![]() |
व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन करताना प्रेरक व्यक्तिमत्व प्रा. बाळगोंडा पाटील, जयसिंगपूर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर मध्ये अर्थशास्त्र विभागा च्या वतीने 'व्यक्तिमत्व विकास व त्याचे विविध पैलू' या विषयावर शनिवार दि.१९ ऑक्टोबर,२०२४ रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख प्रेरक वक्ते प्रा. बाळगोंडा पाटील व अध्यक्षस्थानी डॉ. प्रभाकर माने उपस्थित होते.
प्रा. बाळगोंडा पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले, व्यक्तिमत्व विकास हा अलीकडच्या काळात एक अपरिहार्य घटक बनला आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी व्यक्तिमत्त्वाची विविध पैलू आत्मसात करणे आवश्यक आहे. यामध्ये आत्मविश्वास, संवाद कौशल्य, वेळेचं योग्य नियोजन, तान-तणाव व्यवस्थापन व सामाजिक संवेदनशीलता व जबाबदारी यावर त्यांनी भर दिला. ते पुढे म्हणाले,स्वतःसाठी जगत दुसऱ्यासाठी जगणे हाच परिपूर्ण व्यक्तिमत्वाचा खरा पैलू आहे. आज व्यक्तिमत्त्वाच्या बाह्य अंगाकडे अधिक लक्ष केंद्रित केले जाते मात्र व्यक्तिमत्त्वाची अंतर्गत अंगाकडे दुर्लक्ष केले जाते. मनुष्य आत्मकेंद्रित झाला असून दुसऱ्यासाठी जगण्यापेक्षा तात्पुरते समाधान देणाऱ्या स्वतःच्या भावी विश्वासत गुंतला आहे. मनुष्याचे व्यक्तिमत्व हे बेगडी नसावे. सक्षम व बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून ते यशस्वी झालं पाहिजे.
अध्यक्षीय भाष्य करताना डॉ. माने म्हणाले, अलीकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. अशावेळी या धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थी व संबंधित सर्व घटकांमध्ये दृढ आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता आणि तर्कशुद्ध विचारसरणीच्या विकासावर भर दिला आहे. विद्यार्थ्यांच्यामध्ये समस्या सोडवण्याची क्षमता निर्माण करणे, इतर जीवन कौशल्यामध्ये पारंगत करणे हा उद्देश आहे. या अनुषंगाने प्रा. पाटील यांचे व्याख्यान परिपूर्ण होते.
विद्यार्थी कु.रोहन लाले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय कु.वीरेंद्र कडाळे, आभार कु.अग्रजा कांबळे व सूत्रसंचालन अभिषेक सुतार यांनी केले.
या व्याख्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे सदरचा संपूर्ण कार्यक्रम अर्थशास्त्र विभागाच्या वतीने बी. ए., बी. कॉम. व बी.एस्सी.च्या विद्यार्थ्यांनी घडवून आणला. आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळाली.
प्राचार्य डॉ.सुरत मांजरे व उपप्राचार्य प्रा.डॉ. विजयमाला चौगुले यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले. प्रा.डॉ. वंदना देवकर व प्रा. विश्रांती चव्हाण यांचे सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा