![]() |
नांगरट साहित्य संमेलन च्या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांची पत्रकार परिषद |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने १६ फेब्रुवारी, २०२५ रोजी दुसरे नांगरट साहित्य सम्मेलन ज्येष्ठ साहित्यीक इंद्रजीत भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली जयसिंगपूर येथील जयसिंगपूर कॅालेज जयसिंगपूर च्या प्रागंणात पार पडणार असल्याची माहिती संमेलन स्वागताध्यक्ष माजी खा.राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
भारत हा कृषीप्रधान देश आहे मात्र याठिकाणी गावगाड्यातील शेतकरी , शेतमजूर व महिला यांची कधीच चर्चा झाली नाही. साहित्यामधून शेती,शेतकरी व शेतमजूर यांच्या वेदना मांडण्याकरिता कृषी संस्कृतीचा लोणच्यासारखा वापर करून घेण्यात आले आहे. शेतक-यांचे विचार , वेदना , दुःख , समाजातील शेतक-यांचे व त्याच्या कुटूंबाचे जळजळीत वास्तव साहित्या मधून मांडणे गरजेचे आहे. सरकारकडून विविध साहित्य संमेलने घेतली जात आहेत मात्र शिवारातील वेदनेला कायमच साहित्यामध्ये दुर्लक्षित राहिले आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जयसिंगपूर येथे दुसरे नांगरट साहित्य सम्मेलन घेण्यात येत आहे.
सदरचे साहित्य सम्मेलन तीन सत्रात होणार असून सकाळी ८.०० वाजता जयसिंगपूर शहरातून शेती साहित्यांची विशेष औजार दिंडी काढली जाणार आहे .९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन होवून पहिल्या सत्रास सुरवात होणार आहे. यावेळी संमेलन समितीच्यावतीने शेतकरी चळवळीतील जीवनगौरव पुरस्कार शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते मा. आमदार शंकर आण्णा धोंडगे-पाटील ,पत्रकारिता मधील जीवनगौरव पुरस्कार लोकमतचे ज्येष्ठ संपादक वसंत भोसले व साहित्यामधील जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखक व कवी फ. मु शिंदे यांना देण्यात येणार आहे. दुस-या सत्रात परिसंवाद घेण्यात आला असून यामध्ये चंगळवादी व्यवस्थेत बेदखल शेतकरी या विषयावरती ज्येष्ठ ग्रामीण साहित्यीक शेषराव मोहिते , दैनिक सकाळचे समुह संपादक श्रीराम पवार व लेखक तसेच बिझनेस स्टॅंण्डर्ड चे ज्येष्ठ पत्रकार राधेशाम जाधव यांचे व्याख्यान होणार आहे. तिस-या सत्रामध्ये निमंत्रित कवींचे ज्येष्ठ कवी प्रकाश होळकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी सम्मेलन होणार असून यामध्ये विजय चोरमारे , संजीवनी तडेगांवकर ,संदीप जगताप , लता ऐवळे , निलम माणगांवे , आबासाहेब पाटील , लक्ष्मण महाडिक हे कवी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी पत्रकार बैठकीस डॉ.महावीर अक्कोळे , प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, प्रा. शांताराम कांबळे , प्रा.डॉ. गोमटेश पाटील , प्रा.डॉ. संदिप तापकीर , ज्येष्ठ कवि विजयकुमार बेळंके , रावसाहेब आलासे , सचिन शिंदे , शैलेश चौगुले , प्रा.डॉ.प्रभाकर माने , वासू भोजने, प्रितम पाटील,विक्रम पाटील यांचेसह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा