Breaking

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०२४

हाताला ताकद देवून मविआचे स्वाभिमानी सरकार आणूया : खा. सुप्रियाताई सुळे यांचे आवाहन*


खा.सुप्रियाताई सुळे : महाविकास आघाडी प्रचार शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना


आम. सतेज पाटील. : सा. रे. पाटील साहेबांना आदरांजली देण्यासाठी गणपतराव पाटील यांना 50 हजाराच्या मताधिक्क्याने निवडून देण्याचा निर्धार- 


*मालोजीराव माने : कार्यकारी संपादक*


नृसिंहवाडी : देश अदृश्य शक्तीच्या माध्यमातून चालणार नाही तर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानावर चालतो. महापुरुषांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्या महायुतीचे सरकार घालवण्यासाठी आणि लोकांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी गणपतराव पाटील यांच्यासारख्या दिलदार आणि सुसंस्कृत नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळावा आणि महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला निवडून देणे गरजेचे आहे. आता हाताला ताकद देवून मविआचे स्वाभिमानी सरकार आणूया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या खा. सुप्रियाताई सुळे यांनी केले.

      शिरोळ विधानसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली शुभारंभ सभा घेण्यात आली.

      माजी मंत्री, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले, विश्वासाचे राजकारण महाराष्ट्रात पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी महाविकास आघाडीला पर्याय नाही. मविआच्या माध्यमातून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल. ती जबाबदारी घेऊनच आपणाला काम करावे लागेल. शिरोळ तालुक्याला विकासात्मक दृष्टी देण्याच्या प्रयत्नातून शांत, संयमी, कर्तृत्ववान आणि सन्मानाचे नेतृत्व गणपतराव पाटील यांच्या माध्यमातून मविआने दिले आहे. 'परिवर्तनाचे वारे, आम्ही सारे' ही भूमिका घेऊन मविआ एकसंघपणे काम करत आहे. आदरणीय सा. रे. पाटील साहेबांना आदरांजली देण्यासाठी गणपतराव पाटील यांना 50 हजाराच्या मताधिक्क्याने आपण निवडून देण्याचा निर्धार करूया, असे आवाहनही त्यांनी केले.

      खासदार श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, एकत्र राहून काम केल्यास यश नक्कीच मिळते. महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांना एकत्र करण्याचे काम गणपतराव पाटील यांनी केले आहे. महापुरुषांच्या विचारधारेवर सर्वांना सोबत घेणे आवश्यक असून महायुतीचा पराभव कसा करायचा यालाच प्राधान्य देणे गरजेचे आहे. जे पक्ष फोडून राजकारण करीत आहेत ते कधीच यशस्वी होणार नाहीत. मविआ व घटक पक्षांची मोट चांगली बांधली असून शिरोळ तालुक्याबरोबरच राज्यांमध्ये परिवर्तन निश्चित होणार आहे.

       गणपतराव पाटील म्हणाले, विकासाची दृष्टी घेऊन काम करीत आहोत. शेतकरी, शेतमजूर, कामगार, तरुण पिढी, महिला, छोटे मोठे उद्योजक अशा सर्वच घटकांना सामावून घेऊन काम करण्याची माझी भूमिका आहे. तसेच तालुक्यामध्ये पंचगंगा प्रदूषण मुक्ती, पूरग्रस्तांचे पुनर्वसन, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, तरुणांना नोकर भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा, क्षारपड मुक्ती, महिलांना सुरक्षितता अशा विविध प्रश्नांना प्राधान्य देऊन ती सोडवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मी जनतेचा आमदार असेन. सातत्याने कामासाठी माझा दरवाजा कायम उघडा राहील. माझे हित न जपता लोकांच्या हिताचे काम करण्यासाठी मतदारांनी मला एकदा संधी द्यावी. मी कामाचा धडाका लावल्याशिवाय राहणार नाही.

      माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले, विरोधकांच्या मनात धडकी भरेल, त्यांना घाम फुटेल असे काम महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी करून हाताला निवडून देणे गरजेचे आहे. मराठी माणसाची मान दिल्ली पुढे झुकवायची नाही, भूलथापांना न भुलता हातावर शिक्का मारून माजुऱ्या बैलाला व्यसन घालण्यासाठी सर्वांनी एकसंघपणे महायुतीचा पराभव करणे गरजेचे आहे.  

     ठाकरे शिवसेना नेते संजय पवार म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी लुटायचे आणि वाटायचे ही भूमिका घेऊन काम केले आहे. ज्यांनी जनतेला फसविले आहे, विश्वासघात केला आहे, त्यांना सत्तेतून बाजूला करून महाराष्ट्र वाचविण्यासाठी एकदिलाने काम केले पाहिजे.

भूषणसिंह होळकर, रावसाहेब भिलवडे, रमेश शिंदे, स्वाती सासणे, मंगलाताई चव्हाण, माधुरी सावगावे यांनीही मनोगत व्यक्त केले.

      प्रारंभी श्री दत्त दर्शन घेऊन विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक धनाजीराव जगदाळे यांनी केले. चंदूरच्या ग्रामस्थांनी गणपतराव पाटील यांना निवडणूक निधी दिला. आभार अनंत धनवडे यांनी मानले.

      माजी आमदार राजीव आवळे, श्री दत्तचे चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक अनिलराव यादव, शेखर पाटील, दरगु गावडे, श्रीमती विनया घोरपडे, पृथ्वीराजसिंह यादव, ठाकरे शिवसेनेचे चंगेजखान पठाण, जिल्हाप्रमुख वैभव उगळे, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, तालुकाप्रमुख संजय अणुसे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष व्ही. बी. पाटील, भवानीसिंह घोरपडे, सर्जेराव पवार, शिरोळ तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे, स्नेहा देसाई, जिल्हा उपाध्यक्ष बी. जी. माने, वसंतराव देसाई, कविता चौगुले, अमरसिंह नाईक, सुरेश कांबळे, संदीप बिरणगे, निशिकांत निटवे, शिरोळ तालुका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यासह महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांची व मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा