![]() |
मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. रवींद्र कुलकर्णी व सर्व मान्यवर पदाधिकारी |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कुरुंदवाड : "विद्यार्थ्यांनी स्वतःचं विश्व स्वतः निर्माण करणं गरजेचं आहे तरच नोकरी व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण होतील."असं प्रतिपादन डेक्कन एज्युकेशन सोसायटी,पुण्याचे प्रा.डॉ.रविंद्र कुलकर्णी यांनी केले.ते साधना मंडळ,कुरुंदवाड येथील सा.रे.पाटील सभागृहात म.बसवण्णा सामाजिक सेवा प्रतिष्ठान तर्फे आयोजित गुणवंतांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड.अरुण कल्लण्णावर हे होते.यावेळी स्वा.से.श्रीपाल काका आलासे अर्बन बँकेचे चेअरमन प्रदीप पाटील, प्रथितयश उद्योजक कुरुंदवाड भुषण संतोष शहा,लिंगायत समाज ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.देवराज मगदूम हेसुद्धा उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शुभम स्वामी यांच्या हस्ते भस्मार्चन, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बसव प्रतिमा पुजन,माल्यार्पण झाल्यानंतर अमृता आणि अस्मिता निलेश पावटे यांच्या बसवस्तुतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रतिष्ठानचे अध्यक्ष आकाशवाणी पुना येथील सहायक निदेशक सच्चिदानंद आवटी यांनी प्रास्ताविक केले.स्वागत व पाहुण्यांचा परिचय प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व विलिंग्डन महाविद्यालय सांगली येथील अर्थशास्त्राचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.मनोहर कोरे यांनी करुन दिला.
त्यानंतर आपल्या मार्गदर्शनपर भाषणांमध्ये प्रमुख पाहुणे रविंद्र कुलकर्णी यांनी बदलते शैक्षणिक जग आणि भविष्याचा वेध घेताना विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर विवेचन केले. विद्यार्थ्यांनी सजग होऊन अभ्यासक्रम निवडत असतानाच माणूस होण्याचे विसरू नये. त्यांनी खडतर परिश्रमातून आपले ध्येय साध्य करण्यासाठी योग्य मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन घेणे ही तितकेच गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. आपल्या खुमासदार शैलीत व ओघ वत्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून भविष्याचा वेध घेताना आपली तयारी कशी असावी याची यथा सांग मांडणी केली
त्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणामधुन ॲड.अरुण कल्लण्णावर यांनी विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे ध्येयवेडे असलं पाहिजे.हे अनेक उदाहरणातून स्पष्ट केले.
या कार्यक्रमावेळी नीट , इयत्ता १० वी,१२ वी, स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर आचार्य अत्रे पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आनंदा शिंगे यांचा तसेच पत्रकारिता क्षेत्रातील पदवी मोठ्या कष्टाने मिळवल्या बद्दल जमीर पठाण यांचा सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण देखील करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्वती बनछोडे आणि सौ.सारिका आवटी यांनी केले.आभार प्रदर्शन प्रतिष्ठानचे सचिव गणेश कुंभार यांनी मानले.
कुरुंदवाड आणि परिसरातील सर्व शाळा व महाविद्यालयांच्या सर्व विद्यार्थ्यांना सामावून घेणारा हा कार्यक्रम एक दिशादर्शक ठरला.या कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांबरोबरच कुरुंदवाड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा