![]() |
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. एम. एस. देशमुख व अध्यक्षस्थानी डॉ. वसंतराव जुगळे, प्राचार्य डॉ. अनिल पाटील व समन्वयक डॉ. यशवंत हरताळे |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जागतिक पटलावर भारत हा वेगाने विकसित होणारा देश असून भविष्यातील विकसित भारताचे स्वप्न हे सरकारचे नियोजनबद्ध विकासात्मक धोरण व लोक सहभागामुळे शक्य असल्याचे प्रतिपादन मानव्यशास्त्र अधिष्ठाता प्रा.डॉ.एम.एस.देशमुख यांनी केले.ते शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज येथील "डेव्हलपमेंट ऑफ इंडिया : डायमेन्शन अँड डायनामिक्स" या एक दिवशीय राष्ट्रीय परिषदेच्या प्रथम सत्रात साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ अर्थशास्त्रज्ञ प्रा.डॉ. वसंतराव जुगळे व प्राचार्य डॉ. अनिल पाटील उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, १५०० हजार वर्षांपूर्वी भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार हा जवळपास ३२ टक्के होता. तत्कालीन काळातील भारतीय ज्ञान प्रणाली उच्च कोटीचे होती. या पार्श्वभूमीवर सरकारच्या सर्वकष अशा प्रभावी धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही जगात पाचव्या स्थानी आहे. मुळात ती सातत्याने व हळुवारपणे विकासाकडे मार्गक्रमण करीत आहे.ते पुढे म्हणाले, आर्थिक विकास व वृद्धी, नवीन तंत्रज्ञान आणि डिजिटल क्रांती, कौशल्यपूर्ण व जागतिक दर्जाचे शिक्षण IIT व IIM देणारे विविध संस्था,नवीन शैक्षणिक धोरण, उचित मूलभूत सुविधा यामध्ये वेगाने होणारे रस्ते, मेट्रो, बुलेट ट्रेन प्रकल्प आणि स्मार्ट सिटी, नवीन विमानतळ, लॉजिस्टिक पार्क उभारणीमुळे वाहतूक व्यवस्थेला विकसित रूप प्राप्त होत आहे.सन २०४७ पर्यंत विकसीत भारताचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे.डॉ. देशमुख म्हणाले, भारतीय आरोग्य सेवा ही जगाची फार्मसी म्हणून ओळखले जात आहे. देशातील विविध आरोग्याच्या योजना आणि जागतिक पातळीवरचा असलेला प्रभाव यामध्ये G२० परिषदेचे सक्षम नेतृत्व, संरक्षण क्षेत्रात होत असणारी क्रांती, भारत उपक्रमांतर्गत स्वदेशी शास्त्राचे उत्पादनातील वाढ, कृषी, औद्योगिक व सेवा क्षेत्रातील प्रचंडपणे विकासाच्या दिशेने वाटचाल, यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था सन २०२५ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर पोहोचण्याची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. भारत हा जगातील सर्वात जास्त तरुणांचा देश म्हणून ओळखला जात असून याद्वारे विविध स्टार्टअप व गुणवत्तापूर्ण मानवी विकासाच्या माध्यमातून भविष्यकाळात विकास शक्य आहे.
अध्यक्षीय भाष्य करताना जेष्ठ अर्थतज्ञ प्रा.डॉ.जुगळे म्हणाले, अलीकडील परिस्थितीत शेती क्षेत्र हेच भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आज ही ५८% जनता ही शेतीवर अवलंबून आहे. विद्यमान परिस्थितीत विकास हा आभासी असून शेती क्षेत्राच्या विकासाला नवीन कृषी धोरणाच्या माध्यमातून आधार दिला पाहिजे. सात शतकापूर्वी विकसित भारताचे स्वप्न हे ज्ञानेश्वरांच्या पसायदानामध्ये दिसून येते आहे. भारतीय विकासाच्या प्रक्रियेत विकासाचा विचित्रपणा दिसून येत आहे. जगण्याची शाश्वती की विकासाची शाश्वती हा मूळ प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचा दरडोई उत्पन्न ₹ १५०००/ असून तो सर्वात कमी आहे. ते पुढे म्हणाले विकासात स्त्रियांचे योगदान फक्त २३ टक्के असून लिंग प्रमाण पातळीवर विकासाच्या असमानता दिसून येते. शासनाचे विकासाचे अनेक आयाम कूचकामी असल्याचेही ते म्हणाले. सध्या एक प्रगल्भ व विकासात्मक धोरणाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
प्रा.डॉ. यशवंत हरताळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून पाहुण्यांचा परिचय करुन दिला.प्रा. संजय पाटील यांनी आभार व्यक्त केला.या कार्यशाळेत उपप्राचार्य प्रा. जालंदर यादव,प्रा. अर्जुन जाधव,डॉ. मनोहर कोरे, डॉ. शंकर गावडे, डॉ. आबासाहेब जाधव, डॉ. प्रभाकर माने, प्रा.डॉ. कुलकर्णी मॅडम ,प्रा.वनमोरे, सुयेक परिवारातील अन्य प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या राष्ट्रीय परिषदेचे नेटक्या पणाने उत्तम नियोजन प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे प्रमुख व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. यशवंत हरताळे, डॉ.सौ.हक्के, प्रा. संजय पाटील व अन्य प्राध्यापक बंधूंनी उत्तम पद्धतीने केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा