Breaking

बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४

*मानसिक आरोग्य जागरूकतेसाठी सर्व पातळीवर विशेष प्रयत्नांची आवश्यकता : डॉ. जीवन पाटील यांचे प्रतिपादन*


विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.जीवन पाटील, उप प्राचार्य प्रा.डॉ.सौ. विजयमाला चौगुले,प्रा.डॉ. एस.जी.संसुद्धी व प्रा.डॉ. तुषार घाटगे 

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : दरवर्षी १० सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंधक  दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.या दिनाच्या माध्यमातून आत्महत्या या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी म्हणून विशेष महत्त्व दिले जाते. जागतिक स्तरावर दरवर्षी लाखो लोक आत्महत्या करतात, ज्याचे एक प्रमुख कारण म्हणजे मानसिक आरोग्याच्या समस्या. यामुळे या दिवसाचे उद्दिष्ट मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढवणे आणि आत्महत्येच्या प्रमाणात घट करणे आवश्यक असल्याचे  प्रतिपादन देशभक्त खंजिरे नाईट कॉलेज इचलकरंजीचे प्रा.डॉ. जीवन पाटील यांनी जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे मानसशास्त्र विभाग आयोजित विशेष व्याख्यानात केले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.एस.जी.संसुद्धी  प्रा.डॉ. टी.जी. घाटगे उपस्थित होते.

  डॉ. पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले,मानसिक आरोग्याच्या समस्यांचा प्रभाव आपल्या जीवनाच्या सर्व पैलूंवर पडतो. नैराश्य, चिंता, ताण-तणाव, आणि मानसिक अस्थिरता हे आत्महत्येच्या घटनांना कारणीभूत ठरतात. विशेषतः युवकांमध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे, कारण त्यांना शैक्षणिक, आर्थिक, आणि सामाजिक ताणतणावाचा सामना करावा लागतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, २५ ते २९ वयोगटातील युवकांमध्ये आत्महत्या ही मृत्यूचे दुसरे मोठे कारण आहे.

  मानसिक आरोग्यावर विशेष लक्ष देणे हे आत्महत्या प्रतिबंधासाठी अत्यावश्यक आहे. यासाठी सरकार, सामाजिक संस्था, आणि वैद्यकीय तज्ञांनी एकत्र येऊन मानसिक आरोग्य सेवा सुलभ आणि सर्वांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

      यासाठी देशभरात मानसिक आरोग्याच्या सेवांचा विस्तार करणे आवश्यक आहे. समुपदेशन (काउन्सेलिंग), थेरपी, आणि तात्काळ मदतीसाठी हेल्पलाइन सेवा यांसारख्या सेवा सुलभ करणे गरजेचे आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता कार्यक्रम राबवणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना ताणतणाव व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे आणि त्यांना मदतीसाठी उपलब्ध असलेल्या सेवांची माहिती देणे त्याचबरोबर सामाजिक समर्थन संबंधित घटकांना मिळणे आवश्यक आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्यामध्ये असलेल्या क्षमतेबाबत विद्यार्थ्यांना प्रबोधित केले. तसेच Yes I can Do it.,Yes I can change it.,Yes I can achieve it and Yes I have confidenence या सकारात्मक वाक्यांच्या माध्यमातून सभागृहात नवचैतन्यपूर्ण व आनंददायी वातावरण निर्माण केले.

     या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मानसशास्त्र विभाग प्रमुख व उपप्राचार्य प्रा.डॉ.सौ. विजयमाला चौगुले यांनी केले. पाहुण्यांचा परिचय विद्यार्थिनी कु. हिने केले.आभार प्रदर्शन कु.विद्या कोरवी, सूत्रसंचालन प्रा. वर्षा चौगुले यांनी केले. या कार्यक्रमास प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा