![]() | |
|
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : विकसित भारत २०४७ चे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून देशाच्या विविध क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचा दृढनिश्चय केला जात आहे. तसेच बलशाही भारताच्या निर्मितीसाठी २०४७ हे वर्ष दृढ संकल्प असल्याचे मत कार्यशाळेचे उद्घाटक, मानव्यशास्त्र अधिष्ठाता व अर्थ विचारवंत प्रा.डॉ.एम.एस. देशमुख यांनी येथील शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या कक्षाच्या वतीने आयोजित वार्षिक कार्य नियोजन बैठक व पीएफएमएस प्रशिक्षण कार्यशाळेत बोलताना व्यक्त केले. यावेळी अध्यक्षस्थानी रासेयो कक्षाचे संचालक डॉ. टी.एम. चौगुले व प्रमुख उपस्थित डॉ. पोपट माळी होते.
डॉ. देशमुख पुढे म्हणाले २०४७ साली स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षानिमित्त भारताला एक विकसित राष्ट्र म्हणून ओळख मिळावी, या ध्येयाने प्रेरित होऊन सरकारने ‘विकसित भारत २०४७’ हा व्यापक आराखडा जाहीर केला आहे. या योजना अंतर्गत आर्थिक विकासाला गती देण्यासाठी नवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, आणि नवउद्योगांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. शेती, उद्योग क्षेत्र शिक्षण, आरोग्य, आणि डिजिटल परिवर्तन या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शाश्वत विकासाच्या दृष्टीने स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरणपूरक धोरणांचा अवलंब होईल.यात सामाजिक समता, आर्थिक स्वावलंबन, आणि देशाच्या सर्व घटकांचा विकास होण्यासाठी विविध योजना आखण्यात आल्या आहेत. यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग एक उत्तम पर्याय होऊ शकतो. भारताचा सध्याचा विकास दर ८ टक्क्याच्या पुढे असून वेगाने वाढणाऱ्या विकास दरा मुळे सन २०४७ पर्यंत भारत हा जगातील प्रमुख बलशाही शक्तींपैकी एक असेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
अध्यक्षीय स्थानावरून बोलताना रासेयो, संचालक डॉ. टी. एम.चौगले म्हणाले, देशाच्या प्रत्येक क्षेत्रात विकासाचा दर व वाढती युवकांची फौज यामुळे प्रत्येक क्षेत्राला नव संजीवनी मिळणार आहे. त्याचा सकारात्मक परिणामस्वरूप भारत हा विकसित देशांच्या शृंखलेत साहजिकच अग्रभागी राहणार आहे. त्यामुळे सन २०४७ मध्ये भारत हा जागतिक महासत्ता होईल अशी सकारात्मक व्यक्त केली. त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेच्या सक्षमतेसाठी अनेक उपक्रम व मार्गदर्शनाच्या माध्यमातून उपकृत केले.
चार्टर्ड अकाउंटंट दिपक पाटील यांनी ऑडिट संदर्भात माहिती देऊन विविध प्रश्नांचे निराकरण केले. उपकुलसचिव डॉ. प्रिया देशमुख यांनी पी.एफ.एम.एस चे प्रात्यक्षिक घेऊन कार्यक्रम अधिकाऱ्यांचा मार्ग सुकर केला. राजाराम कॉलेजचे डॉ. सुरज सोनवणे यांनी विद्यापीठ पोर्टल व माय भारत पोर्टल या विषयासंदर्भात प्रशिक्षण देऊन कार्यक्रम अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवले.
डॉ. आसावरी जाधव, डॉ. मनोज पाटील, डॉ. उषा पवार यांनी पर्यावरण संरक्षण कार्य व नियोजन या संदर्भात सर्वसमावेशक मांडणी केली. पर्यावरण पूरक व रचनात्मक कामाच्या माध्यमातून पर्यावरण संतुलन प्रस्थापित करण्यासाठी उत्तम मार्गदर्शन केले.
प्रारंभी विद्यापीठ गीत सादर करून डॉ. देशमुख यांनी रोपट्यास जलअर्पण करून प्रशिक्षण कार्यशाळेस प्रारंभ केला. सांगली जिल्हा समन्वयक डॉ.पोपट माळी यांनी उपस्थित मान्यवर व कार्यक्रम अधिकारी यांचे स्वागत केले. प्रास्ताविकात कार्यक्रम आयोजनाचा मुख्य हेतू स्पष्ट केला. कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन डॉ. प्रियंका कुंभार यांनी केले.
या कार्यशाळेस कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील कार्यक्रम अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम अधिकाऱ्यानी प्रशिक्षण कार्यशाळेबाबत समाधान व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा