Breaking

गुरुवार, २७ मार्च, २०२५

*उद्योजकता हा राष्ट्र व आर्थिक विकासासह सामाजिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ : प्रेरक वक्ते प्रा. बाळगोंडा पाटील*


कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रेरक वक्ते प्रा.बी.ए.पाटील,डॉ. प्रभाकर माने व अध्यक्षस्थानी प्रा.एस.बी. डफळापूरकर 


*प्रा. ज्योती पोरे : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर : दृढ इच्छाशक्ती, अपार कष्ट, आर्थिक सहकार्य व योग्य मार्गदर्शन असल्यास कोणीही व्यक्ती यशस्वी उद्योजक होऊ शकतो असे मत प्रेरक वक्ते प्रा. बाळगोंडा पाटील यांनी 'युवा उद्योजक : नव्या युगाचे नेते' या विषयावर  अर्थशास्त्र पदव्युत्तर विभागाच्या वतीने आयोजित एक दिवशीय कार्यशाळेत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.एस.बी. डफळापूरकर व प्रा.सुरज चौगुले उपस्थित होते.

        प्रा. पाटील पुढे म्हणाले, उद्योजकतेच्या माध्यमातून आर्थिक व सामाजिक परिवर्तनासह राष्ट्र विकासाची उभारणी मजबूत पायावर केली जाते. याप्रसंगी त्यांनी भारतातील यशस्वी उद्योजकाचासह  त्यांनी यशस्वी स्थानिक उद्योगांच्या प्रेरणादायी व खरी सक्सेस स्टोरी उत्तम पद्धतीने मांडल्या.

     प्रथम सत्रात मार्गदर्शन करताना डॉ. प्रभाकर माने म्हणाले, या देशात सूक्ष्म, लघु व कुठीर उद्योग उभारणीसाठी प्रचंड धाडस, अत्यंतिक सहनशीलता, अनुभवाची शिदोरी, पुरेसे भांडवल, श्रमशक्ती व कौशल्याची आवश्यकता असते. यामधूनच एक मजबूत उद्योगाची उभारणी होऊ शकते.

      अध्यक्ष स्थानावर बोलताना डॉ.एस.बी.डफळापूरकर म्हणाले, युवा उद्योजकांना स्टार्ट अप इंडिया व मेक इन इंडिया यासारख्या योजनेमुळे प्रेरणा व सहकार्य मिळत आहे. तसेच डिजिटल प्लॅटफॉर्म व ई कॉमर्सच्या माध्यमातून नव्या युवा  उद्योजकांना बाजारपेठ विस्तारण्यास नव्याने संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे युवा उद्योजक नवीन युगाची नेते बनू शकतात.

       स्वागत व प्रास्ताविक कु. नेहा जाधव यांनी केले. प्रा. ज्योती पोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.प्रा. विश्रांती चव्हाण यांनी आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन कु.स्वाती शिंदे यांनी केले.

       कार्यशाळा योजनेसाठी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले.डॉ. व्ही.बी. देवकर, प्रा. मेहबूब मुजावर व एम. ए. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेस विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा