Breaking

सोमवार, १९ ऑगस्ट, २०२४

*प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ व लेखक प्रा.डॉ.जयवंतराव इंगळे यांची मलकापूरच्या प्रा.एन.डी.पाटील कॉलेजच्या प्र.प्राचार्य पदावर निवड*

 

अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन व प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ प्रा.डॉ. जयवंत इंगळे यांची प्र.प्राचार्य पदी निवड


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


  कोल्हापूर :  मलकापूर (पेरीड) येथील प्रा. एन. डी.पाटील महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.जयवंतराव इंगळे यांची रयत शिक्षण संस्थेने प्र.प्राचार्य पदावर निवड केली असून ते या पदावर रुजू झाले आहेत.

       प्रा.डॉ.इंगळे सन १९९० पासून गेली ३४ वर्षे रयत शिक्षण संस्थेत अध्यापनाचे काम करत आहेत. त्यांनी संस्थेच्या सांगली (विटा), सातारा(उंब्रज,कोरेगाव, लोणंद), कोल्हापूर (हुपरी, मलकापूर), सोलापूर,पुणे(मंचर),ठाणे(मोखाडा), रायगड(पनवेल) इत्यादी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाचे लेक्चरर, असोसिएट प्रोफेसर,प्रोफेसर, आणि विभाग प्रमुख पदावर काम केले आहे.

        डॉ. इंगळे हे शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे विद्यमान कार्यशील  अध्यक्ष असून ते शिवाजी विद्यापीठाच्या विद्या परिषदेचे आणि मानव्यविज्ञान शाखेचे ते सदस्य आहेत.डॉ. इंगळे हे शिवाजी विद्यापीठाच्या संशोधन सल्लागार समितीचे,डिपार्टमेंटल रिसर्च कमिटीचे आणि रिसर्च अँड रेकगनेशन कमिटीचे सदस्य आहेत.शिवाजी विद्यापीठाचे पीएच. डी चे मार्गदर्शक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत एका विद्यार्थ्याने एम. फील आणि ६ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.

      डॉ. जयवंत इंगळे हे शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र परिषदेच्या "शिवार्थ" या रिसर्च जर्नलचे प्रमुख संपादक आहेत. ते अखिल भारतीय मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत.डॉ. इंगळे यांचे विविध वृत्तपत्रात सुमारे ३० आर्थिक व सामाजिक लेख प्रसिद्ध झाले आहेत.अर्थशास्त्र विषयाच्या विविध रिसर्च जर्नल मध्ये त्यांचे सुमारे १०० शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे एकूण १० संशोधन ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.अर्थशास्त्र विषयाशी संबंधित सुमारे ३० पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आहे. डॉ.इंगळे यांनी विविध ठिकाणी विविध विषयावर सुमारे १०० व्याख्याने दिली आहेत. यू ट्यूबवर त्यांची १२० व्याख्याने आहेत. विशेष करून म.गांधी विचार या विषयावर युट्यूबवर १३० व्याख्याने देण्याचा त्यांनी संकल्प केला असून या विषयावर त्यांनी आत्तापर्यंत ६२ व्याख्याने दिली आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील या विषयावर त्यांनी २० कथा लिहिल्या आहेत. 

        डॉ. इंगळे प्रामुख्याने समाजातील वंचित घटक अर्थात आदिवासी समाजाचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आदिवासी या विषयावर एम.फील आणि पीएच. डी. पदवी संपादन केली आहे.ते ट्रिपल पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. या पदव्या प्राप्त करण्यासाठी त्यांनी आदिवासी हाच विषय निवडला होता. आदिवासी या विषयावर त्यांचे ०६ संशोधन ग्रंथ,६० शोधनिबंध,०६ संशोधन प्रकल्प एवढे लेखन प्रसिद्ध आहे. पुढारी,सकाळ,महाराष्ट्र टाइम्स सारख्या अनेक दैनिकात आदिवासी विषयावर त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत.आदिवासी,कष्टकरी, शेतकरी,कामगार आणि वंचित लोक हे त्यांच्या अभ्यासाचे व आस्थेचे विषय आहेत.

      डॉ. इंगळे यांच्या संशोधन ग्रंथांना,आर्थिक व सामाजिक लेखाना,शोधनिबंध इत्यादींना आत्तापर्यंत सुमारे ३० पारितोषिके मिळाली आहेत. ही पारितोषिके त्यांना मा. शरद पवार साहेब, मा. सुषमा स्वराज,भारतीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांच्या हस्ते मिळाली आहेत.डॉ. इंगळे यांना "डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट ग्रंथ पारितोषिक", पत्रपंडित पा.वा. गाडगीळ पारितोषिक, ग.प्र. पिंपरकर व अमर्त्य सेन पारितोषिक इत्यादी प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत.डॉ. इंगळे यांना दोन आदर्श शिक्षक पुरस्कार आणि दोन समाज गौरव पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना पत्रकार विलासराव कोळेकर यांच्या ईगल फाऊंडेशनचा पुरस्कार मिळाला आहे.

      डॉ. इंगळे यांनी आदिवासी मोखाडा तालुक्यात आदिवासी महिला शिबिरांचे,आरोग्य शिबिरांचे, स्वच्छता मोहिमांचे आयोजन केले होते. कोरेगाव जिल्हा सातारा येथे त्यांनी दोन राज्यस्तरीय साहित्य संमेलने आयोजित केली होती. 

             डॉ. इंगळे हे बॅरिस्टर पी.जी.पाटील बॅरिस्टर पंजाबराव देशमुख अभ्यास व संशोधन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच त्यांनी सेंद्रिय शेतीवर पुस्तक लिहिले असून ते सेंद्रिय शेती प्रचार व प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष आहेत.अर्थशास्त्र विषयाची व्याप्ती व गुणवत्ता वाढवणारे प्राध्यापक म्हणून ते परिचयाचे आहेत. सुयेक व मराठी अर्थशास्त्र परिषदेसाठी त्यांचं काम वाखाण्याजोगे आहे. 

       डॉ. जयवंत इंगळे यांची मलकापूर येथील प्रा.एन. डी. पाटील महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा