Breaking

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४

*शैक्षणिक प्रणालीला अधिक स्पर्धात्मक बनवणे आणि विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर सक्षम करणे हा शिवाजी विद्यापीठाचा हेतू : मानव्यशास्त्र अधिष्ठाता प्रा.डॉ. महादेव देशमुख यांचे प्रतिपादन*

 

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना अधिष्ठाता प्रा.डॉ. महादेव देशमुख उपस्थित प्राचार्य डॉ. जयवंत इंगळे, प्रा.डॉ.अनिलकुमार वावरे, प्राचार्य डॉ.सौ. डी.जी.इंगळे,डॉ.रूपे व डॉ.यादव


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


निपाणी : नवीन शैक्षणिक धोरण २०२० व्दारे भारताच्या शैक्षणिक प्रणालीला अधिक स्पर्धात्मक बनवणे आणि विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर सक्षम करणे हा शिवाजी विद्यापीठाचा हेतू असल्याचे मत शिवाजी विद्यापीठाचे मानव्यशास्त्र अधिष्ठाता प्रा.डॉ. महादेव देशमुख यांनी देवचंद कॉलेज, अर्जुननगर (निपाणी) येथे नवीन अभ्यासक्रमावर आधारित अर्थशास्त्र विषयाच्या कार्यशाळेत उद्घाटक म्हणून प्रतिपादित केले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी कॉलेजच्या प्राचार्य डॉ.सौ.जी.डी.इंगळे, अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जयवंत इंगळे व अर्थशास्त्रज्ञ प्रा.डॉ. अनिलकुमार वावरे उपस्थित होते.

   प्रा.डॉ. देशमुख पुढे म्हणाले, अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमात नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदल केल्याने विद्यार्थी भविष्याच्या आर्थिक आणि तांत्रिक आव्हानांना समर्थपणे तोंड देऊ शकतील. विद्यार्थ्यांना विषय व्यतिरिक्त ज्ञान संपादन होण्यासाठी बहुउद्देशीय घटक समाविष्ट केले असल्याचेही ते म्हणाले. 


    या कार्यशाळेचे अध्यक्षीय भाष्य करताना डॉ.जयवंत इंगळे म्हणाले, अर्थशास्त्रीय ज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थी वैचारिकदृष्ट्या सक्षम बनतात.त्याआधारे विद्यार्थ्यांना सेवा,उद्योग व इतर क्षेत्रात संधी मिळू शकतात. तसेच राष्ट्रीय ऐक्य, सक्षम व आदर्श नागरिक बनविण्यासाठी हे शैक्षणिक धोरण उपयोगी पडते. सत्राध्यक्ष म्हणून डॉ. मनोहर कोरे यांनी उत्तम मार्गदर्शन केले

     प्रथम सत्रात सूक्ष्म अर्थशास्त्र भाग-१ मार्गदर्शन करताना साधन व्यक्ती म्हणून प्रा.डॉ. अनिलकुमार वावरे म्हणाले, अर्थशास्त्राच्या अभ्यासातून  विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या मुख्य प्रवाहात आणता येते. त्यामुळे अर्थशास्त्र विषयामुळे विविध क्षेत्रात उत्तम करिअरची संधी उपलब्ध होत आहे. सत्राध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.मोहन सदामते उपस्थित होते. 


      द्वितीय सत्रात डॉ. सचिन सरदेसाई यांनी सूक्ष्म अर्थशास्त्र भाग-२ या विषयावर साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन करताना त्यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विविध संकल्पना वेगळ्या पद्धतीने मांडून नवीन अध्यापन पद्धत सादर केली. या सत्राचे अध्यक्ष म्हणून डॉ. प्रकाश टोणे उपस्थित होते. 

     तृतीय सत्रात साधन व्यक्ती म्हणून डॉ. प्रभाकर माने यांनी आर्थिक विचारांचा इतिहास  या विषयावर विविध अर्थशास्त्रज्ञांच्या विचारांची सांगोपांग मांडणी केली. सत्राध्यक्ष म्हणून डॉ. संजय धोंडे यांचे मार्गदर्शन लाभले. 

    चौथ्या सत्रात डॉ. अनिल सत्रे यांनी आर्थिक विचारांचा इतिहास या विषयाच्या अनुषंगाने भारतीय अर्थशास्त्रज्ञांची स्पर्धा परीक्षाभिमुख आधारावर मांडणी केली. सत्राध्यक्ष म्हणून डॉ. संजय चव्हाण उपस्थित होते. 

    समारोप सत्रात प्राचार्य डॉ.सौ. इंगळे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना अर्थशास्त्र विषयाचे महत्त्व विशद करून आजच्या घडीला अर्थशास्त्र विषय करिअर साठी कसा उपयुक्त आहे याविषयी भाष्य केले. यावेळी उपस्थित असणाऱ्या प्राध्यापकांना सन्माननीय पाहुण्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. 

     या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे देवचंद कॉलेज, अर्जुननगर यांनी सुयेक व मराठी अर्थशास्त्र परिषद यांच्याशी MOU करून आपले विस्तृत धोरण स्पष्ट केले. याप्रसंगी संस्थेचे मा.आशिषभाई शहा, प्राचार्य डॉ. डी.जी.इंगळे मॅडम,डॉ.रूपे, अर्थसंवाद चे संपादक डॉ.राहुल म्होपरे, डॉ. संतोष यादव, डॉ.राजकुमार वाईगंडे, सूयेकचे कार्याध्यक्ष डॉ. संजय धोंडे व मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा.डॉ.अनिलकुमार वावरे उपस्थित होते.

       सदरची कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या कार्यशाळेचे उत्तम नियोजन अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रूपे, समन्वयक डॉ. संतोष यादव व डॉ. राहुल म्होपरे यांनी केले. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन ज्योती बुवा व इतर सर्व सत्रांचे सूत्रसंचालन कु.गौरी सुतार यांनी केले.कार्यक्रमाचे आभार डॉ. संतोष यादव यांनी केले. कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठ क्षेत्रातील ६३ प्राध्यापक उपस्थित होते.या कार्यशाळेस शिवाजी विद्यापीठाचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा