Breaking

शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४

*कुलगुरू डॉ. शिर्के यांचेकडून ऑलिंपिक विजेत्या स्वप्नीलसह कुसाळे कुटुंबियांचे अभिनंदन*

 

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी स्वप्निल कुसाळे यांच्या कुटुंबीयांचे विशेष पत्र पाठवून केले अभिनंदन


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत नेमबाजीमध्ये ब्राँझ पदक मिळवून कोल्हापूरचे नाव जागतिक नकाशावर झळकविण्याची ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या स्वप्नील कुसाळे यांच्या कुटुंबियांचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी विशेष पत्र पाठवून शिवाजी विद्यापीठ परिवारातर्फे अभिनंदन केले आहे.

     स्वप्नील यांचे वडिल सुरेश कुसाळे यांना लिहीलेल्या या पत्रात कुलगुरू डॉ. शिर्के यांनी म्हटले आहे की, आपले सुपुत्र श्री. स्वप्नील कुसाळे यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी नोंदविली असून या ऐतिहासिक कामगिरीसाठी स्वप्नील यांच्यासह आपण सर्व कुसाळे कुटुंबिय अभिनंदनास पात्र आहात. कांबळवाडीसारख्या खेडेगावामध्ये नेमबाजीसारख्या तुलनेत महागड्या खेळाचे स्वप्न पाहणे, ते जिद्दीने पूर्ण करणे आणि अंतिमतः ऑलिम्पिक पदकाची त्यावर मोहोर उमटविणे ही स्वप्नवत कामगिरी स्वप्नील यांनी बजावली आहे; यामागे आपणा कुटुंबियांचे योगदान अमूल्य स्वरुपाचे आहे. म्हणून आपण सर्व अभिनंदनास पात्र आहात. स्वप्नीलने भारताला तिसरे पदक मिळवून दिले, हे तर सत्यच; पण, कोल्हापूरच्याच श्री. खाशाबा जाधव यांच्यानंतर ७२ वर्षांनी महाराष्ट्राचे नाव ऑलिम्पिकमध्ये झळकविण्याचा ऐतिहासिक विक्रम कोल्हापूरच्याच स्वप्नील यांनी नोंदविला, याचाही शिवाजी विद्यापीठ परिवारास मोठा अभिमान असल्याचे कुलगुरूंनी नमूद केले आहे. तसेच, स्वप्नीलसह आपणा सर्वांचे अभिनंदन करण्यासाठी आपण व्यक्तिशः येणार असल्याचेही म्हटले आहे.

   सदरचे पत्र विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी आज सायंकाळी कांबळवाडी येथे कुसाळे कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना प्रदान केले आणि विद्यापीठाच्या वतीने त्यांचे अभिनंदनही केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा