Breaking

मंगळवार, १४ जानेवारी, २०२५

*14 जानेवारी मकर संक्रांत व भूगोल दिन*



लेखक  प्रा.डॉ. महावीर बुरसे, 

जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर


    भारतासारख्या कृषीप्रधान देशात विविध सण उत्सव साजरे केले जातात. यातील बऱ्याच सण उत्सवांना धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक असे वैशिष्ट्यपूर्ण पार्श्वभूमी पाहावयास मिळते. यामधील काही सण उत्सव ठराविक प्रदेशा पुरते मर्यादित आहेत. तर काही देशभर वेगवेगळ्या स्वरूपात साजरी केली जातात. यामधील एक वैशिष्ट्यपूर्ण सण म्हणजे मकर संक्रांत. या सणाला वैशिष्ट्यपूर्ण या अर्थाने संबोधले जाते की, या सणास प्राचीन,भौगोलिक,आहारदृष्ट्या, धार्मिक व प्रादेशिक इत्यादी महत्त्व पहावयास मिळते.

           प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीस विशेष महत्त्व आहे. कारण या दिवसापासून सूर्याच्या उतरायला सुरुवात होत असल्याने शुभ मानले जाते. तसेच संक्रांत ही एक देवी मानली असून दरवर्षी ती वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते अशी मान्यता असून त्यावर आधारित त्यावर्षीचे अंदाज व्यक्त केले जातात. भौगोलिक दृष्ट्या मकर संक्रांत म्हणजे सूर्याच्या भासमान भ्रमणाच्या मार्गातील एक टप्पा की त्यामध्ये सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो येथून पुढे सूर्य मकर वृत्ताकडून विषुववृत्ताकडे संक्रमित होतो.

            या काळात भारतामध्ये हिवाळा ऋतू असल्याने शरीरातला उष्णता देणारे तीळ, गुळ,बाजरी इत्यादी आहारात घेतले जातात. तसेच या काळात शेती मधून येणारी सोलाने,ऊस, गाजर यांचा वापर आहारामध्ये होतो. तसेच महिला हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतात व लहान मुलांचे बोरन्हान (लूट)वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत केले जाते. मकर संक्रांत भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यात निरनिराळ्या नावाने साजरे केले जातात.महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत भोगी, संक्रांत व किंक्रांत असे तीन दिवस साजरे केले जाते, हिमाचल प्रदेशामध्ये लोहरी, बिहारमध्ये संक्रांति  आसाममध्ये बिहू, गुजरात व राजस्थानमध्ये उत्तरायण, कर्नाटक-आंध्र प्रदेश-पश्चिम बंगाल संक्रांति तर तमिळनाडूमध्ये पोंगल अशा स्वरूपात साजरे होते. भारताशिवाय हा सण नेपाळ,थायलंड,म्यानमार इत्यादी देशात ही साजरा होतो. भौगोलिकदृष्ट्या हा सण 21 डिसेंबर रोजी साजरा व्हावयास हवा तथापि भारता मध्ये अक्षांशानुसार याचा प्रभाव 14 जानेवारीपासून दिसून येतो म्हणून 14 व 15 जानेवारी रोजी सण साजरा होतो. 

             भूगोलामध्ये 14 जानेवारी हा दिवस भूगोल दिन म्हणून साजरा होतो. यामध्ये वरील भौगोलिक घटना तर आहेच शिवाय दिनांक 14 जानेवारी 1912 रोजी कोल्हापूर येथे डॉ. सी डी देशपांडे यांचा जन्म दिवस त्यांच्या भूगोलातील अविस्मरणीय कामामुळे राष्ट्रीय भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. भूगोल विषयाला भूगोलशास्त्र विषय म्हणून प्रथमच प्रयत्न करणारे तसेच मुंबई विद्यापीठात स्वतंत्र भूगोल विभागाची सुरुवात व नॅशनल असोसिएशन ऑफ जिओग्राफी, इंडिया ची स्थापना त्यांनी केली. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त शाळा,विद्यालय,महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये विविध कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यांच्या कार्याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितली जाते. डॉ. सी डी देशपांडे यांचा मृत्यू 14 नोव्हेंबर 1999 मध्ये पुणे येथे झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा