Breaking

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२५

*तरुणाईच्या आकर्षक सादरीकरणांनी शिवाजी विद्यापीठ शिवमय ; राष्ट्रीय एकात्मता शिबिराच्या विद्यार्थ्यांच्यामुळे लाभले राष्ट्रीय आयाम


शिवाजी विद्यापीठात शिवजयंती निमित्त शिव पूर्ण वातावरणांनी परिसर दुमदमला


*प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक* 


कोल्हापूर, दि. १९ फेब्रुवारी : शिवाजी विद्यापीठात आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा सोहळा तरुणाईच्या मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे काढलेल्या शोभायात्रा, हलगी, लेझीम, ढोल व झांजपथकाचे उत्कृष्ट सादरीकरण, जरीपटक्याचे मिरविणे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत अश्वारुढ युवक यांमुळे विद्यापीठाचा परिसर आज पूर्णपणे शिवमय होऊन गेला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी विद्यापीठात आलेल्या देशभरातील स्वयंसेवकांच्या सहभागामुळे या सोहळ्याला राष्ट्रीय आयाम लाभले.

     विद्यापीठात आज सकाळी ठीक ९.३० वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजास वंदन करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यानंतर कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवरांनी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले, त्याचप्रमाणे शिवप्रतिमेसही पुष्पहार घालून अभिवादन केले.

       या प्रसंगी विद्यापीठातील वसतीगृहे, विद्यार्थी भवन येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी देशातील बारा राज्यांतील २१ विद्यापीठांतून आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विद्यापीठ परिसरात ढोल-ताशाच्या निनादात भव्य शोभायात्रा काढली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेतील अश्वारुढ तरुणाच्या रुपाने छत्रपतींचे प्रतिरुप शोभायात्रेत अवतरले. भगवे फेटे आणि शुभ्रवस्त्रांकित तरुणाईमुळे शोभायात्रा लक्ष्यवेधी ठरली. शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आल्यानंतर तेथे आणि मुख्य प्रशासकीय भवन इमारतीसमोर या विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कारांचे सुमारे दोन तास सादरीकरण केले. यामध्ये हलगीवादनासह झांजपथकाचे सादरीकरण, लेझीम प्रात्यक्षिके, जरीपटका नाचविण्याचा उपक्रम यांचा समावेश होता. सळसळत्या तरुणाईच्या उत्साहाने विद्यापीठाचा परिसर पूर्णपणे शिवमय होऊन गेला. कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी शोभायात्रेत सहभागासह संबंधित उपक्रमांना पूर्णवेळ उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सादरीकरणाबद्दल कौतुकही केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रापासून प्रेरणा घेऊन, व्यापक राष्ट्रहितासाठी त्यांनी दाखविलेल्या मार्गावरुन वाटचाल करण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.

   यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रादेशिक संचालनालयाचे यूथ ऑफिसर सुमंतकुमार यादव, राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे देशभरातून आलेले संचालक, कार्यक्रम अधिकारी, विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा