*प्रा.डॉ.यशवंत हरताळे : उपसंपादक*
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर मध्ये अर्थशास्त्र विभाग आयोजित "भारतीय अर्थव्यवस्था : सध्याची स्थिती आणि भविष्याची दिशा" या विषयावर सहकारभूषण एस.के. पाटील कॉलेजचे प्रा.डॉ.ए . डी.जाधव यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.डॉ.सौ. विजयमाला चौगुले उपस्थित होते.
डॉ.ए.डी.जाधव यांनी मार्गदर्शन करताना भारतीय अर्थव्यवस्थेची विविध अंगीनी पार्श्वभूमी मांडून भारताची सध्याची दशा विविध अंगांनी विश्लेषित केली. सामाजिक, आर्थिक, राजकीय, तांत्रिक आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्राबाबत भाष्य केले.आर्थिक दशेत भारताचा आर्थिक वाढ दर जगभरातील विकसनशील देशांमध्ये महत्त्वपूर्ण मानला जात आहे. मोठ्या गुंतवणुकीमुळे उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती झाली आहे.मात्र चलनवाढ आणि बेरोजगारी हे अजूनही एक महत्त्वाचे आव्हान आहे,
सामाजिक दशेतंर्गत शिक्षण आणि आरोग्य याचा दर्जा हळूहळू सुधारत आहे, विशेषत: ग्रामीण भागात तंत्रज्ञानाच्या मदतीने होत आहे.ग्रामीण भागांतील आणि शहरी भागातील असमानता अद्याप एक मोठे आव्हान आहे.राजकीय दशेबाबत सरकार विविध आर्थिक आणि सामाजिक सुधारणा राबविण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामध्ये 'मेक इन इंडिया', 'डिजिटल इंडिया', आणि 'स्वच्छ भारत' अभियानांचा समावेश आहे. यासोबतच, कृषी, आरोग्य, आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणांसाठी पावले उचलली जात आहेत.
डॉ. जाधव पुढे म्हणाले, भारताचे परराष्ट्र धोरण जागतिक स्तरावर अधिक प्रभावी होत आहे. तांत्रिक दशेत डिजिटल क्रांती घडवून आणली आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात मोठे बदल घडले आहेत.स्टार्टअप आणि इनोव्हेशन मुळे जागतिक बाजारपेठेत भारताची स्थिती मजबूत झाली आहे.सामाजिक विविधता असतानाही एकात्मता टिकवणे ही एक मोठी समस्या असल्याबाबतही त्यांनी भाष्य केले.भारताची दशा सध्या आर्थिक प्रगतीकडे झुकलेली असली, तरी सामाजिक असमानता, बेरोजगारी, आणि पर्यावरणीय समस्यांसारख्या आव्हानांवर मात करण्याची गरज आहे. आर्थिक सुधारणा, तांत्रिक प्रगती, आणि सामाजिक एकात्मता याच्या माध्यमातून भारत उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारी प्रचंड गुंतवणूक, हरित ऊर्जा आणि शासन विकासाकडे महत्त्वाची पावले, आर्थिक सुधारण्याच्या दिशेने वाटचाल, भारताचे आंतरराष्ट्रीय प्रभावी धोरण यासारख्या बाबी भारतीय दिशा प्रगती व विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
![]() |
उपप्राचार्य प्रा.डॉ. विजयमाला चौगुले अध्यक्षीय भाषण करताना म्हणाल्या, भारतीय अर्थव्यवस्थेने कात टाकली असून उद्योग व सेवा क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करीत आहे. भारतीय अर्थव्यवस्था मध्यम व दीर्घकालीन काळात सकारात्मक व प्रभावी वाटचाल करीत आहे. तथापि, अनेक आव्हानांचा सामना करताना धोरणात्मक निर्णय व आर्थिक सुधारणांची गरज आहे.
प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांचे विशेष मार्गदर्शन, प्रेरणा व सहकार्य लाभले.
या कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी केले.प्रा. यास्मिन मुल्ला यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा. विश्रांती चव्हाण यांनी केले.
या कार्यक्रमास बी.ए. व एम.ए.चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी घटकांकडून या कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा