Breaking

सोमवार, १६ जून, २०२५

*ज्येष्ठ विचारवंत डॉ. महावीर रायाप्पा अक्कोळे हे प्रतिष्ठेच्या प्रा.बी.ए.चौगुले स्मृती पुरस्काराने सन्मानित*

 

प्रसिद्ध धन्वंतरी व पुरोगामी नेते डॉ. महावीर रायाप अक्कोळे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करताना 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : जयसिंगपूरचे प्रसिद्ध धन्वंतरी, सामाजिक चळवळीतील अग्रगण्य नेते, पुरोगामी लेखक व पत्रकार डॉ. महावीर अक्कोळे यांना प्रतिष्ठेचा प्रा.बी. ए. चौगुले स्मृती पुरस्कार बाहुबली (ता. हातकणंगले) येथील आचार्यश्री शांतिसागर प्रवचन भवनात प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी बाहुबली विद्यापीठाचे कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील, इचलकरंजीचे धन्वंतरी डॉ. कुबेर मगदूम व माजी प्राचार्य डॉ. कुंभार उपस्थित होते.

    याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती डॉ. महावीर अक्कोळे म्हणाले,'जैन पत्रकारितेचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित राखणे हे निरोगी जैन समाजासाठी आवश्यक आहे. सध्या जैन समाजात घुसलेले राजकारण समाजाला घातक असून, जैन पत्रकारितेने याविषयी भूमिका घेणे आवश्यक आहे. कर्मकांड आणि राजकारणापासून जैन समाजाने बाजूला राहिले तरच समाजाची प्रगती होऊ शकेल.

   प्राचार्य डॉ. कुंभार म्हणाले,आजच्या सामाजिक वातावरणात जाती-धर्मामध्ये सहिष्णुता निर्माण करणे गरजेचे आहे. प्राचीन काळामध्ये अनेक धर्म आणि जातीसमूहांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध होते. त्यामध्ये जैन समाजाचे आणि साधू वर्गाचे मोठे योगदान होते. अहिंसा आणि सहिष्णुता हाच जैन समाजाचा मूळ पाया आहे. जैन समाजाने सामाजिक सहिष्णुता राखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन केले. सामाजिक चळवळीतील अहिंसात्मक नेते डॉ. महावीर अक्कोळे व त्यांच्या परिवाराने समाजातील काही आदर्शवत कार्य सामाजिक परिवर्तनशील व रचनात्मक कार्याच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवले आहे. हा पुरस्कार म्हणजे डॉ. अक्कोळे यांचा यथोचित सन्मान जो अहिंसात्मक चळवळ व पुरोगामी विचारधारेला बळ व गती देणार आहे.

   प्राचार्य डॉ.गोमटेश्वर पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष डॉ. नेमिनाथ शास्त्री यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अरुणा चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. राजकुमार चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.ॲड. संदीप चौगुले यांनी आभार मानले.

   कार्यक्रमाचे उत्तम आयोजन डॉ. बाळासाहेब शेडबाळे, प्रसिद्ध लेखिका नीलम माणगावे, बाबासाहेब शेडबाळे, जिनेंद्र बुबनाळे, दीपक चौगुले, वैशाली शेडबाळे, अजित पाटील यांनी केले. डॉ. सुरेश पाटील, अरविंद मजलेकर, डी. ए. पाटील, सरोजनी होसकल्ले, डॉ. बी. ए. शिखरे, प्रा. इसराणा, सुभाष चौगुले, रावसाहेब पुजारी, जीवंधर गंगाई व अक्कोळे परिवार आदींसह श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा