बुधवार, ९ ऑक्टोबर, २०२४

साहित्यिकांनी म. गांधींजीचे विचार जिवंत ठेवण्यासाठी कर्तव्याशी एकनिष्ठ रहावे : प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांचे प्रतिपादन


ज्येष्ठ लेखिका नीलमताई माणगावे लिखित बापू तुम्ही ग्रेटच या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त उपस्थित असणारे मान्यवर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


     बापूजींना टाळून देश कधीच पुढे जाणार नाही आणि बापूजींचे विचार कधीच पुसले जाणार नाहीत. हा देश गांधींचा आहे, तो उद्याही गांधींचाच राहणार आहे. साहित्यिकांनी बापू विचार जिवंत ठेवण्यासाठी आपले कर्तव्य पार पाडावे. साहित्यिक सजग झाल्यास विरोधी विचारांना प्रतिकार करू शकतात. समता, बंधुता व लोकशाही टिकवण्यासाठी मोठे काम करू शकतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक, माजी प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांनी केले.

     महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा जयसिंगपूर शिरोळ आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ लेखिका नीलम माणगावे यांच्या 'बापू, तुम्ही ग्रेटच !' (चरखा आणि गांधीजी यांचा मुक्त संवाद) या दीर्घ कवितेच्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

ज्येष्ठ लेखिका नीलमताई माणगावे विचार व्यक्त करताना


    कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचे सदस्य राजन मुठाणे म्हणाले, गांधीजी सर्व पिढ्यांना कळणे गरजेचे आहेत. गांधी ही विचारधारा पुन्हा पुन्हा जन्माला आली पाहिजे. गांधी समजण्याचा हा छोटासा मार्ग म्हणजे 'बापू, तुम्ही ग्रेटच' हे गांधीजी यांच्यावरील पुस्तक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून नीलम माणगावे यांनी नव्या लेखन चळवळीची वाट चोखाळली आहे.

     समीक्षक, लेखक डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, लोकशाही वाचविण्यासाठी गांधी विचारांचे स्मरण आवश्यक बनले आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ यांचा संदर्भ घेत दीर्घकथा लिहिणे कठीण गोष्ट आहे, पण गांधींच्या विचारांचा मागोवा घेत इतिहास विस्तृत करणारे साहित्य या पुस्तकाच्या रूपाने वाचकांच्या समोर आले आहे.

     जयसिंगपूर कॉलेज, कॉन्फरन्स हॉलमध्ये झालेल्या या प्रकाशन समारंभात मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन झाले. म.सा.प. शाखा जयसिंगपूर शिरोळचे अध्यक्ष डॉ. महावीर अक्कोळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सत्कार प्रा. अनिलकुमार पाटील यांनी करून दिला. प्रकाशक इंद्रजीत घुले, कवयित्री नीलम माणगावे यांनी मनोगत व्यक्त केले. किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर आभार म.सा.प. शाखेचे सचिव संजय सुतार यांनी मानले. यावेळी बाहुबली भणाजे यांनी बापूजींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मांडले होते.

      यावेळी दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष भीमराव धुळूबुळू, प्रा. डॉ. मोहन पाटील, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. साहित्य प्रेमींचा पुस्तकास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा