडुरंगाच्या भेटीसाठी चाललेले प्रत्येक पाऊल श्रद्धेने, भक्तीने पांडुरंगाच्या दर्शनासाठी आसुसलेले असते. मजल दर मजल करत, एकमेकांना सोबत घेऊन, भजनात तल्लीन होऊन हा मेळा वाऱ्याच्या वेगाने पंढरपूरकडे झेपावतो. वाटेत येणाऱ्या छोट्या मोठ्या गावांना आपल्या पदस्पर्शाने पुनीत करित वारकरी संप्रदाय संतांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतो.
माझ्या माहेर गावातून(तुळशी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर) जाणारी नामदेवांची पालखी, मुक्ताईची पालखी, नाथांची, गजानन महाराजांची पालखी, इ. फक्त आठवण काढली तरी एक वेगळाच आनंद मनातून संचारतो. कित्येक शतकापासून ची असलेली परंपरा गावाने अजूनही जपली आहे.
पालखी गावापासून एक दीड किलोमीटर लांब आहे तोपर्यंतच गावात लगबग सुरू होते. फक्त टाळकरी, वारकरीच नव्हे तर गावातील शाळेतून देखील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षकांसह वारीच्या स्वागताला गावच्या वेशीवर जमतात. शाळेत येणाऱ्या नव्या पाहुण्याचं स्वागत करावं तसं जंगी स्वागत करण्यासाठी बाळचमु रस्त्याच्या दुतर्फा शिस्तबद्ध ओळीत उभे राहतात. हातात ना टाळ, ना चिपळी तरीही फक्त चिमुकल्या हाताने टाळी वाजवत, विठ्ठल नामाचा घोष दूमदूमतो. गावातील टाळकरी, भजनकरी, टाळ, पखवाज, पताका, चिपळ्या घेऊन पालखीच्या स्वागतासाठी वेशीवर जातात. इकडे गावात प्रत्येक जण आपल्या दारात सडा रांगोळी करतात.
दुरून पालखीचे दर्शन होताच, एका स्वरात,"बोला पुंडलिका वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय...." असा मोठ्या स्वरात परमात्म्याचा जयजयकार होतो. विठ्ठल रुक्माई चा नामघोष करीत पालखीचे गावामध्ये स्वागत होते. गार हवा, अधून मधून येणारी पावसाची सर आणि वैयक्तिक येणाऱ्या काही अडचणींचा आनंदाने सामना करत दिंडी गावात पोहोचते.
चालून चालून दमलेल्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी गावातून अनेक चहाच्या किटल्या मंदिरामध्ये जमा होतात. गरमागरम वाफाळलेला चहा गारठलेल्या वारकऱ्यांना ताजेतवाने करतो. म्हातारपणाची दुखणीखुपणी नाही की तरुणपणाचा अहंकार नाही, लहानांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत दिंडीत सहभागी सारेचजण कमालीचे समाधानी जाणवतात.
*वारकरी आमटी अथवा बाजारी आमटी*
संध्याकाळच्या जेवणासाठी गावातून आजही दवंडी पिटवली जाते आणि वारकऱ्यांसाठी जेवण गोळा केलं जातं. आजही नाथांच्या पालखीसाठी जेवण एकत्र शिजवले जाते. त्यासाठी ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार धान्यही मंदिरामध्ये जमा होते. एकत्र अन शिजवलं जातं. प्रत्येक पंगतीची सुरुवात वदनी कवल घेता... या सुमधुर श्लोक नी होते. आणि सहभोजनाचा एक नयनरम्य सोहळा गावात पार पडत असतो.
वारीचं वैशिष्ट्य म्हणजे वारीतून दमून भागून आलेल्या वारकर्याला आपल्या स्वतःच्या घरामध्ये जेवून तृप्त करणे यालाही फार मोठे महत्त्व आजही गावात मानलं जातं. एक तरी वारकरी आपल्या घरी आणून, आपल्या घरात स्वतःच्या हाताने, गृहिणी त्याला जेवायला वाढते. त्याच्या चेहऱ्यावरची तृप्ती, परमात्मा परमेश्वर पांडुरंग भेटल्याचा आनंद देऊन जाते. आपल्याला चालत वारीमध्ये सहभागी होता येत नाही. किमान परमेश्वराकडे चालत जाणाऱ्या वारकऱ्याचे पायधूळ आपल्या घरी लागते. याचं समाधान काही औरच असतं. म्हणूनच आजही चालून थकलेल्या दमलेल्या वारकऱ्यांना जेवायला बोलावणं आणि वारकऱ्यांनी आपल्या घरी येणं हे फार भाग्याचे समजले जाते. या जेवणाचे वैशिष्ट्य असं की, पाचीपक्वनांचा थाट नसतो, दिव्यांची आरास नसते, फटाक्याचा अथवा नवनवीन कपड्यांचा झगमगाट नसतो ... तरीही गावात घरोघरी एक प्रकारची दिवाळी साजरी होत असते. तुरीच्या डाळी पासून बनवली जाणारी आमटी ही अतिशय चविष्ट, खमंग आणि झणझणीत असते. ही खास वारकरी आमटी किंवा बाजारी आमटी म्हणून सोलापूर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. चपाती, आमटी आणि भात असं अतिशय साध्या पद्धतीचं जेवण बनवलं जातं. शुद्ध, नि: स्वार्थी भावनेने केलेल्या अन्नदानातून फार मोठं आंतरीक समाधान मिळते हे त्या वातावरणात गेल्यावर नक्कीच जाणवते.
गावातून मुक्काम करून जाणाऱ्या प्रत्येक पालखीकडून गावकऱ्यांना बौद्धिक खाद्य अर्थात कीर्तनाचा आस्वाद मिळतो. वैशिष्ट्य असे की, दिवसभर चालणारा वारकरी संध्याकाळी बारा- एक वाजेपर्यंत कीर्तनसेवा देतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे लवकर उठून चालायला सुरुवात करतात. खरंच धावत पळत येणारी पालखी पुढे अरणच्या दिशेने धावत पळतच निघून जाते.
सर्वात श्रीमंत असणार्या गजानन महाराजांच्या पालखीचे सौंदर्य डोळे दिपवणारे आहे. पुढे घोडे, आब्दागिरी आणि टाळकर्यांच्या तालासुरात मागून येणारे हत्ती. .... अहाहा काय तो दिमाख आणि तो भक्तीमय सोहळा. अगदी डोळ्यात साठवून घेण्यासारखा देखावा गजानन महाराजांच्या पालखीत पाहायला मिळतो. खरी दानत काय असते, हे या मंडळींकडून शिकावी. ही दिंडी फक्त गावाला स्पर्श करून जाते. तरीही त्याचे सौंदर्य पाहण्यासाठी आबालवृद्ध जणू वेडेच होतात. पालखीवरून अनेक जीवनावश्यक वस्तूंचे आजूबाजूला गोरगरीब लोकांना वाटप करत ही पालखी अगदी धावत पळतच गावच्या वेशीवरून निघून जाते.
आषाढी वारी संपेपर्यंत अशा पालख्या गावात येऊन जातात, पण तो क्षण पुढे वर्षभर एक वेगळीच ऊर्जा निर्माण करून जातो.
आजही अनेक भागातून आपल्या घराण्याची वारी पोहोचवण्यासाठी अनेकजण वारीमध्ये सहभागी होताना दिसतात. एवढंच नव्हे तर ज्यांना संतांचे कार्य उमजू लागले आहे आणि संत कार्यातून निर्माण झालेला भक्तीभाव समजू लागला आहे असे अनेक जण वारीमध्ये सहभागी होत आहेत.
हल्ली वारकरी ड्रेस म्हणून पांढरा सदरा (तीन बटनाचा नेहरू शर्ट), पायजमा अथवा धोतर, कपाळाला गोपीचंद टिळा, गळ्यात तुळशीची माळ...इ असा काही पोशाख केला जातो. तसं पाहिलं तर पंढरपूर परिसर असेल, सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा असेल या भागामध्ये उष्णता जास्त असते. म्हणून उष्णता परावर्तित करणारे पांढरे शुभ्र कपडे वापरण्याची पद्धत तिथे आहे. परिसर सांप्रदायिक असल्यामुळे अर्थातच शाकाहारी राहणं बहुतांशी लोक पसंत करतात.
काही म्हणा, वारीच्या निमित्ताने का होईना लोकांसाठी संतांचे कार्य समजून घेऊन एकोप्याने राहण्याची एक संधी निर्माण होत आहे.
शेकडो वर्षांपूर्वी सांप्रदायिक वातावरणात भक्तीभाव निर्माण करून खऱ्या अर्थाने जातीय भेदभाव नष्ट करण्याची आणि सलोख्याने राहण्याची शिकवण संतांनी घालून दिली. म्हणूनच आजही वारीमध्ये गरीब श्रीमंत , जातपात असा कोणताही भेद दिसून येत नाही. माणसाने आपली सदसदविवेक बुद्धी जागृत ठेवून एकमेकांशी प्रेमाने, आपुलकीने, माणुसकीने राहावे यासाठी संतांनी अनेक भारुडे, भजन, गवळणी,... इत्यादी साहित्याची निर्मिती केली आणि त्या साहित्याचाच गजर या दिंडीतून होताना दिसतो. सर्वात वैशिष्ट्य म्हणजे संत साहित्यामध्ये कुठेही अंधश्रद्धा अथवा भाबडेपणा दिसून येत नाही. असे मोलाचे कार्य संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, यासह संत मुक्ताई, संत जनाई, संत बहिणाबाई.....यासारख्या अनेक संतांच्या हातून घडले. ज्या कार्याची गरज आजही निश्चितच जाणवते. म्हणून च अशा महान व्यक्तींच्या पालखीची धूळ गाव वेशीला लागली तरी मन भरून येतं.
गाववेशीवरून जाणाऱ्या अनेक दिंड्या, वारकऱ्यांच्या मधील एकी, निस्वार्थ भक्तीभाव, पाहिला की आजही आपली भूमी संतांची भूमी आहे हे मनोमन पटतं. म्हणूनच हा सगळा सोहळा अनुभवण्यासाठी हातपाय, ठणठणीत आहेत तोपर्यंतच एक तरी वारी अनुभवावी, हेच खरं. तरच सोयराबाईच्या या रसाळ रचनेचा भावार्थ आपल्याला आपोआप उमजेल....,
अवघा रंग एक झाला|
रंगी रंगला श्रीरंग||
मी तू पण गेले वाया|
पाहता पंढरीचा राया||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा