![]() |
डॉ. एम.एस. देशमुख यांची अर्थशास्त्र अधिविभाग प्रमुख पदी निवड, याप्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी.शिर्के, प्र -कुलगुरू डॉ.पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, प्रा.डॉ. व्ही.पी.कट्टी व अन्य मान्यवर |
प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ मानव्य विद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा.डॉ. महादेव देशमुख यांची शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाचे प्रमुख पदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीने सर्वत्र आनंद होत आहे. यापूर्वी या अधिविभागाचे प्रमुख म्हणून प्रा.डॉ. व्ही.पी.कट्टी यांनी उत्तम पद्धतीने काम पाहिले आहे.
सांगली जिल्ह्याचे सुपुत्र श्री. महादेव श्रीरंग देशमुख अर्थात सुपरिचित असणारे डॉ.एम.एस. देशमुख अर्थशास्त्रातील जाणते व बोलते व्यक्तिमत्व, कार्यकुशल उत्तम प्रशासक, अभ्यासू व्यक्तिमत्व, कर्तव्यदक्ष, विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची जाण असणारे प्राध्यापक, नम्रता, सामाजिक संवेदनशीलता, स्पष्ट वक्ता व सृजनशील व्यक्तिमत्व म्हणून परिचयाचे आहेत.त्यांच्या या पदावर निवड होणे याचा अर्थ नाविन्यपूर्ण शैक्षणिक, संशोधनात्मक, समाजधिष्ठित विचारांना व कृतिशील कार्याला नवसंजीवनी मिळणार आहे. त्यांचा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील उपयोजित संशोधनात्मक कामाचा व ज्ञानाचा प्रचंड व्यावहारिक अनुभवाची जोड असल्याने त्याचा निश्चित फायदा अर्थशास्त्रातील प्रत्येक घटकाला होणार हे निश्चित आहे. तसेच विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांसाठी नव्याने उपक्रम राबविणारे प्रयोगशील व कृतिशील प्राध्यापक म्हणून कामाची अनुभूती असल्याने याचा लाभ सर्वांना होणार आहे. स्वतःच्या एका विशिष्ट तत्वनिष्ठ विचारधारेवर चालणारे अत्यंत शांत व संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा शिवाजी विद्यापीठात बोलबाला आहे.
अर्थशास्त्रीय सामाजिक संशोधनात्मक कार्यामध्ये रुची आहे. समाजातील शेतकरी, शेतमजूर व समाजातील वंचित घटक या विषयी तळमळ असल्याने या अनुषंगाने त्यांचा कृषी अर्थशास्त्रातील संशोधन कार्य उल्लेखनीय आहे. सार्वजनिक आयव्यय या विषयाची भिस्त असल्याने त्यांनी अनेक संशोधनात्मक मेजर व मायनर प्रोजेक्ट महाराष्ट्र शासनाला व संशोधनात्मक कार्य करणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांना सबमिट केले आहेत.प्रा.डॉ.एम.एस. देशमुख यांनी विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक तसेच इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजेस कक्षाचे प्रभारी संचालक म्हणून कुशलपणे काम पाहिले. विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळासह अधिसभेवर देखील त्यांनी कार्य केले आहे. विद्यापीठाच्या तसेच शासनाच्या विविध समित्यांवर त्यांनी सदस्य म्हणून काम पाहिले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांतून त्यांचे ६२ शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. २१ पुस्तकांचे ते लेखक आहेत. गेली २८ वर्षे ते अध्यापन व संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या हाताखाली ८ संशोधकांनी पीएच.डी. तर एकाने एम.फील.ची पदवी संपादन केली आहे. पाच संशोधन प्रकल्पांवर त्यांनी काम केले आहे. सुमारे ८६ लाख रुपयांच्या कन्सल्टन्सी प्रकल्पावर त्यांनी काम केले आहे. दोन आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांच्या संपादक मंडळावर ते सदस्य आहेत. शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचा (सूयेकचा) मानाचा डॉ. धनंजयराव गाडगीळ पुरस्कार, नवी दिल्ली येथील शैक्षणिक संघटनेकडून राधाकृष्ण सुवर्णपदक पुरस्कारासह अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.
शिवाजी विद्यापीठाचे NAAC कॉर्डिनेटर म्हणून विद्यापीठाला A+ मानांकन प्राप्त करून देण्यामध्ये त्यांची भूमिका व कामगिरी उल्लेखनीय होती. सातत्याने विविध विषयाला अनुसरून ग्रंथसंपदाची निर्मिती व संशोधनात्मक अभ्यासू लेखाच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी पार पाडणारे जाणकार लेखक म्हणून त्यांची ख्याती आहे. नवनवीन अर्थशास्त्रीय विषयाला स्पर्श करीत त्यांची लेखणी तळपताना दिसत आहे.
मुळात समाजकारण करत असताना स्वतःचा वेगळा ठसा निर्माण करीत कितीही संघर्षाची व प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरी सामाजिक परिवर्तनासाठी झटत राहणे यासाठी ते कटिबद्ध आहेत. समाजाच्या चौफेर प्रगतीच्या ध्येय पूर्तीसाठी सतत संघर्ष करणे हा त्याचा स्थायीभाव झाला आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून शैक्षणिक प्रवाहातील सर्व घटकांना एकत्रित घेऊन चालणारा एक आश्वासक प्राध्यापकी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे.
शिक्षणातील अनेक विषयाची परिपूर्ण माहिती व ज्ञान प्राप्त करून राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरणाची कृतिशील आराखडा तयार करणे व प्रत्यक्ष अंमलबजावणी करून शिवाजी विद्यापीठात यशस्वीपणे लागू करणारे, नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाचा नावलौकिक राज्यात निर्माण करणारे जाणते प्रशासक व प्राध्यापक आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वकर्ष विकासासाठी कठीबद्ध राहून विद्यापीठाचे शैक्षणिक प्रणाली दर्जेदार ,स्पर्धात्मक बनवून विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करणे हा त्यांचा हेतू आहे.डॉ. देशमुख प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या हितार्थ प्रयत्नशील राहणार असल्याचे ते जय हिंद न्यूज नेटवर्क परिवाराशी बोलत होते.
विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागात विभाग प्रमुख म्हणून कामाची धुरा सांभाळणाऱ्या या आश्वासक शैक्षणिक नेतृत्वाला जय हिंद न्यूज नेटवर्क परिवाराच्यावतीने मनस्वी शुभेच्छा l
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा